तरुण भारत

बेळगाव-चोर्ला रस्त्याची दुरुस्ती करा

बेळगाव टेडर्स फोरमची सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी : रस्त्यामुळे व्यापाराला बसतोय फटका

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव व गोव्याला जोडणाऱया चोर्ला मार्गाची दुरवस्था झाली आहे. जांबोटी ते चोर्ला या दरम्यानचा रस्ता तर अनेक ठिकाणी खचला आहे. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक वाढली असल्याने वाहतूक करणे डोकेदुखीचे ठरत आहे. यामुळे गोव्याचे नागरिक बेळगावऐवजी इतर शहरांकडे खरेदीसाठी जात आहेत. याचा मोठा आर्थिक फटका बेळगावच्या व्यापारी वर्गाला बसत असून, बेळगाव-चोर्ला मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी बेळगाव टेडर्स फोरमतर्फे मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संजीव हुलीकाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

चोर्ला मार्ग हा गोव्याला जवळचा असल्याने वाहनचालकांची पसंती या मार्गाला अधिक असते. अद्याप रामनगर रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने संपूर्ण वाहतूक चोर्ला मार्गे वळविण्यात आली आहे. रस्ता अरुंद असून, त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक केली जात आहे. बेळगावमधून दररोज 100 हून अधिक ट्रक गोव्याला भाजीची वाहतूक होते. तर रात्रीच्यावेळी अडीचशे ते 300 अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. यामुळे हा संपूर्ण मार्ग कमकुवत झाला आहे. वाहतूक करणाऱया प्रवाशांसोबतच स्थानिकांनाही या मार्गाचा फटका बसत आहे.

गोव्याचे नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये दाखल होतात. त्यांच्यावरच बेळगावमधील अर्ध्याहून अधिक उलाढाल अवलंबून आहे. परंतु रस्ताच व्यवस्थित नसल्याने गोव्याचे नागरिक आता हुबळीकडे वळत आहेत. यामुळे याचा मोठा फटका बेळगावच्या व्यापाऱयांना बसत आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱयांना आता कुठे आशेचा किरण दिसत असतानाच पुन्हा एकदा रस्त्यामुळे व्यापार थंडावू लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी सीटीझन कौंन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य सेवंतीलाल शहा, अरुण कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते किरण गावडे, विकास कलघटगी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

15 दिवसांत होणार दुरुस्तीचे काम

बेळगाव-चोर्ला हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने हा मार्ग वरचेवर खराब होत आहे. काही दिवसांपूर्वीच कुसमळी येथील ब्रिजचे ऑडिट करण्यात आले आहे. बेळगाव टेडर्स फोरमच्या मागणीनुसार पुढील 15 दिवसांमध्ये रस्त्याच्या पॅचवर्क कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संजीव हुलीकाई यांनी दिले.

रस्ता कामाला प्रारंभ होण्याची शक्यता

बेळगाव टेडर्सच्या फोरमचे सतीश तेंडोलकर यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा चोर्ला रस्त्याच्या समस्येबाबत मेल पाठविला होता. त्याची दखल त्यांचे स्वीय सचिव वाडेकर यांनी घेतली. त्यांनी पीडब्ल्यूडी खात्याच्या  अधिकाऱयांकडूनही माहिती घेतली. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला आतातरी प्रारंभ होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

चोर्ला घाटातून जाणाऱया अवजड वाहनांवर वरदहस्त कुणाचा? ; बांधकाम खात्याने विनंती करूनही वाहतूक सुरूच

बेळगावमधून गोव्याला जाणारा चोर्ला महामार्ग दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. अवजड वाहनांना बंदी असताना देखील या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने वाहतूक करीत आहेत. ही अवजड वाहतूक सुरू ठेवण्यास कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कुसमळी येथील दगडी ब्रिज कमकुवत झाला असून केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

रामनगर-अनमोड रस्त्याचे काम अद्याप अर्धवट आहे. हे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत कोणतीच माहिती नाही. त्यामुळे गोवा व बेळगावच्या नागरिकांना चोर्लामार्गे वाहतूक करावी लागत आहे. लहान वाहनांसोबतच 40 टनाहून अधिक क्षमतेची वाहनेही वाहतूक करीत आहेत. यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या अवजड वाहनांचा फटका परिसरातील नागरिकांनादेखील  बसत आहे. दररोज 100 हून अधिक भाजीचे ट्रक व 400 हून अधिक इतर मालवाहू ट्रक या मार्गावरून ये-जा करीत आहेत.

बांधकाम खात्याचे आरटीओ व पोलिसांकडे बोट

चोर्ला रस्ता अत्यंत अरुंद असल्याने हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आरटीओ, पोलीस व जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठवून केली होती. दोन वर्षे उलटली तरी या मार्गावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. यामुळे घाटमार्गामध्ये वाहतूक कोंडी, अपघात वारंवार होत आहेत. अवजड वाहनांमुळे रस्ताही खराब होत आहे. जोपर्यंत अनमोड रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व अवजड वाहतूक आंबोलीमार्गे वळविण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने केली होती. परंतु त्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

कुसमळी ब्रिज झाला कमकुवत कुसमळीजवळ असणारा दगडी ब्रिज आता कमकुवत झाला आहे. या ब्रिजचे दगड आता ढासळू लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील पाणी ब्रिजवरून खाली पडत होते. यामुळे भगदाडही पडले होते. त्यामुळे अवजड वाहतूक करणे जीवघेणे ठरू शकते. असे असतानाही या ब्रिजवरील दररोज हजारो वाहने ये-जा करीत आहेत. रत्नागिरी येथील सावित्री नदीवरील ब्रिज कोसळण्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना या ठिकाणी होईपर्यंत प्रशासन वाट पाहणार का, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

Related Stories

स्वातंत्र्य लढय़ात बेळगावातील अधिवेशन महत्त्वाचे

Amit Kulkarni

स्वरमल्हार फौंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा संगीतसभा

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात एका दिवसात 81 बाधित

Patil_p

५२ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी १८ रुग्णालयांना नोटीस

Abhijeet Shinde

म. ए. समितीतर्फे पंच कमिटीचे अभिनंदन

Amit Kulkarni

अवैध बिपीएल कार्डे तातडीने रद्द करा

Rohan_P
error: Content is protected !!