तरुण भारत

जीएसटी संकलन, उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ

विकासदरापाठोपाठ आर्थिक आघाडीवर आणखी एक शुभवार्ता

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

सध्याच्या वित्तवर्षातील दुसऱया तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ नोंदविल्यानंतर आता उत्पादन क्षेत्रानेही गेल्या 9 महिन्यांमधील विकमी वाढ नोंदविली आहे. तसेच नोव्हेंबरमधील वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलनही मोठय़ा प्रमाणात वाढले असून 1 लाख 31 हजार कोटींवर पोहचले आहे. हा आकडा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा आहे. एकंदर आर्थिक क्षेत्रात सध्या समाधानकारक वातावरण आहे.

उत्पादन क्षेत्रातील वाढीची नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) पद्धतीने मोजली जाते. ‘आयएचएस मार्किट इंडिया मन्युफॅक्चरिंग परचेस मॅनेजर्स इंडेक्स’ असे याचे शास्त्रीय नाव आहे. या निकषानुसार सलग पाचव्या महिन्यात उत्पादन क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली असून नोव्हेंबरातील वाढीचा निर्देशांक 57.6 आहे. या पद्धतीनुसार निर्देशांक 50 असल्यास मागच्या महिन्यापासून या महिन्यापर्यंत कोणतीही वाढ नाही असा अर्थ होतो. ऑक्टोबरचा निर्देशांक 55.9 होता. नोव्हेंबरात त्यात आणखी दीड टक्का वाढ दिसून आली.

सरासरी समाधानकारक

पीएमआय नुसार गेल्या पाच महिन्यांमधील उत्पादन क्षेत्रातील वाढींची सरासरी 53.6 इतकी आहे. या निकषानुसार ही सरासरी समाधानकारक मानली जाते. हा निर्देशांक कारखान्यांकडून वस्तू ज्या प्रमाणात बाजारात पाठविल्या जातात त्यावर अवलंबून असतो. बाजारातील मागणी किती आहे, याचे अनुमान यावरुन काढता येते. सध्या बाजारात मागणी वाढत असून ही बाब अर्थचक्राची गती वाढविण्यासाठी साहाय्यभूत ठरत आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

रोजगारात वाढ

वस्तू उत्पादन क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण होत आहेत. ही वाढ लक्षणीय नसली तरी आशादायक आहे. गेल्या 20 महिन्यांमध्ये ही दुसरी सर्वात मोठी रोजगारवाढ आहे. देशांतर्गत बाजारांमध्ये वस्तूंच्या मागणीत वाढ होत असून विदेशी वस्तूही अधिक प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. निर्यातीतही किंचित वाढ झाली आहे. मात्र, ती ऑक्टोबरपेक्षा कमी प्रमाणात आहे.

चिंतेचीही काही कारणे

एकंदर, उत्पादन क्षेत्रात समाधान दिसत असले तरी महागाईचा परिणाम जाणवत आहे. महागाईमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहाला काही प्रमाणात मर्यादा पडत आहेत. त्यामुळे ‘पॉझिटिव्ह सेंटीमेंटस्’ निर्देशांकात काही प्रमाणात घट होऊन तो गेल्या 17 महिन्यातील नीचांकी पातळीवर आहे. मात्र, तो विशेष चिंतेचा विषय मानला जाता कामा नये, असे अर्थतज्ञांचे मत आहे. सध्या सणासुदीचा कालावधी संपल्याने खरेदीचा उत्साहही त्या प्रमाणात मंदावणे स्वाभाविक मानले जात आहे.

नव्या कोरोना वृत्तामुळे चिंता

कोरोनाचे ओमिक्रॉन हे रुप सध्या जगभरात चर्चेत आहे. त्यामुळे उत्पादकांची चिंता काहीशी वाढली आहे. सध्या कंपन्या अतिरिक्त दरवाढीचे ओझे उचलत आहेत. आऊटपुट चार्जेस किंचित वाढविण्यात आले आहेत. मात्र, ओमिक्रॉनचे संकट वाढल्यास आणि वाहतुकीची तसेच कच्च्या मालाच्या तुटवडय़ाची समस्या निर्माण झाल्यास वस्तूंचे दर वाढविणे अनिवार्य होईल, असे स्पष्ट करण्यात आले.

वस्तूसेवा कर संकलनात वाढ

नोव्हेंबरमधील वस्तू-सेवा कर संकलनाचे (जीएसटी) आकडेही घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात एकंदर संकलन 1 लाख 31 हजार 526 कोटी रुपयांचे झाले आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत यात काही प्रमाणात वाढ झाली. ऑक्टोबरात संकलन 1 लाख 30 हजार कोटींचे होते. नोव्हेंबरातील संकलन आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे आहे. एप्रिल 2021 मध्ये सर्वाधिक, अर्थात, 1 लाख 41 हजार कोटी रुपयांचे संकलन झाले होते.

या करसंकलनात केंद्रीय कराचा वाटा 23,978 कोटी, राज्यांचा वाटा 31,127 कोटी तर सामायिक वाटा 66,815 कोटींचा आहे. अधिभाराचा (सेस) वाटा 9,607 कोटीचा आहे. संकलन वाढले असले तरी अपेक्षेइतके नाही. नोव्हेंबरात आतापर्यंतचे सर्वाधिक संकलन होईल, अशी अपेक्षा होती. ती साध्य झाली नसली तरी स्थिती सुदृढ असल्याचे दिसून येते. नोव्हेंबरात ई-बिलचेही प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबरात एकंदर 7.35 कोटी ई-बिल जमा झाले. ई-बिलच्या संख्येवरुन पुढील महिन्यात किती करसंकलन होईल याचे अनुमान काढता येते.

आणखी वाढ शक्य

ड पुढील महिन्यांमध्ये उत्पादन आणि करसंकलनात आणखी वाढ शक्य

ड अर्थव्यवस्था वेगवान होत असल्याची सुचिन्हे, मागणीमध्ये चांगली वाढ

ड उत्पादन क्षेत्राला आणखी मागणीची आवश्यकता, ओमिक्रॉनची चिंता

Related Stories

खुषखबर, एका दिवशी 705 रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

GDP चा वेग मंदावणार

datta jadhav

तीन कोटी शेतकऱ्यांना 4 लाख कोटी पेक्षा अधिक कर्ज : निर्मला सीतारामन  

Rohan_P

केंद्रीय मंत्र्याच्या भावाला मिळेना बेड

datta jadhav

”माझी सर्वांना विनंती आहे की, आमचा त्रास वाढवू नका ” – हॉकीपटू वंदना कटारिया

Abhijeet Shinde

भारतीय लष्कराने ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा केला खात्मा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!