तरुण भारत

रोहित, कोहली, अश्विनचे मानांकन जैसे थे

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरची धमाकेदार एन्ट्री, टॉम लॅथमचा फलंदाजीत टॉप टेनमध्ये समावेश

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत रोहित शर्मा व विराट कोहली तर गोलंदाजांच्या यादीत ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपले स्थान कायम राखले. रोहित पाचव्या तर कोहली सहाव्या स्थानी कायम असून अश्विनने आपले दुसरे स्थान अबाधित राखले. बुमराह एका अंकाने खाली घसरत 10 व्या स्थानी आला.

अश्विनचा अपवाद वगळता वरील तिन्ही खेळाडू यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात संघात समाविष्ट नव्हते. पदार्पणवीर श्रेयस अय्यरने 105 व 65 धावांच्या दमदार खेळींसह फलंदाजांच्या मानांकन यादीत 74 व्या स्थानी उत्तम एन्ट्री केली.

सलामीवीर शुभमन गिल 6 अंकांनी वर येत 66 व्या स्थानी झेपावला. वृद्धिमान साहा 9 अंकांनी वर, 99 व्या स्थानी पोहोचला आहे. रविंद्र जडेजा सामन्यात 5 बळींसह गोलंदाजांच्या यादीत 19 व्या स्थानी तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱया स्थानी झेपावला. अश्विन अष्टपैलू खेळाडूंमध्ये तिसऱया तर फलंदाजांच्या यादीत 79 व्या स्थानी आहे.

न्यूझीलंडतर्फे टॉम लॅथमची अनुक्रमे 95 व 52 धावांची खेळी पहिल्या दहामध्ये समाविष्ट स्थान संपादन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. तो 14 वरुन 9 व्या स्थानी पोहोचला. काईल जेमिसन दोन्ही डावात प्रत्येकी 3 बळींसह गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानी विराजमान आहे. टीम साऊदीने 15 रेटिंग गुण प्राप्त केले असून दुसऱया स्थानावरील अश्विनच्या (840) तुलनेत तो केवळ एका गुणाने मागे आहे.

शाहिन प्रथमच पहिल्या पाचमध्ये

ताज्या मानांकन यादीत पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील कसोटीचे प्रतिबिंब उमटले असून पाकिस्तानचा जलद गोलंदाज शाहिन आफ्रिदीने कारकिर्दीत प्रथमच पहिल्या पाचमध्ये स्थान संपादन केले आहे. 21 वर्षीय शाहिनने चित्तगाव कसोटीत 7 बळी घेतले. यात दुसऱया डावात त्याने 32 धावात 5 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. नव्या चेंडूवर शाहीनचा सहकारी गोलंदाज हसन अली देखील कारकिर्दीतील सर्वोत्तम 11 व्या स्थानी झेपावला. त्यानेही शाहीनप्रमाणे 7 बळी घेतले आणि यात पहिल्या डावात त्याने 5 फलंदाज गारद केले होते.

फलंदाजांमध्ये अबिद अलीचा दोन्ही डावात शतके झळकावण्याचा प्रयत्न निसटत्या फरकाने अपयशी ठरला असला तरी अनुक्रमे 133 व 91 धावांच्या खेळीमुळे तो कारकिर्दीतील सर्वोत्तम 20 व्या स्थानी पोहोचला. पहिल्या डावात 7 व सामन्यात 8 बळी घेणाऱया बांगलादेशच्या डावखुऱया फिरकीपटू तैजूल इस्लामने गोलंदाजांमध्ये 23 वे स्थान मिळवले आहे. 147 व 83 धावांच्या खेळीसह सामनावीर पुरस्कार संपादन करणाऱया श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेने सातव्या स्थानी झेप घेतली आहे.

Related Stories

दुसऱया कसोटीतून कर्णधार विल्रयम्सन बाहेर

Patil_p

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

सलग 3 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी लॉरा पहिली ब्रिटीश महिला

Patil_p

एचएस प्रणॉयचा रोमांचक विजय

Patil_p

टी-20 विश्वचषकाचा निर्णय ऑगस्टअखेर

Omkar B

राजस्थान, पंजाब, केकेआर संघांचे युएईमध्ये आगमन

Patil_p
error: Content is protected !!