तरुण भारत

ओमिक्रॉन व्हेरियंटचा भारतात शिरकाव

कर्नाटकात सापडले सात कोरोनाबाधित : मास्क वापरण्याची आरोग्य मंत्रालयाची सूचना

सरकारनुसार…

Advertisements
  • कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने फैलावण्याची शक्यता आहे, हा डेल्टापेक्षा 5 पट अधिक संक्रमक असू शकतो.
  • जगभरात आढळून आलेल्या याच्या सर्व रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून आली आहेत.
  • आतापर्यंत अशा रुग्णांमध्ये कुठलेच गंभीर लक्षण दिसून आलेले नाही, डब्ल्यूएचओ यावर अध्ययन करत आहे.

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटकात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे सात रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरियंटचे सात बाधित आढळल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी गुरुवारी सांगितले.

मागील 24 तासांमध्ये देशात ओमिक्रॉनच्या 7 रुग्णांची नोंद झाली. यातील  66 वर्षीय एक व्यक्ती आणि 46 वर्षीय व्यक्तीमध्ये प्रारंभी ओमिक्रॉन व्हेरियंटचे संक्रमण आढळले. त्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांनाही ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाच्या ओमिक्रान व्हेरियंटचे आतापर्यंत कुठलेच गंभीर लक्षण नोंद झाले नसल्याचे संयुक्त सचिव अग्रवाल म्हणाले. प्रारंभीचे दोन्ही रुग्ण विदेशी असून ते 11 आणि 20 नोव्हेंबर रोजी बेंगळूरमध्ये पोहोचले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची ओळख पटविण्यात आली होती. आता बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व रुग्णांवर बेंगळूरमधील सरकारी रुग्णालयाच्या विशेष कक्षात उपचार सुरू आहेत.

लॉकडाऊनची गरज नाही

देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यावर लॉकडाऊन लागू होणार का असा प्रश्न विचारण्यात आला असता नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सध्या याची गरज नसल्याचे म्हटले आहे. नव्या आव्हानाला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि याकरता आमच्याकडे सर्व गेष्टी उपलब्ध आहेत. आम्हाला घाबरायचे नाही, मास्क परिधान करणे ही लोकांची जबाबदारी असल्याचे पॉल यांनी नमूद केले.

बूस्टर डोसवर अध्ययन

पूर्ण जगात ओमिक्रॉन व्हेरियंटचे संक्रमण आणि त्यांचा प्रभाव जाणून घेतला जातोय. लसीच्या बूस्टर डोससाठी अध्ययन केले जातेय. स्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे डॉ. पॉल यांनी सांगितले.

जागरुकतेची गरज

आरोग्य मंत्रालयाकडून स्थापन 37 प्रयोगशाळांची संघटना आयएनएसएसीओजीच्या जीनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील ओमिक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध लागला आहे. आम्ही घाबरून जाण्याची गरज नाही, पण जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. कोरोना स्थितीत उपयुक्त वर्तनाची आवश्यकता असल्याचे उद्गार आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी काढले आहेत.

29 देशांमध्ये व्हेरियंटचा फैलाव

दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगातील अनेक देशांमध्ये भीती पसरली आहे. नव्या व्हेरियंटमुळे कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त होतेय. केंद्र सरकारनुसार 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचे 373 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. जगभरात सद्यकाळात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसून येतेय. मागील एक आठवडय़ात जगातील 70 टक्के रुग्ण युरोपमधील आहेत. एका आठवडय़ात युरोपमध्ये 2.75 लाख कोरोनाबाधितांची नेंद झाली. यादरम्यान हजारो मृत्यू युरोपमध्ये झाले आहेत.

आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक?

संपूर्ण जगभरात भीती निर्माण केलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंत्री, आरोग्य तज्ञांशी चर्चा करून कठोर नियम जारी करणार असल्याचे समजते.

आवश्यकता भासल्यास मार्गसूचीत बदल : मुख्यमंत्री

बेंगळुरात आढळून आलेला ओमिक्रॉन धोकादायक नाही. ओमिक्रॉनवर नियंत्रण आणण्याबाबत तज्ञांशी चर्चा केली असून तज्ञांनीही भीती बाळगण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास मार्गसूचीमध्ये बदल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन रुग्णावर उपचार करण्यासाठी आम्ही आवश्यक तयारी केली आहे. तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

देशात होतेय लॉकडाऊनची तयारी? केंद्रीय गृहमंत्री म्हणाले…

datta jadhav

भारताला जगभरात नवीन ‘फार्मा हब’ म्हणून स्वीकृती

datta jadhav

देशात 17.93 लाख सक्रिय रुग्ण

datta jadhav

उत्तराखंड कॅबिनेट मंत्री हरक सिंह बडतर्फ

Patil_p

अफगाणिस्तानातील 25 भारतीय NIA च्या रडारवर

datta jadhav

विक्रमी 28,472 रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p
error: Content is protected !!