तरुण भारत

पाकिस्तान आणि दहशतवादाचे पोषण

पाकिस्तान हा देश दहशतवादास खतपाणी घालणारा, तो पोसणारा आणि त्याचा धोका जगास निर्माण करणारा असा दहशतवादाचा अड्डा मानला जातो. यासाठी भारतावरील त्याचे सातत्याने होणारे दहशतवादी हल्ल्यांचे प्रयत्न, तालिबानच्या स्थापनेत त्याचा वाटा, ओसामा बिन लादेन या अल कायदा प्रमुखाचा तेथील छुपा रहिवास अशी अनेक उदाहरणे देता येतील. पाकिस्तानचे संस्थापक महम्मदअली जीना कधी काळी पाकिस्तानला धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राष्ट्र बनविण्याची अपेक्षा बाळगून होते. पण त्यानंतर पाकिस्तान हे केवळ लोकशाहीचा मुखवटा परिधान केलेले धार्मिक राष्ट्र बनत गेले. याचबरोबर कट्टरतावाद आणि दहशतवाद हा त्याचा स्थायीभाव बनत गेला. पाकिस्तानच्या तथाकथित दुबळय़ा लोकशाही सरकारने वेळोवेळी कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले आहेत किंवा गुडघ्यांवर उभे राहण्यासाठी त्या कुबडय़ांचा बऱयाचदा आधारही घेतला आहे. अशा या विकलांग लोकशाही सत्तेचा फायदा घेत तेथील दहशतवाद इतका परिपुष्ट झाला आहे, की कित्येकदा सरकारच्या अस्तित्वालाच तो आव्हान देत आहे. पाकिस्तान सरकार कट्टरतावादी-दहशतवादी यांच्यापुढे कसे वाकते याचे एक ढळढळीत उदाहरण गेल्याच महिन्यात पुढे आले आहे. तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी पक्षसंघटनेवर पाक सरकारने साधारणतः वर्षापूर्वी बंदी घातली होती. या संघटनेचा नेता साद रिझवी याला दहशतवादविरोधी कायद्यानुसार अटकेत टाकण्यात आले होते. शिवाय या संघटनेच्या हजारो समर्थकांनाही तुरुंगात टाकले गेले होते. परंतु, टप्प्याटप्प्याने सरकार आपल्याच कारवाईपासून ढळत गेले आणि आता तर चक्क बंदीच रद्द करण्यात आली आहे.

बंदी उठवण्यात आली याचे कारण या दरम्यानच्या काळात तेहरीके लब्बैक पाकिस्तान या संघटनेने धार्मिक कट्टरतावाद सोडून शांततावादी लोकशाहीचा मार्ग स्वीकारल्याचे आढळले हे नसून याउलट तिच्या कट्टरतावादी वाढत्या दबावापुढे पाक सरकार गर्भगळीत झाले हे आहे. जैशै मोहम्मद, लष्करे तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन या पाकस्थित दहशतवादी संघटनांपुढे जो बोटचेपेपणा सरकारने दाखवला त्याचीच एका अर्थाने पुनरावृत्ती तेहरीके लब्बैक पाकिस्तानच्या बाबतीत घडल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानी लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. पाकिस्तानी कट्टरतावादी संघटनांच्या इतिहासात तेहरीके लब्बैक तशी नवी संघटना आहे. तथापि, या संघटनेचा जन्म आणि त्यानंतर तिचा विकास व विस्तार या प्रक्रियेवर नजर टाकल्यास आगामी काळात ती केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर जगातील इतर देशांनाही कमालीचा उपद्रव करू शकते, हे स्पष्ट होते.

