तरुण भारत

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ-पोशाखप्रेम

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी सोमवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशासह जगभरामधून अभिवादन केले जाते. यामध्ये काही ठिकाणी सामाजिक प्रबोधनासह त्यांच्या विचारावर प्रकाशझोत टाकणाऱया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यातून त्यांना अभिवादन केले जाते.  डॉ.बाबासाहेबांकडे अनेक पैलू होते. आपण अशाच त्यांच्या ग्रंथप्रेम व पोशाखप्रेम या दोन पैलूंवर विचारमंथन  करणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत प्रभावी असे महान व्यक्तिमत्व होते. धिप्पाड शरीरयष्टी, करारी चेहरा, भेदक दृष्टी, भरदार आवाज, नीटनेटका पोशाख आणि त्यांचा आत्मविश्वास पाहिला की, प्रत्येक भारतीयाला त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वाची जाणीव व्हायची. डॉ.बाबासाहेब अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांचे ग्रंथप्रेम जगप्रसिद्ध राजगृहाला भेट दिल्यानंतर समजून येते. मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान आहे. चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यास येत आहेत. याच वास्तूमध्ये बाबासाहेबांनी 50,000 हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. याशिवाय संगीत, चित्रकला, स्वयंपाक, बागकाम आणि कपडय़ांची त्यांना आवड होती.

Advertisements

 जगभरातील विद्वानांच्या पंक्तीत नेहमी आदराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जात आहे. यामध्ये त्यांचे अलौकिक ग्रंथप्रेम जगप्रसिद्ध आहे. बाबासाहेब म्हणजे ज्ञानोपासना व ग्रंथ वाड्मःयाचे, प्रगाढ अभ्यासकाचे प्रतीक आहेत. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पुस्तकांवर जे अलौकिक प्रेम केले ते कौतुकास पात्र आहे. ग्रंथ हेच माझे गुरु, अशी त्यांची दृढ नि÷ा होती. डॉ.बाबासाहेबांनी विद्यार्थी जीवनात इंग्लंडमधील ब्रिटिश लायब्ररीत जाऊन प्रसंगी उपाशी, अर्धपोटी राहून जी अखंड ज्ञानोपासना केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी म्हणता येईल. त्यांचे त्या म्युझियममधल्या वृद्ध कारभाऱयांना आजही स्मरण आहे. बाबासाहेब म्हणायचे, ‘ब्रिटिश म्युझियमचा जर कोणी जास्तीत जास्त उपयोग करुन घेतला असेल तर तो मी आहे.’

उच्चविद्याविभूषित होऊन बाबासाहेब मायदेशी परतले. पण समाजसेवेचे व्रत त्यांनी सोडले नाही. सभा, आंदोलने, अन्याय अत्याचार विरोधातील लढा कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांनी समर्थपणे दिला. भारतातील अनेक वाचनालयांना, बुक डेपोंना भेटी दिल्या आहेत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी धुळे शहरात इतिहास संशोधनाचे अपूर्व कार्य केले. संशोधन संस्था स्थापन केली. बाबासाहेबांनी या संशोधन संस्थेला भेट दिली होती. राजवाडे संशोधन मंडळातील पांडूलिपी आणि पेटांग बघून आपणास खूप आनंद झाल्याचा अभिप्राय त्यांनी तेथे नोंदविला होता. बाबासाहेब 1939 रोजी लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. त्याकाळी त्यांचे पुणे शहरात सहा महिने वास्तव्य होते. सदरच्या वास्तव्यादरम्यान बाबासाहेबांनी थोर देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांच्या ‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी लायब्ररीत’ अभ्यास केला होता.

कोलकाता येथील ‘नॅशनल लायब्ररी’ही देशातील सर्वात मोठी लायब्ररी आहे. या लायब्ररीत 30 लाख ग्रंथ आणि 10 लाखांपेक्षा जास्त ऐतिहासिक दस्तऐवजांचा खजिना आहे. स्वातंत्र्यानंतर याचे नाव बदलून ‘राष्ट्रीय पुस्तकालय’ ठेवण्यात आले. कायदेमंत्री असताना बाबासाहेबांनी याला भेट दिली होती. एका दुर्मिळ पुस्तकाच्या शोधात ते आले होते. त्यांना पी लक्ष्मी नरसू लिखित ‘इन्सेन्स ऑफ बुद्धिझम’नावाचा ग्रंथ हवा होता. लायब्ररीच्या तळमजल्यावर तो मिळाला. स्वच्छतेची तमा न बाळगत ते लगेचच खाली बसले आणि संपूर्ण ग्रंथ त्यांनी वाचून काढला.

