तरुण भारत

मुरगाव मतदारसंघात भाजपासमोर धर्मसंकट

काठावरचा विजय यंदा निसटण्याचा धोका

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

भाजपाने वास्को मतदारसंघासाठी पर्याय उभा केलेला आहे. मुरगाव मतदारसंघाने मात्र, भाजपासमोर धर्मसंकट उभे केलेले आहे. भाजपाची मुरगावच्याबाबतीत ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली आहे. मागच्या वेळी काटावर जिंकलेला हा मतदारसंघ यंदा निसटण्याचा धोका बळावलेला असून या मतदारसंघात भाजपाला नवा पर्याय उपलब्ध करणे जवळजवळ अशक्य ठरणार आहे. मुरगावात सध्या बदलाचे वारे वाहू लागलेले आहे. या परिस्थितीवर भाजपा कशापध्दतीने मात करते हे पाहावे लागेल.

मुरगाव मतदारसंघात भाजपाने मागच्या पंधरा वर्षांत प्रथम विरोधक म्हणून आणि नंतरची दहा वर्षे सत्ताधारी म्हणून गाजवली. अनेक विकासकामेही धडाक्यात पूर्ण झाली. मोठय़ा संख्येने रोजगारही उपलब्ध केला. मंत्री मिलिंद नाईक हेच या यशाचे हिरो ठरले. मात्र, मागच्या निवडणुकीवेळी जनतेने त्यांना काटावरचेच यश दिले. सत्ताधारी मंत्र्याला पाडण्याचाच प्रयत्न जनतेने त्यावेळी केल्याचे दिसून आले होते. मात्र, पालिका निवडणुकीत मिलिंद नाईक यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाने चांगले यश मिळवले. पाच वर्षांपूर्वीच्या पालिका निवडणुकीतसुध्दा भाजपाला विजयी केलेल्या मतदारांनी विधानसभा निवडणुकांत मात्र, धोका देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात बदलाचे वारे वाहात असले तरी पुन्हा काटावरचा विजय किंवा काटावरचा पराभव अशी परिस्थिती भाजपाच्या वाटय़ाला येऊ शकते. याच परिस्थितीची चिंता पक्षाला करावी लागणार आहे. मुरगाव मतदारसंघाच्या राजकारणाने सध्या भलतेच वळण घेतलेले आहे. गेले वर्षभर चाललेली एक गंभीर  चर्चा खरी ठरू लागल्याने खळबळही माजलेली आहे. त्यामुळे भाजपाला नकारार्थी वातावरणाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पक्षाला धोकादायक ठरू शकणारे हे वातावरण दूर करण्यासाठी भाजपा कोणती राजकीय रणनीनी आखते याच्यावर सर्वांच्याच नजरा आहेत.

मुरगावात भाजपाला मंत्री मिलिंद नाईक यांच्याशिवाय पर्याय नाही

वास्को मतदारसंघासाठी भाजपाने दाजी साळकर यांच्या रूपाने जनतेला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न चालवला आहे. केवळ औपचारीकता बाकी आहे. कुठ्ठाळी मतदारसंघासाठी भाजपा नवीन उमेदवारासाठी चाचपणी करीत असल्याची चर्चा आहे. आमदार एलिना साल्ढाना यांच्या ऐवजी एखादा रेडिमेड उमेदवार भाजपाला हवा असल्यास या मतदारसंघात मिळू शकतो. मात्र, मुरगावात फारच अडचण आहे. वास्कोसाठी सहज पर्याय उपलब्ध केलेल्या भाजपाला मुरगावमध्ये पर्यायी नेतृत्व देणे मात्र कठीण ठरणारे आहे. मुरगाव मतदारसंघ भाजपाच्या हातातून निसटण्याचा धोका असला तरी मंत्री मिलिंद नाईक यांची या मतदारसंघावर पकड आहे. त्यांच्या तोडीचा पर्याय भाजपाकडे मुरगावमध्ये नाही. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी जरी पक्षाच्या मनात मंत्री मिलिंद नाईक यांचा पत्ता कट करण्याचा विचार आला तरीसुध्दा निवडणुकीत यश मिळण्याची शाश्वती नाही. पक्षाने दुसऱया फळीचे नेतृत्व या मतदारसंघात तयार ठेवलेले नाही. या मतदारसंघात एखादा दाजी साळकर भाजपाच्या हाती लागण्याचीही शक्यता नाही. मुरगावात मागच्या दोन निवडणुकांमध्ये मिलिंद नाईक आणि संकल्य आमोणकर यांच्यामध्येच थेट लढती झालेल्या आहेत. त्यामुळे दुसऱया एखादय़ा पक्षाचा उमेदवार आपल्याकडे खेचण्याची संधीही भाजपाला उपलब्ध नाही. मंत्री मिलिंद नाईक यांचे भाजपाच्या गोव्यातील वरीष्ठ नेत्यांकडे असलेले सलोख्याचे संबंधही त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात अडचणीचे ठरू शकतात.

