तरुण भारत

विराट परतल्यानंतर संघनिवडीत स्वागतार्ह पेच

न्यूझीलंडविरुद्ध दुसरी व शेवटची कसोटी उद्यापासून, खराब फॉर्ममधील रहाणे-पुजाराला व्यवस्थापनाचे पाठबळ

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

न्यूझीलंडविरुद्ध उद्यापासून (शुक्रवार दि. 3) खेळवल्या जाणाऱया दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली भारतीय संघात परतत असून यामुळे अंतिम संघनिवडीचा पेच व्यवस्थापनासमोर असणार आहे. यापूर्वी, अनिर्णीत राहिलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने पदार्पण करताना अनुक्रमे 105 व 65 धावांची शानदार खेळी साकारली होती. त्यामुळे, अंतिम संघनिवड करणे कसरतीचे असणार आहे.

2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत कर्णधारपद भूषवणाऱया अजिंक्य रहाणेला अद्याप खराब फॉर्मशी झगडावे लागले असून या वर्षभरात खेळलेल्या 12 सामन्यात त्याची सरासरी 20 च्या आसपास राहिली आहे. आघाडीचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अनेकदा आश्वासक सुरुवात केली असली तरी याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात तो कमालीचा अपयशी ठरत आला आहे. अर्थात, या दोन्ही फलंदाजांचा अनुभव पाहता एखाद्या मोठय़ा खेळीसह ते बहरात येऊ शकतात, हे स्पष्ट असल्याने यामुळे संघनिवडीत कोणाला झुकते माप द्यायचे, हे ठरवताना निवडकर्त्यांचा कस लागू शकतो.

पहिल्या कसोटी सामन्यातील शेवटच्या सत्रात रचिन रविंद्र व अजाझ पटेल यांनी अंधुक प्रकाशाचा लाभ घेत लढत अनिर्णीत राखण्यात यश मिळवून दिले, ते लक्षवेधी ठरले. अजाझ पटेलचा जन्म मुंबईतील असून दुसऱया कसोटी सामन्यात त्याचे काही नातेवाईक स्टँड्समध्ये असतील. त्यामुळे, तोही येथे खेळण्यास उत्सुक आहे. ‘मी वानखेडे स्टेडियमवर यापूर्वी काही वेळा आलो आणि आयपीएलचे सामने पाहिले आहेत. मुंबईच्या फलंदाजांना काही वेळा सराव सत्रात मी गोलंदाजीही केली आहे. येथे खेळण्यासाठी मी उत्सुक आहे’, असे अजाझ याप्रसंगी म्हणाला. 2018 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱया अजाझने न्यूझीलंडतर्फे 10 कसोटी सामने खेळले आहेत.

दोन-एक कसोटी सामन्यात इशांतला सूर सापडेल ः पारस म्हाम्ब्रे

सध्याच्या अननुभवी संघात 100 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू असणारा इशांत शर्मा तूर्तास खराब फॉर्ममधून जात असला तरी पुढील दोन-एक सामन्यात त्याला उत्तम सूर सापडेल, असा विश्वास भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी व्यक्त केला. 33 वर्षीय इशांत शर्मा यापूर्वी इंग्लंड दौऱयात सपशेल अपयशी ठरला. शिवाय, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही.

‘इशांतने प्रदीर्घ कालावधीपासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. आयपीएल, टी-20 वर्ल्डकपमध्येही त्याचा समावेश नव्हता. मॅच प्रॅक्टिस नसल्याने त्याला अद्याप सूर सापडलेला नाही’, असे पारस पुढे म्हणाले. उंचापुऱया इशांत शर्माने मागील 4 कसोटी सामन्यात 109.2 षटके गोलंदाजी केली असून यात त्याला केवळ 8 गडी बाद करता आले आहेत.

300 पेक्षा अधिक कसोटी बळी घेणाऱया इशांतसमोर येथे स्वतः प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचे आव्हान तर असेल. शिवाय, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णासारख्या युवा गोलंदाजांना प्रेरणा देण्याची जबाबदारीही असणार आहे.

पावसामुळे दोन्ही संघांचे सराव सत्र रद्द

बुधवारी संततधार पाऊस बरसत राहिल्याने भारत व न्यूझीलंडच्या संघांना वानखेडे स्टेडियमवरील सराव सत्र पूर्ण रद्द करावे लागले. दक्षिण मुंबईत दिवसभर पाऊस होत राहिल्याने सराव सत्र होणे अशक्य होते. दोन्ही संघ मंगळवारी सायंकाळी कानपूरहून मुंबईत दाखल झाले आहेत.

वृद्धिमान साहाच्या उपलब्धतेविषयी निर्णय अंतिम क्षणीच कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा मानेच्या दुखापतीमुळे यष्टीरक्षणाला उतरु शकला नव्हता. त्यावेळी नवोदित केएस भरतने यष्टीरक्षणाची धुरा सांभाळली होती. आता दुसऱया कसोटीत साहा उपलब्ध होणार का, याबद्दल सध्या काहीही चित्र स्पष्ट नाही. साहाच्या उपलब्धतेविषयी अंतिम क्षणीच निर्णय घेतला जाईल, असे व्यवस्थापनाने नमूद केले आहे. साहाऐवजी केएस भरत संघात आल्यास खराब फॉर्ममधील अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांचे स्थान अबाधित राहील, असाही मतप्रवाह आहे

Related Stories

कर्णधार ब्रेथवेट शतकाच्या समीप, विंडीज 7 बाद 287

Patil_p

प्रो कबड्डी लीग : तामिळ थलैवाज, जयपूर पिंक पँथर्स विजयी

Patil_p

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे सराव सामने

Patil_p

सिंधू, दीपिका कुमारी, पूजा राणीचे धडाकेबाज विजय

Patil_p

एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती

datta jadhav

पाकिस्तानचा झिम्बाब्वेविरुद्ध 11 धावांनी विजय

Patil_p
error: Content is protected !!