तरुण भारत

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्लीत राहुल गांधींच्या उपस्थितीत झाले मतैक्य : भाजपचा पराभव हेच ध्येय असल्याचे केले स्पष्ट,जागा वाटप मागाहून

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

एका अंत्यत महत्त्वपूर्ण घडामोडीत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यानच्या युतीवर शिक्कामोर्तब केले. अलिकडेच काँग्रेसपासून फारकत घेऊन तृणमूल काँग्रेसबरोबर गेलेले सांगेचे अपक्ष आमदार यांनी देखील यावेळी उपस्थित राहून काँग्रेसबरोबर जाण्याचा rमनोदय व्यक्त केल्याने खळबळ माजली. गोवा फॉरवर्डने तृणमूलला जशासतसे उत्तर दिले. विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत या दोन्ही नेत्यांनी दै. तरुण भारतशी दिल्लीहून बोलताना समाधान व्यक्त केले.

गेले कित्येक दिवस काँग्रेस-गोवा फॉरवर्ड या दरम्यान युती संदर्भात चालू असलेला घोळ अखेर काल मंगळवारी संपुष्टात आला. काँग्रेस पक्षाने अखेर गोवा फॉरवर्डची मदत घेण्याचे ठरविले. गेल्या आठवडय़ात काँग्रेस नेते व गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यान युती करण्यासंदर्भात मडगावात सखोल चर्चा झाली होती. तथापि अंतिम निर्णय हा राहुल गांधी हेच घेणार होते.

सरदेसाईंना राहुल गांधींचे निमंत्रण

राहुल गांधी विदेशातून परतल्यानंतर त्यांनी विजय सरदेसाई व दिगंबर कामत यांना दिल्ली येण्याचे नियंत्रण दिले, त्यानुसार दोन्ही नेते मंगळवारी सकाळी नवी दिल्लीला गेले आणि संध्याकाळी त्यांनी राहूल गांधी यांची भेट घेतली. 2011 पर्यंत राहुल गांधी यांच्या सातत्याने संपर्कात असणाऱया विजय सरदेसाई यांना इ.स.2012 च्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारल्याने विजय सरदेसाई यांचा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेला संपर्क तुटला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडणुकीस उभे राहिले व विजयी झाले.

सरदेसाईंची भाजपशी दोस्ती-दुश्मनी

इ.स. 2016 मध्ये विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना केली. नंतर पुन्हा एकदा काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव पाठविला. परंतु पुन्हा एकदा कटू अनुभव आल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपला मदत करून सरकारमध्ये ते सहभागी झाले. भाजपने मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातून गोवा फॉरवर्डला डच्चू देण्यात आला. तेव्हापासून विजय सरदेसाई व काँग्रेस यांच्या दरम्यान नव्याने संबंध प्रस्थापित झाले.

राहुलच्या मान्यतेमुळे युतीचा मार्ग मोकळा

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मजबूत व्हावा, यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डला बरोबर घेण्याचे ठरविले. तशी चर्चा सुरू केली होती. अखेर या युतीला मंगळवारी राहुल गांधी यांनी मान्यता दिली आणि संयुक्तपणे भाजप विरोधात आघाडी उघडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. नवी दिल्लीत सांयकाळी झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी युतीस मान्यता दिली. यावेळी दिगंबर कामत, विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर अपक्ष आमदार प्रसाद गावकर व युतीसाठी शिष्टाई करणारे काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव हेही त्यावेळी उपस्थित होते.

जयेश, गिरीश यांची अनुपस्थिती

नवी दिल्लीत युतीची बोलणी अंतिम टप्प्यात नेण्यासाठी दिल्लीला गेलेले विजय सरदेसाई, दिगंबर कामत यांच्या बरोबर गोवा फॉरवर्डचे तिसरे आमदार जयेश साळगावकर मात्र गेले नाही. यावरून तर्कवितर्क करण्यात येत आहेत. जयेश हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. हे यामुळे नक्की झाले. सुरुवातीपासून गोवा फॉरवर्डबरोबर युती करण्यास विरोध दर्शविणारे गिरीश चोडणकर हे नवी दिल्लीत जाण्याऐवजी गोव्यात राहिले. इथूनच खळबळ माजविणारी एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली.

जागा वाटप मागाहून होईल

आमची बोलणी झाली आणि युतीही झाली. आता जागा वाटपाबाबतचा निर्णय हा मागाहून होईल. तो प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यावर तोडगा निघेल, असे विजय सरदेसाई म्हणाले.

तृणमूलला दे धक्का!

या युतीच्या बोलणी दरम्यान विजय सरदेसाई यांनी तृणमूलमध्ये गेलेल्या प्रसाद गावकर यांना पुन्हा काँग्रेस पक्षात खेचून आणले. त्यांनी आमच्या किरण कांदोळकरांनी नेले, आता आम्ही प्रसाद गावकर यांना काँग्रेसमध्ये आणले, असे ते म्हणाले.

समविचारी पक्षांचे एकत्रिकरण महत्वाचे : कामत

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी युतीची बोलणी समाधानकारक झाली. जागा वाटपाबाबतचा निर्णय हा सामंजस्याने होईल. त्यात शंकाच नाही. मुळात युती होणे व समविचारी पक्षांनी एकत्र आणणे हे आमचे ध्येय होते, असे दिगंबर कामत यांनी या प्रतिनिधीला दिल्लीहून सांगितले..

भाजपला सत्तेतून खाली खेचू : विजय सरदेसाई

राहुल गांधी यांच्या बरोबरची बोलणी यशस्वी झालेली आहे. गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षांत आहोत. राहुल गांधी यांच्या आजोबांनी म्हणजेच पं. नेहरू यांनी गोव्यात लष्कर पाठवून पोर्तुगीजांच्या तावडीतून गोव्याला मुक्त केले. तशीच काँग्रेस व गोवा फॉरवर्ड सेना आता गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षी जनतेला भ्रष्ट भाजप सरकारपासून मुक्ती देईल, असे विजय सरदेसाई म्हणाले.

Related Stories

जुने गोवेत हवा रेल्वे ओव्हरब्रीज

Amit Kulkarni

शेतकऱयांनी शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने पहावे यासाठी सरकारचे प्रयत्न

Patil_p

साखळेश्वर घुमटीनजीक देवाच्या सामुग्रीची विटंबना केल्याने संताप

Amit Kulkarni

गोवा डेअरीचा नफा-तोटा आमसभेतून जाहीर करा अन्यथा निवडणूक घ्या

Amit Kulkarni

गांधी मार्केटातील फळ-भाजी विक्रेते रवींद्र भवन मार्गावर दुकाने थाटणार

Patil_p

आठवडय़ातभरात अतिमहनीय व्यक्तींचे गोव्यात आगमन

Amit Kulkarni
error: Content is protected !!