तरुण भारत

पीव्ही सिंधूचा बाद फेरीत प्रवेश, सात्विक-चिराग यांची माघार

श्रीकांत, अश्विनी-सिक्की रेड्डी यांचा पराभव

वृत्तसंस्था /बाली, इंडोनेशिया

Advertisements

दोनदा ऑलिम्पिक पदके जिंकणाऱया भारताच्या पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सच्या बाद फेरीत स्थान मिळविले तर के. श्रीकांतला पराभवाचा धक्का बसला. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्प्पा व एन. सिक्की रेड्डी यांना सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला.

गट अ मधील दुसऱया सामन्यात सिंधूने जर्मनीच्या वायव्होन ली हिच्यावर 21-10, 21-13 अशा सरळ गेम्सनी विजय मिळविला. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही एकमेव भारतीय असून जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर असणाऱया ली हिच्यावर तिने केवळ 31 मिनिटात विजय साकारला. गटातील शेवटच्या साखळी सामन्यात तिची लढत थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवाँगशी होणार आहे.

श्रीकांतला पराभवाचा धक्का

पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असणाऱया किदाम्बी श्रीकांतने 2014 मध्ये बाद फेरीत प्रवेश मिळविला होता. पण यावेळी गट ब मधील दुसऱया सामन्यात त्याला ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन थायलंडच्या कुनलावत विदितसर्नकडून 18-21, 7-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने बाद फेरी गाठण्याच्या त्याच्या आशेला धक्का बसला आहे. अंधुक प्रकाशामुळे काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. त्यावेळी दुसऱया गेममध्ये श्रीकांत 6-13 असा पिछाडीवर होता. विदितसर्नकडून झालेला श्रीकांतचा हा तिसरा पराभव आहे. याआधी सुदिरमन चषक आणि आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्येही तो पराभूत झाला होता.

गट ब मध्ये मलेशियाचा द्वितीय मानांकित ली झी जिया 2 गुणांसह आघाडीवर असून श्रीकांत व विदितसर्न यांचा प्रत्येकी एक गुण झाला आहे. श्रीकांतप्रमाणे विदितसर्ननेही एक सामना जिंकला व एक गमविला आहे. शेवटच्या साखळी सामन्यात श्रीकांतची लढत ली जियाशीच होणार आहे तर विदितसर्न फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हशी लढणार आहे. यातील विजयी खेळाडू टॉप दोनमध्ये येणार असल्याने ते बाद फेरीत पोहोचतील. दोघेही विजयी झाल्यास जिंकलेल्या गेम्सच्या आधारे निकाल लावण्यात येईल.

सात्विकसाईराज-चिरागची माघार

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी सलग दुसऱया सामन्यात पराभूत झाल्या. बल्गेरियाच्या गॅब्रिएला स्टोएव्हा व स्टेफनी स्टोएव्हा यांच्याविरुद्ध झालेल्या झुंजार लढतीत त्यांना 21-19, 22-20 असा पराभव स्वीकारावा लागला. गट ब मधील त्यांची शेवटची साखळी लढत इंग्लंडच्या क्लो बिर्च व लॉरेन स्मिथ यांच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियाच्या अग्रमानांकित मार्कस फर्नाल्डी गिडॉन व केविन संजया सुकामुल्जो यांना पुढे चाल दिली. सात्विकसाईराजच्या गुडघ्याला वेदना होऊ लागल्यामुळे त्यांनी या सामन्यातून माघारीचा निर्णय घेतला. बुधवारी भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनला बाद फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय याच अ गटात असणाऱया डेन्मार्कच्या रासमुस गेम्केनेही माघार घेतली. जपानच्या केंटो मोमोटाने पाठदुखीमुळे माघार घेतल्याने लक्ष्य सेनला आगेकूच करण्याची संधी मिळाली तर गेम्केने आपल्याच देशाच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुढे चाल दिली. लक्ष्य सेन, ऍक्सेलसेन यांचे बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

Related Stories

व्हिसाची हमी दिल्यास पाकिस्तान दहशतवाद थांबवणार का?

Patil_p

सोशल डिस्टन्सिंग’बद्दल जनजागृती करा

Patil_p

कसोटी क्रमवारीत केन विल्यम्सनची अग्रस्थानावर झेप

Patil_p

विंडीज दौऱयासाठी पाक संघात नसीम, अब्बासचा समावेश

Patil_p

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा ‘व्हाईटवॉश’

Amit Kulkarni

पहिला सामना जिंकून न्यूझीलंडची मालिकेत आघाडी

Patil_p
error: Content is protected !!