तरुण भारत

काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी ?

ममता बॅनर्जी- शरद पवार यांच्या बैठकीत संकेत

Advertisements

प्रतिनिधी/, मुंबई ः

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी महाविकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप हटाव भूमिका घेत 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी ‘थर्ड प्रंट’चे संकेत दिले आहेत. शरद पवार यांनीही त्यांच्या भूमिकेला सहमती दर्शविली आहे. ही आघाडी काँग्रेसशिवाय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी भाजपविरोधात एकत्र यावे, अशी भाषा करतानाच ममता बॅनर्जी यांनी काँगेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावरच अप्रत्यक्ष हल्ला चढविल्याने गोंधळ निर्माण झाला.

‘अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषणा करत 2014 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीकडून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने हिसकावून घेतलेली सत्ता नंतर 2019 मध्येही कोणाला घेता आलेली नाही. उलट 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आणि मोदींचे नेतृत्व अधिक मजबूत झाले. त्यामुळे आता निदान 2024 च्या लोकसभा निडणुकीत एनडीए आणि मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पदच्युत करण्यास विरोधक सरसावले आहेत.

तिसऱया आघाडीचा 2019 मध्ये फसलेला प्रयोग आता 2024 च्या निवडणुकीसाठी पुन्हा करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात म्हणून बॅनर्जी यांनी मुंबईचा दौरा करत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याचे टाळले. हीच आघाडी होण्यातील खरी पाचर ठरणार आहे.

राहुल गांधीवर अपत्यक्ष हल्ला

जे लोक काम करीत नाहीत आणि नेहमी परदेशात जात राहतात, त्यांच्यासह काम कसे करायचे, अशी भाषा ममता बॅनर्जी यांनी केली. काँगेसशिवाय भाजपविरोधात आघाडी होऊ शकेल काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांच्या या उत्तरामुळे आणखी काही प्रश्न निर्माण झाले आहेत. काँगेसशिवाय भाजपविरोधी आघाडी होऊ शकत नाही, असे मत काही ज्येष्ठ काँगेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. त्यामुळे भाजप विरोधी गटात एकंदर अद्यापही अनिश्चिततेचे वातावरण आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेतेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर  शरद पवार आणि ममता यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. पवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. भाजप विरोधात असणाऱयांनी राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी एकत्र यायला हवे. त्याच विषयावर चर्चा झाली. मात्र काँग्रेसला वगळून मोदी सरकारला पर्याय उभा केला जात असल्याची साशंकता प्रसार माध्यमांनी उपस्थित करताच पवार म्हणाले, सगळ्यांना एकत्र घेऊन जायचे आहे. जो मेहनत करेल त्यांच्यासोबत पुढे जाऊ. देशात भाजपला पर्याय उभे करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतोय. ज्यांची मेहनतीची तयारी असेल ते सगळे बरोबर असतील. काँग्रेसला बाजूला करून कोणताही पर्याय देणार नाही, असे ते म्हणाले.

सक्षम माणसांची गरज

ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपला राष्ट्रीय पातळीवर पर्याय देण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा करण्यासाठीच इथे आले. मात्र त्यासाठी तितक्याच सक्षम आणि मेहनतीची तयारी असणाऱया माणसांची गरज आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यांनी जे सांगितलंय त्याच्याशी सहमत आहे, असेही त्या म्हणाल्या.

नेतृत्व दुसरी गोष्ट

या संभाव्य तिसऱया आघाडीच्या नेतृत्वाबाबत पवार म्हणाले, आम्ही कोणाच्या नेतृत्वात काम करणार ही दुसरी गोष्ट आहे. पण आधी एकत्र येणे आवश्यक आहे. ज्याच्यावर देशाचा विश्वास असेल असा पर्याय उभा करावयाचा आहे. इथे लीडरचा विषयच नाही, असे सांगितले.

शिवसेना नेत्यांशीही भेट

त्याआधी ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचीही हॉटेल ट्रायडंट येथे भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुगणालयात उपचार घेत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. यावेळी राजकीय विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

विविध मान्यवरांच्या भेटी

बुधवारी सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका चर्चासत्रात ममता यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे संकेत दिले. या चर्चासत्रात स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेदरम्यान राजकीय मुद्यांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.

काय आहे युपीए ? ः ममता

काँग्रेसप्रणित युपीए आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि तृणमूलमधील भेटीनंतर ‘युपीए’बाबत प्रश्न विचारल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ‘काय आहे युपीए, युपीए आता उरली नाही’ असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोघे एकत्र येऊन काँग्रेसला बाजूला ठेवणार काय, याची चर्चा जोर धरु लागली आहे. पवारांनी युपीएचे नेतृत्व करावे काय या प्रश्नाला खोचक उत्तर देताना ममता यांनी युपीएचे अस्तित्वच जणू निकाली काढले. लढतो तो स्ट्राँग, जो लढतच नाही त्याला आम्ही काय करणार असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसला टिकेचे लक्ष्य केले.

ममतांच्या मताशी सहमत ः पवार

तर याच प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनीही गुगली टाकली. ममता बॅनजा aयांच्या मताशी सहमत असल्याचे पवार म्हणाल्यानंतर मात्र या भेटीचे गांभिर्य राजकीय वर्तुळामध्ये जाणवू लागले आहे. ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये मिळवलेला विजय कष्टकरी कार्यकर्त्यांचा आहे. तळागाळात काम करणाऱया तृणमूलच्या लाखो कार्यकर्त्यांमुळे आणि ममतांच्या लढावू बाण्याने हे शक्य झाल्याचे सांगत पवार यांनी ममता यांचे कौतुक केले. त्यामुळे काँग्रेसशिवाय थर्ड पंटची समीकरणे जुळवण्यास सुरुवात झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

अहंकार नकोय, एकजूट हवीय ः नाना पटोले

भाजपसारख्या हुकूमशाही वृत्तीच्या पक्षाविरोधात लढण्यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षाही देशहिताची जाणीव महत्त्वाची आहे. या लढाईत अहंकार नाहीतर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. भाजप हा संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने लढत आहे, याची जाणीव भाजपविरोधात एकत्र येताना लक्षात घेण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देताना मांडले.

Related Stories

नितीश सरकारचे अजब फर्मान; सरकार विरोधात आंदोलन केल्यास नोकरी नाही!

Rohan_P

उत्तराखंडात मागील 24 तासात 546 नवीन कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Rohan_P

समीर वानखेडे यांची बदली ?

Patil_p

“पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका”

Abhijeet Shinde

स्थलांतरितांचा स्वगृही परण्याचा मार्ग मोकळा

Patil_p

राजस्थान पेचप्रसंग अद्यापही कायम

Patil_p
error: Content is protected !!