Advertisements

जानेवारी 2011 साली पाकिस्तानात पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांची इस्लामाबादेत हत्या झाली. गोळीबार करून ही हत्या घडवणारा त्यांचा शरीर संरक्षकच होता. मुमताझ काद्री हे त्याचे नाव. या हत्येचे कारण पूर्णतः धार्मिक होते. गव्हर्नर सलमान तासीर हे उदारमतवादी विचारांचे गृहस्थ होते. पाकिस्तानातील ब्लास्फेमी (ईश्वर विषयक किंवा पवित्र गोष्टींविषयी निंदात्मक कृतीविरोधी) कायद्यास त्यांचा विरोध होता. पंजाबमधील शैक्षणिक संस्थात तबलीगी जमातीच्या धार्मिक शिकवणुकीवर त्यांनी बंदी घातली होती. शिवाय ज्या महिलांना पुरुषांकडून वा प्रत्यक्ष नवऱयाकडून अत्याचार सहन करावा लागतो; त्यांच्या मदतीसाठी त्यांनी हेल्पलाईन सुरू केली होती. बऱयाच धर्मवाद्यांना हे त्यांचे धोरण इस्लामविरोधी वाटू लागले होते. त्यात शरीर संरक्षक मुमताझ काद्रीचा समावेश होता. अखेर या रक्षकाने भक्षक बनून आपला हेतू साध्य केला आणि गव्हर्नरचा खून हे आपल्यासाठी धार्मिक कृत्य होते, असे जाहीर केले. मात्र, या गुन्हय़ासाठी पाकिस्तानी न्यायालयाने त्याला फाशीची सजा सुनावली. अशावेळी या फाशीविरोधात काही कट्टर धर्मवादी व्यक्ती पुढे आल्या. खादीम हुसेन रिझवी ही त्यातील एक व्यक्ती. त्यावेळी खादीम हे लाहोरमधील मशिदीत सरकार नियुक्त धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांनी मुमताझ काद्रीची फाशी वाचविण्यासाठी ‘तेहरिक रिहाई मुमताझ काद्री’ (मुमताझ काद्रीच्या मुक्ततेसाठी चळवळ) सुरू केली. मात्र, अशा चळवळीस न जुमानता पाक प्रशासनाने 2016 साली मुमताझ काद्रीस फासावर लटकावले. यानंतर खादीम रिझवी यांनी आपल्या संघटनात्मक चळवळीचे नामकरण ‘तेहरिके लब्बैक या रसुलअल्लाह’ असे बदलले. पुढे 2016 मध्ये या संघटनेने राजकीय पक्षाचे रूप धारण केले आणि त्याचवेळी ‘तेहरिके लब्बैक पाकिस्तान’ या नावाने बारसे केले. पाकिस्तानात 2018 मधील सार्वत्रिक निवडणुकात या पक्षाने सहभाग दर्शविला आणि सिंध प्रांतात दोन जागाही मिळवल्या. हा पक्ष प्रामुख्याने बरेवली सुन्नी पंथाचे प्रतिनिधित्व करतो. जवळपास अर्धी पाकिस्तानी लोकसंख्या याच पंथाची आहे. साहजिकच तेहरिके लब्बैकला पाठिंबा वाढता आहे. मात्र बरेवली पंथाची नाळ सुफी इस्लामशी अधिक जुळलेली आहे. हा पंथ वहाबी पंथाइतका कडवा नाही. अशा स्थितीत या बरेवली पंथास अधिक कडवा व कट्टरतावादी बनविण्याचा विडा तेहरिके लब्बैक पाकिस्तानने उचललेला दिसतो. प्रेषित मोहम्मदाच्या गौरवास्पद स्थानाभोवती या पक्षाने आपले विचार व धोरण निश्चित केल्याने त्याचा धार्मिक प्रभाव गुंतवणारा आहे.

ज्यावषी तेहरिके लब्बैकची स्थापना झाली; त्याचवषी नेदरलँडमध्ये ग्रीट विल्डर्स या राजकीय नेत्याने प्रेषित मोहम्मदाची व्यंगचित्रे काढण्याची स्पर्धा जाहीर केली. त्यावेळी तेहरिके लब्बैक पाकिस्तानने नेदरलँडला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची भूमिका घेऊन आंदोलने केली. 2012 साली फ्रान्समधील शार्ली हेब्दो या नियतकालिकाने प्रेषित मोहम्मदाची व्यंगचित्रे छापली. या कारणास्तव कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. 2020 साली ती वर्गात दर्शविल्याबद्दल फ्रान्समधील शिक्षिकेची इस्लामी दहशतवाद्याने हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ सदर व्यंगचित्रे पुनर्प्रकाशित करण्यात आली. या कृतीचे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यन्युअल
मॅक्रॉन यांनी उघड समर्थन केले. याच्या निषेधार्थ तेहरिके लब्बैकने पाकिस्तानात मोठे आंदोलन उभे केले. या दरम्यान पक्षप्रमुख खादिम हुसेन रिझवी याचा मृत्यू झाला. अशावेळी नेतृत्वाची धुरा त्यांचा पुत्र साद रिझवी याच्याकडे आली. त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी महत्त्वाचे हमरस्ते रोखून धरले. प्रचंड हिंसाचार घडवला. सुरक्षारक्षकांना ठार केले. फ्रान्सच्या राजदूतास परत धाडा, फ्रान्सशी संबंध तोडून टाका या मागण्या पुढे केल्या आणि देशभरात तणाव निर्माण केला. परिणामी पाक सरकारने तेहरिके लब्बैकवर बंदी आणली आणि साद रिझवीसह अनेक समर्थकांना तुरुंगात धाडले. मात्र गेल्या महिन्यात पुन्हा उपरती होऊन ही बंदी मागे घेण्यात आली आहे. तेहरिके लब्बैक आपले समर्थक युरोप व अन्य देशातही असल्याचा दावा करीत आला आहे. अशावेळी कोणतेच ठोस कारण नसताना या उपद्रवकारी पक्षावरची बंदी उठवणे हे कट्टरतावाद अधिक बळकट करण्यासारखे आहे. अशा कृतींमुळेच पाकिस्तानने जगापुढील दहशतवादी धोका वाढविला आहे.

-अनिल आजगावकर

Related Stories

एकीची वज्रमूठ अभेद्य ठेवा!

Patil_p

आरोग्य आणीबाणी!

Patil_p

अंतःकरण शुद्ध झाले की,सत्त्वगुण वाढतो अध्याय तेरावा

Patil_p

विज्ञानापलीकडील श्रेष्ट विज्ञान

Patil_p

उत्तम भागवत

Patil_p

इये मास्कोचिये नगरी

Patil_p
error: Content is protected !!