तरुण भारत

ममतांचा काँग्रेसविरोध शिवसेनेच्या पथ्यावर!

मुंबई महापालिकेची व्यूहरचना करण्यात शिवसेना गर्क असताना आणि काँग्रेस सेनेवर दबाव वाढवत असतानाच ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱयात काँग्रेस विरोध करून शिवसेनेला चाल दिली आहे.

आगामी काळात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यात सेनेला काँग्रेसची साथ हवी आहे. काँग्रेसने जागावाटपावरून अडथळा किंवा स्वबळाचा मुद्दा पुढे आणू नये अशी शिवसेनेची भावना आहे. त्यांना थेट भाजपशी लढायचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसने सामंजस्य दाखवावे अशी सेनेची अपेक्षा आहे. भाजपशीच आपली लढाई आहे हे दाखवण्याच्या दृष्टीने शिवसेनेने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱयाला लक्ष्य करत मुंबईला ओरबाडून गुजरातचा विकास सुरू असल्याची टीका केली आहे. विशेष म्हणजे या दौऱयाच्या एक दिवस आधी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील उद्योजकांची भेट घेतली होती. देशातील इतर राज्यातूनही अनेक मुख्यमंत्री मुंबईत उद्योजकांची भेट घेण्यासाठी येतात. शिवसेनेने अशा कोणत्याही दौऱयावर यापूर्वी आक्षेप घेतलेला नाही. मात्र मुंबईचे जागतिक विनिमय केंद्र रद्द करून गुजरातला हलविण्याचा निर्णय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बॉलीवूडला आव्हान देणारी चित्रनगरी उत्तर प्रदेशात उभारण्याचा निर्णय या दोन्हीला शिवसेनेने वेळोवेळी गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले आहे. भाजपही याच दोन राज्यांचा उपयोग करून नेहमी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत असते. उत्तर भारत आणि गुजरातेतून येऊन मुंबईत स्थिरावलेला मतदार विशेष करून भाजपला साथ देणारा मतदार म्हणून ओळखला जातो. याच मतदारांच्या जोरावर आणि आपल्याकडे मुख्यमंत्रीपद असल्याचा लाभ उठवत भाजपने गत महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तगडे आव्हान दिले होते. मात्र आता राज्यातील स्थिती बदलली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाराष्ट्राच्या सत्तेत आलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करून ते दोन वर्षात स्थिरस्थावर करण्यात यश आले आहे. त्यामुळे या वेळी होणारी लढाई ही सुद्धा लक्षवेधक असणार आहे. विशेष करून काँग्रेसलाही मुंबई महापालिकेत स्वतःचे अस्तित्व पुन्हा निर्माण करायचे असल्याने ते सत्ताधारी शिवसेनेवर वेगळय़ा मार्गांनी दबाव वाढवत आहेत. याच डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एक मोठी सभा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यापूर्वी केलेल्या स्वबळाच्या भाषेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गतवषीच्या दसरा मेळाव्यात काँग्रेसवर तुम्ही स्वबळ तपासायला जाऊन आमची वाट लावणार अशी सडकून टीका केली होती. देशातील एक आगळा-वेगळा प्रयोग म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारकडे पाहिले जाते. त्यातून काँग्रेसचे आव्हानही निर्माण झाले. पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडत विदर्भात भाजप विरोधात ते अनेक निवडणुकाही जिंकले. याकाळात काँग्रेस नेतृत्वाने एका बाजूला शरद पवार यांचे म्हणणे ऐकले तर दुसरीकडे शिवसेनेला साहाय्यक ठरेल अशी भूमिका घेत मुंबई प्रदेश काँग्रेसला मराठी अध्यक्ष दिला. मात्र भाई जगताप आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष म्हणून नेमकी स्वबळाची भूमिका घेतली! नंतरच्या काळात तो मुद्दा चर्चेतून बाजूला गेला तरी डिसेंबर महिन्यात काँग्रेस पुन्हा सुरुवात करणार अशी चर्चा होती. मुंबई महापालिका निवडणूक जवळ येईल तसे काँग्रेस नेते आक्रमक होतील अशी चिन्हे होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपचार घेत असल्याने याबाबतचा मुद्दा महिन्यात फारसा चर्चेत आला नाही. मात्र मुंबईसाठी तयारीत असणाऱया शिवसेनेच्या इतर नेत्यांनी काँग्रेसच्या हालचालींवर गांभीर्याने लक्ष ठेवले होते. सेनेतील अंतर्गत वर्तुळात त्याबाबत अस्वस्थता आहे. भाजप मेट्रोसह रस्त्यांची दुरवस्था, टेंडर, कोविड मृत्यू आणि इतर मुंबई संबंधित मुद्दे घेऊनच शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना भाजप प्रमाणेच काँग्रेसविरोधातही आपली शक्ती खर्च करून फटका सोसावा लागू नये किंवा मतविभागणी होऊ नये यासाठी सेना प्रयत्न करताना दिसते.

Advertisements

दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईचा दोन दिवसाचा दौरा केला आणि त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावेळी यूपीएचे अस्तित्वच कोठे आहे? असा प्रश्न करून काँग्रेसला जोराचा धक्का दिला. त्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी एक दिवस जादाचा राखून आल्या होत्या. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा करताना ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणुका काँग्रेसला सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवाव्यात, देशात अनेक ठिकाणी काँग्रेस पराभूत होत आहे. लोकसभेला अडीचशे जागांवर थेट लढत होऊन काँग्रेस दोनशे ठिकाणी पराभूत झाली याकडे लक्ष वेधत आहेत.

प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन आपली आघाडी घडवावी असे ममता यांचे म्हणणे आहे. विशेष करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षानंतर लोकसभेला सामोरे जाण्यास त्या तयार नाहीत असे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसला सोडून देशात आघाडी करणे किंवा महाराष्ट्रात सरकार चालवणे हे किती मुश्कील आहे याची जाणीव असणाऱया पवार यांनी काँग्रेसला न दुखावण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसून आले आहे. ममता यांच्यासाठी हा वाद ओढवून घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तयार नाहीत. दवाखान्यात असल्याने त्यांना ममतांना टाळता आले. राजशिष्टाचार म्हणून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेऊन एकाच वेळी काँग्रेसला दिलासा आणि चुचकारण्याचेही काम केले. काँग्रेस नेतृत्वाला इतक्मया लवकर थेट कोणत्या प्रादेशिक नेत्यांकडून विरोध होणे अपेक्षित नव्हते. मात्र आक्रमक ममता यांनी अडीच वर्षे आधीच सुरुवात केल्याने काँग्रेसला त्याचा खुलासा करणेच भाग पडले आहे. ही संधी साधत आता शिवसेनेला काँग्रेसच्या दबावातून थेट मोकळे होण्याचा मार्ग मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका संदर्भातल्या घोषणा, विधानसभा अध्यक्ष निवड आणि इतरही अनेक बाबतीत काँग्रेसकडून अडथळा होण्याची शक्मयता कमी झाली आहे.

शिवराज काटकर

Related Stories

पर्वत आणि वृक्ष यांची महती

Patil_p

बिकट मार्ग रोधूनि शूर

Patil_p

शिथिल जग!

Patil_p

एशियन पेंटस्च्या निव्वळ नफ्यात वाढ

Patil_p

आत्मनिर्भर कृषी भारताचा निराशजनक अर्थसंकल्प

Patil_p

ट्रंप, आर्ट बुकवाल्ड आणि रमेश मंत्री

Patil_p
error: Content is protected !!