मुरगावात संजय सातार्डेकर यांच्या नावाची सुप्त चर्चा

मुरगाव मतदारसंघात हल्ली संजय सातार्डेकर यांच्या नावाचीही सुप्त चर्चा आहे. पराभवाच्या भितीने जर पक्षाने मिलिंद नाईक यांना उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न केला तर संजय सातार्डेकर यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे असेल असे बोलले जात आहे. सातार्डेकर हे मुरगावचे माजी नगरसेवक तसेच भाजपा मंडळाचे अध्यक्ष आहेत. गोवा आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्षही आहेत. काही काळ वास्को रविंद्र भवनचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवीले आहे. मंत्री मिलिंद नाईक यांच्या खांदय़ाला खांदा लावूनच गेली दहा वर्षे ते मिलिंद नाईक यांच्या आणि पर्यायाने भाजपाच्या विजयासाठी झटत आलेले आहेत. मात्र, त्यांनी भाजपाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी ईच्छा कधी व्यक्त केलेली नाही. मंत्री मिलिंद नाईक आणि भाजपाशी ते आतापर्यंत प्रामाणिक राहिलेले आहेत. पर्यायी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सध्या तरी सुप्त चर्चा ऐकू येते. एखादा कठीण प्रसंग उद्भभवल्यास भाजपा त्यांच्यावरच उमेदवारी लादण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बालेकिल्ला ढासळण्याच्या धोक्यावर भाजपाला करावी लागणार मात

भाजपाला आजच्या घडीस वास्को, मुरगाव आणि कुठ्ठाळी या तीन मतदारसंघात आव्हानात्मक परिस्थिती आहे. वास्को व कुठ्ठाळीत नवे चेहरे उभे करून भाजपा जनतेकडे मतांचे दान मागू शकतो. मात्र, मुरगावचे काय असा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे. तसे पाहता मुरगाव मतदारसंघाने भाजपासमोर धर्मसंकट उभे केलेले आहे. हे धर्मसंकट पुढील काळात अधिकच घोंगावणार आहे. मंत्री मिलिंद नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिल्यासही पराभवाचा धोका आहे. आणि पर्यायी उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्यासही पराभवाचाच धोका आहे. तात्पर्य, मुरगाव हा भाजपाचा बालेकिल्ला यंदा ढासळण्याचा धोका आहे. या धोक्यावर भाजपा कशापध्दतीने मात करते हे पाहावे लागेल.

Related Stories

वाहतूक कार्यालये, ढाबे ‘स्कॅनर’खाली येणे गरजेचे

Omkar B

अग्निशामक दलाच्या कवायतीवेळी सोशल डिस्तस्निंगचा फज्जा

Amit Kulkarni

राजबाग-तारीर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात

Amit Kulkarni

काही घरे जमीनदोस्त तर हजारो घरांना धोका

Patil_p

जलस्रोतमंत्र्यांची साळावली धरणाला भेट

Patil_p

सरकारने ऊस शेतकऱयांचे हित सांभाळले : केपेकर

Omkar B
error: Content is protected !!