तरुण भारत

अवकाळीच्या दणक्याने तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षशेती उध्वस्त

नुकसानीचा आकडा कोटीत: मण्याला तडे: घडकुज, मणीगळ , दावण्या या रोगाने द्राक्षबागांची माती : द्राक्षबागांचा हंगामच धोक्यात

मणेराजूरी / प्रतिनिधी (विष्णू जमदाडे)

Advertisements

पुन्हा अवकाळी पावसाच्या दणक्याने मणेराजूरीसह तासगांव तालुक्याच्या पूर्वभागातील द्राक्ष शेती पूर्णपणे उध्वस्त झाली असून हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घड कुजीचा सर्वात जास्त फटका तर घडपक्व झालेल्या बागेत मण्याला तडे गेले आहेत.

ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये फळ छाटणी असलेल्या द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान तर सप्टेंबरमध्ये फळ छाटणी घेतलेल्या बागांमध्ये मण्याला तडे गेले आहेत. त्यामुळे द्राक्षबागांचा संपूर्ण हंगामच धोक्यात आला आहे. तर आहे त्या बागा वाचविण्यासाठी बागायतदारांनी झाडांना खुरपाऱ्याने जखमा करुन खोडातील पाणी काढण्याचा प्रयोग या विभागात सुरू केला आहे .

मणेराजूरीसह तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या महिन्यात दहा ते बारा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी, वादळी पावसाने द्राक्षबागा संकटात आल्या होत्या. त्यातच पुन्हा डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी अवकाळीच्या तुफान पावसाने तासगाव पूर्व भागाला मोठा दणका दिला असून फुलोरा स्टेजमधल्या द्राक्षबागांचे साठ ते सत्तर टक्के द्राक्षघड कुजले आहेत. नुसते दांडेच राहिले आहेत. यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी द्राक्षांचे उत्पनही घटण्याची भिती आहे. तर या विभागाचे अर्थकारण ही कोलमडणार आहे.

मणेराजूरीसह तासगांव तालुक्याच्या पूर्व भागात सावळज, गव्हाण, सावर्डे, उपळावी, डोंगरसोनी, कुमठे, योगेवाडी आदी परिसरात द्राक्षबागांचे हजारो हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. मोठ्या कष्टाने बागा पिकविल्या जातात परंतु चालू वर्षी जूलैपासूनच पावसाने सुरुवात केल्याने बागायतदारांनी सप्टेंबरमध्ये फळ छाटण्या न घेता उशिरा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बागांच्या फळछाटणी घेणेस सुरुवात केली होती. या परिसरातील छाटण्याही पूर्ण झाल्या आहेत. काहीबागांच्या सप्टेंबरमध्येही छाटण्या झाल्या आहेत. त्या सध्या पक्व होण्याच्या स्थितीत आहेत त्यांना हा पावसाने मण्याला तडे गेले आहेत.

गेल्या महिन्यापासून या विभागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. घडकुज, मणीगळ, दावण्या आणि करपा रोगाने द्राक्षबागा उध्वस्त होत आहेत. पावसाने थोडी जरी उसंत दिली असल्याने औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पण औषध फवारण्या करण्याची क्षमताही बागायतदारांची संपली आहे. औषधांच्या वाढलेल्या किंमती व मजूरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे.

गतवर्षी खराब हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी जरा उशीरा छाटणी केली. पण यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच महिन्यात फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांनाच याचा मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने छाटणी होऊन ३२ ते ५२ दिवस झालेल्या बागांची द्राक्षघडांची कुज, मणीगळ सुरू आहे. अनेक बागात दावण्या आणि करपा रोगाने थैमान घातले आहे.
निर्यातक्षम व विक्रीसाठी तयार करणेत आलेल्या बागाचे सत्तर टक्के नुकसान झाले आहे. राहिलेली बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असुन महागड्या औषधांची फवारणी सुरु आहे. वातावरणाचा लहरीपणा असाच संपूर्ण डिसेंबर महिन्यात राहणार असल्याच्या अंदाजाने बागायतदारांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये सगळीकडे पाणीच-पाणी साचले आहे. याचा मोठा फटका बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे चालू वर्षी या विभागातील उत्पन्न घटणार आहे. याचा फटका या विभागातील अर्थकारणावरही बसणार आहे.

त्यातच, बागेमध्ये औषधे फवारणीचे ट्रॅक्टर अडकले आहेत. औषधे फवारणीला उघडीपच नसल्याने संकटात वाढच होत आहे .
घडकुजीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षबागांचा शासकीय पंचनामा करून मोठी मदत दिली तरच येथील बागायतदार जगेल. यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मोठी मदत करावी अशी मागणी येथील द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांची या परिसरातून होत आहे.

Related Stories

कुपवाडमध्ये हिसडा मारून मोबाईल पळविला

Sumit Tambekar

सांगलीत कोरोनाचे तीन बळी, नवे रूग्ण ४८

Abhijeet Shinde

दिघंचीत अतिक्रमणविरोधात आमरण उपोषण

Abhijeet Shinde

सांगली : सोनी येथे मोटारसायकल अपघातात पती-पत्नी ठार

Abhijeet Shinde

सातारा : जिल्ह्यात मृत्यूचे तांडव : सोमवारी सर्वोच्च 41 बळी

Abhijeet Shinde

तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची हजारी पार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!