सुरुवातीच्या कालावधीत बाबासाहेबांच्या घरी कमालीचे दारिदय़ होते. जाती व्यवस्थेचे अस्पृश्यतेचे चटके त्यांनाही सहन करावे लागले. हायस्कूलमध्ये पहिल्याच दिवशी हा युगपुरुष आपल्या चाळीस वर्ष वयाच्या भावाचा पायापर्यंत लेंबणारा शर्ट घालून गेला होता. कालांतराने बाबासाहेबांनी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीमधून कपडय़ाची आवड पूर्ण केली. बाबासाहेब म्हणतात ‘मी उत्तम पोशाखाचा शौकीन आहे. मी नेहमी उच्च कपडे खरेदी करतो. पोशाखामुळे माणसाच्या नैतिक व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. कपडे स्वच्छ आणि शिस्तबद्ध असावे. स्वच्छ पोशाख आदर सत्काराची वस्तू आहे, प्रगतीचे लक्षण आहे.’

ग्रंथ व कपडय़ांसाठी त्यांचे सर्वाधिक पैसे खर्च व्हायचे. पोटाला मिळाले नाही तरी चालेल पण अंगावर चांगले कपडे हवेत हा त्यांचा आग्रह असे. सिडनेहॅम कॉलेजात असताना बाबासाहेबांना पहिला पगार मिळाला. त्यांनी पत्नी रमाईला सांगितले की, घरातल्या सर्वांसाठी कपडय़ांची मनसोक्त खरेदी करुन ये. एकदा बाबासाहेब निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईला आले होते. प्रचारसभा झेविअर महाविद्यालयाच्या मैदानावर होती. बाबासाहेब तयारीला लागले. त्यांनी ग्रे कलरचा छान सूट घातला. रमाईंनी समोर टायने भरलेली बॅग ठेवली. पण त्यांना त्यातला एकही टाय पसंत पडेना. शेवटी सभेला जाताना चर्चगेटला इरॉस सिनेमागृहाच्या मागे उच्च प्रतीच्या सुट्सचे शोरुम होते. तिथे परदेशस्थ आणि उच्चभ्रू लोकच खरेदीसाठी जात असत. बाबासाहेबांनी उच्च प्रतीचे पाच ते सात टाय घेतले. एक टाय तिथेच सुटावर बांधून सभास्थळी निघाले.

बाबासाहेबांच्या राजगृह या निवासस्थानाच्या अगदी जवळ लक्षमणराव शिंत्रे नावाचे गृहस्थ राहायचे. लक्ष्मणराव बाबासाहेबांचे समवयस्क होते. त्यांनी सत्यशोधक मंडळात प्रवेश केला. त्यावेळी बाबासाहेबांशी परिचय झाला आणि पुढे परिचयाचे रुपांतर प्रगाढ मैत्रीत झाले. लक्ष्मणराव उत्तम दर्जाचे शिंपी होते. त्यांचे दुकान मुंबईत पानवाला चाळ येथे होते. लक्ष्मणरावांनी शिवलेले कपडे बाबासाहेब वापरत असत. लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी 1930 साली बाबासाहेबांनी लक्ष्मणरावांकडून दोन सूट आणि सहा शर्ट शिवून घेतले होते. लंडनहून परत येताना बाबासाहेबांनी दोन सूट खरेदी केले. पण ते मापाचे नव्हते. त्यावर लक्ष्मणरावांनी सूट दुरुस्त करुन दिले ते बाबासाहेबांनी वापरले. बाबासाहेब म्हणतात ‘माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक किंवा आत्मसिद्धीसाठी पाप केले नाही, याचा मला रास्त अभिमान वाटतो. मी विदेशाला अनेक वेळा गेलो पण दारु प्यायलो नाही, विडी-सिगारेट ओढली नाही. मला कसलेच व्यसन नाही. फक्त पुस्तक व कपडे हेच काय ते मला अधिक प्रिय आहे.’

-सागर कांबळे

Related Stories

कर्नाटकातील धर्मांतरविरोधी कायदा

Amit Kulkarni

‘आशा’दायक समझोता!

Patil_p

नवे वर्ष ज्यो बायडेन यांची सत्वपरीक्षा पाहणारे

Patil_p

लगे रहो केजरीवाल

Patil_p

कोविडकाळातील ‘हरवलेले’, ‘दुरावलेले’ शिक्षण

Patil_p

गुरुर्बंधुरबंधूनाम्……गुरु हाच परमेश्वर

Patil_p
error: Content is protected !!