तरुण भारत

भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी आजपासून

खराब हवामानाची चिंता ,व्यवस्थापनासमोर अंतिम संघनिवडीचा पेच, खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक राहण्याची शक्यता

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली भारतीय संघात परतला असून आजपासून (शुक्रवार दि. 3) न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱया दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात एकीकडे, खराब हवामानाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे, खेळ सुरु होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय संघाला अंतिम निवडीचा पेच सोडवावा लागेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 9.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होत आहे.

कानपूरमधील पहिली कसोटी अतिशय नाटय़मयरित्या ड्रॉ राहिल्यानंतर येथे नियमित कर्णधार विराट कोहली संघात परतत असल्याने भारतीय संघासाठी ही मजबुतीची बाजू ठरु शकते. पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय कायम राहिल्यास पूर्ण दिवसाचा खेळ वाया जाऊ शकतो आणि यामुळे उर्वरित 4 दिवसांच्या खेळात दोन्ही संघांना विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल, हे स्पष्ट आहे.

एरवी भारतीय संघ एका कसोटीत अपेक्षित कामगिरी झाली नाही म्हणून पुढील कसोटीत व्यापक फेरबदल करण्याची शक्यता खूपच अंधुक असते. पण, सध्याचा सेटअप पाहता किमान दोन-एक बदल करावे लागू शकतात, असे चित्र आहे. तूर्तास, दोन खेळाडू प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असून त्यांच्याबाबत काय निर्णय होणार, हे पहावे लागेल.

अजिंक्य रहाणे 2021 मध्ये सलग 12 वेळा अपयशी ठरला आहे. मात्र, मागील लढतीत नेतृत्व भूषवणाऱया रहाणेला येथे लगेच वगळले जाण्याची शक्यताही कमीच असू शकेल. अर्थात, त्याला संघाकडून अपेक्षित कामगिरी करवून घेता आली नाही, हे यापूर्वी अधोरेखित झाले
आहे.

चेतेश्वर पुजाराबाबतही साशंकता

खराब फॉर्ममुळेच चेतेश्वर पुजारा देखील झगडत राहिला असल्याचे एकंदरीत चित्र आहे. कसोटी मायभूमीत असेल किंवा विदेशात, वातावरण अनुकूल असेल किंवा प्रतिकूल, गोलंदाजी लाईनअप आक्रमक असेल किंवा बचावात्मक, पुजारा सातत्याने अपयशीच ठरत आला आहे. इंग्लंडमध्ये खेळताना त्याने आपला माईंडसेट बदलला असल्याचे किंचीत दिसून आले. पण, कानपूरमध्ये त्याच्याकडून अपयशाचीच पुनरावृत्ती झाली. अर्थात, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकन दौऱयावर जाईल, त्यावेळी रबाडा व ऍनरिच नोर्त्झे यांच्याविरुद्ध नव्या कुकाबुरा चेंडूवर खेळताना पुजाराचा अनुभवच अधिक महत्त्वाचा ठरु शकतो, याची संघव्यवस्थापनाला देखील उत्तम कल्पना आहे. त्यामुळे, रहाणे व पुजारा यांचे स्थान अबाधित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सध्याचे चित्र आहे.

विराटही खराब फॉर्ममध्येच

आता संघात केवळ रहाणे व पुजाराच नव्हे तर दस्तुरखुद्द विराट कोहली देखील अलीकडे खराब फॉर्ममध्ये आहे. मागील दोन वर्षांपासून विराटला एकदाही तिहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. शुभमन गिलने पहिल्या डावात आक्रमक अर्धशतक झळकावले. मात्र, त्याचे फलंदाजी तंत्र अद्याप पूर्ण भक्कम नाही, हे त्याने बॅट-पॅडमधून सोडून दिलेल्या चेंडूंवरुन दिसून येत राहिले आहे. मध्यफळीत प्रदीर्घ कालावधीसाठी फलंदाजी करण्यावर फोकस असेल तर त्याला सर्वप्रथम तंत्रातील ही चूक दुरुस्त करावी लागणार आहे.

मयांक अगरवालला वगळल्यास सलामीला कोण?

कर्णधार विराट कोहली संघात परतत असल्याने मयांक अगरवालला जागा सोडावी लागेल. मात्र, या परिस्थितीत शुभमन गिलसमवेत सलामीला कोण उतरणार, हे पहावे लागेल. सध्याच्या स्थितीत गिलसमवेत चेतेश्वर पुजारा किंवा केएस भरत यांच्यापैकी एकाला सलामीसाठी पसंती मिळू शकेल, असे चित्र आहे. अर्थात, पुजाराचा खराब फॉर्म ही मुख्य चिंता असून आंध्रचा फलंदाज केएस भरतचा प्रथमश्रेणीतील अनुभव निर्णायक ठरु शकेल. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 308 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

स्वप्नवत पदार्पणानंतरही श्रेयस अय्यरचे स्थान अनिश्चित

यापूर्वी, कानपूर कसोटीत श्रेयस अय्यरने अनुक्रमे 105 व 65 धावांची खेळी साकारली असली तरी यानंतरही त्याचे दुसऱया कसोटी सामन्यातील स्थान अनिश्चित आहे. यापूर्वी अगदी करुण नायरबाबतही असेच झाले होते. करुण नायरने आपल्या कसोटी पदार्पणात तडफदार त्रिशतक झळकावले. मात्र, त्यानंतर पुढील कसोटीतच त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते.

किवीज संघाची नील वॅग्नरवर मुख्य भिस्त

यापूर्वी कानपूर कसोटी सामन्यात केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाला नील वॅग्नरची प्रकर्षाने उणीव जाणवली होती. दुसऱया डावात वॅग्नर असता तर सामन्याचे चित्र बरेच बदलले असते. आता मुंबईत पाऊस असल्याने खेळपट्टीचे स्वरुप नेहमीपेक्षा बरेच भिन्न असू शकते. या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडचा संघ गोलंदाजीत वैविध्यासाठी अधिक प्रयत्नशील असू शकतो. न्यूझीलंडने येथे 3 जलद गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला तर कानपूर कसोटीत महत्त्वाचे योगदान देणाऱया विल सॉमरव्हिलेला संघातून बाहेर व्हावे लागू शकते. भारतीय संघही इशांत शर्माऐवजी सिराजला आणू शकेल. पण, फिरकी गोलंदाजीला पोषक वातावरण पाहता फिरकीपटूंवर अधिक भर राहिला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लॅथम, विल यंग, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), काईल जेमिसन, टीम साऊदी, नील वॅग्नर, अजाझ पटेल, विल सॉमरव्हिले, रचिन रविंद्र, डॅरेल मिशेल, मिशेल सॅन्टनर.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून.

Related Stories

थॉमस, उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरमध्ये

Patil_p

ब्रिटनचा इव्हान्स पराभूत

Patil_p

संघात एक आशियाई खेळाडू घेणे बंधनकारक

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाला रहाणेचे मार्गदर्शन

Patil_p

केएल राहुलच्या तडाख्यात चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा!

Amit Kulkarni

‘पृथ्वी’ने गाठले विजयाचे ‘शिखर’

Amit Kulkarni
error: Content is protected !!