तरुण भारत

शतकवीर मयांकच्या अभेद्य खेळीने सावरले

न्यूझीलंडविरुद्ध दुसरी व शेवटची कसोटी : पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 221

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

आपली उपयुक्तता अधोरेखित करण्यासाठी दडपणाखाली असणाऱया युवा फलंदाज मयांक अगरवालने शानदार शतक साजरे केल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 4 बाद 221 धावांपर्यंत मजल मारली. पुढील मालिकेत रोहित शर्मा व केएल राहुल हे नियमित सलामीवीर संघात परतल्यानंतर अंतिम एकादशमधून बाहेर व्हावे लागू शकते, याची कल्पना असलेल्या मयांकसाठी हे 15 सामन्यातील चौथे शतक ठरले. शुक्रवारी दिवसअखेर मयांक 246 चेंडूत 14 चौकार, 4 षटकारांसह 120 तर वृद्धिमान साहा 53 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 25 धावांवर खेळत होते. मधल्या टप्प्यात डाव गडगडल्यानंतरही मयांकच्या शतकामुळेच भारताला डाव सावरता आला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मयांकने शुभमन गिलच्या साथीने 27.3 षटकात 80 धावांची दमदार सलामी दिली. किवीज संघातर्फे 73 धावात दिवसातील चारही बळी घेणाऱया अजाझने गिलला बाद करत पहिला धक्का दिला. त्याने गिलला टेलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (0) व विराट कोहली (0) यांचे भोपळाही न फोडता एकाच षटकात बाद होणे अतिशय धक्कादायक ठरले.

अजाझ पटेलने (29-10-73-4) भेदक गोलंदाजी साकारली असली तरी मयांकने त्याच्याच गोलंदाजीवर पुढे सरसावत चेंडू षटकारासाठी पिटाळून लावण्याचे धारिष्टय़ दाखवले. त्याने एकंदरीत 14 चौकार व 4 षटकार फटकावत आपला क्लास दाखवून दिला.

यापूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिकेत मयांक हा पहिल्या पसंतीचा सलामीवीर होता. पण, त्यावेळी त्याला डोक्याला दुखापत झाली आणि केएल राहुलने त्याच्या जागी उतरत या संधीचा पुरेपूर उपयोग करुन घेतला. विदेशातील कसोटीत रोहितने सलामीवीर या नात्याने उत्तम योगदान दिले असल्याने या परिस्थितीत अगरवालला राखीव खेळाडूत बसावे लागले, ते साहजिक होते. येथे मात्र मयांकने संधी मिळताच पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून देण्यात अजिबात कसर सोडलेली नाही.

मयांकने 18 धावा जमवणाऱया श्रेयस अय्यरसमवेत चौथ्या गडय़ासाठी 80 धावांची तर वृद्धिमान साहासह (53 चेंडूत नाबाद 25) पाचव्या गडय़ासाठी  61 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. या खेळपट्टीवर उत्तम बाऊन्स मिळत असतानाही न्यूझीलंडने नील वॅग्नरला न खेळवण्याची चूक केली आणि याचा भारतीय फलंदाजांनी उत्तम लाभ घेतला. यादरम्यान अजाझ पटेल हा आपला जन्म असलेल्या मुंबईत शहरात भारताविरुद्ध कसोटी खेळणारा लिजेंडरी इंग्लिश कर्णधार डग्लस जॉर्डननंतर दुसरा फलंदाज ठरला.

धावफलक

भारत पहिला डाव ः मयांक अगरवाल खेळत आहे 120 (246 चेंडूत 14 चौकार, 4 षटकार), शुभमन गिल झे. टेलर, गो. पटेल 44 (71 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), चेतेश्वर पुजारा त्रि. गो. पटेल 0 (5 चेंडू), विराट कोहली पायचीत गो. पटेल 0 (4 चेंडू), श्रेयस अय्यर झे. ब्लंडेल, गो. पटेल 18 (41 चेंडूत 3 चौकार), वृद्धिमान साहा खेळत आहे 25 (53 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार). अवांतर 14. एकूण 70 षटकात 4 बाद 221.

गडी बाद होण्याचा क्रम

1-80 (शुभमन, 27.3), 2-80 (पुजारा, 29.2), 3-80 (विराट, 29.6), 4-160 (श्रेयस, 47.4).

गोलंदाजी

टीम साऊदी 15-5-29-0, काईल जेमिसन 9-2-30-0, अजाझ पटेल 29-10-73-4, विल्यम सॉमरव्हिले 8-0-46-0, रचिन रविंद्र 4-0-20-0, डॅरेल मिशेल 5-3-9-0.

रहाणे, इशांत शर्मा ‘दुखापती’च्या मार्गाने संघाबाहेर!

प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणे व इशांत शर्मा यांची संघातील जागा धोक्यात आहे, हे ते स्वतःही उत्तमरित्या जाणतात. कानपूरमधील पहिल्या कसोटीत खराब कामगिरीचा हा सिलसिला कायम राहिल्यानंतर येथे त्यांच्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार, याची उत्सुकता होती. त्यांना डच्चू दिला जाईल, अशीही चिन्हे होती. पण, प्रत्यक्षात शुक्रवारी बीसीसीआय व संघव्यवस्थापनाने यातून उत्तम समन्वय काढत रहाणे व इशांत यांना दुखापतीच्या मार्गाने सन्मानाने संघाबाहेर काढले. दुसऱया कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी रहाणे, इशांतसह रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

कानपूर कसोटीत पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करत असताना रहाणेला स्नायूच्या वेदना जाणवल्याचे कारण यावेळी देण्यात आले. कानपूर कसोटीची दि. 29 नोव्हेंबरला सांगता झाली आणि शेवटच्या दिवसातील पूर्ण 90 षटकांच्या खेळात रहाणे सीमारेषेजवळ तैनात होता. स्नायूच्या वेदना जाणवत असतील तर यावेळी फुटवर्कवर खूपच मर्यादा येतात आणि याचा फलंदाजीवर विपरीत परिणाम होतो, असे एकंदरीत चित्र आहे. मात्र आश्चर्य म्हणजे यापूर्वी शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रादरम्यान रहाणे पूर्ण तंदुरुस्तीने सहभागी झाला होता. त्याने प्रारंभी जॉगिंग केले व नंतर स्लीप कॉर्डनमध्ये झेल घेण्याची प्रॅक्टिसही केली होती.

किवीज कर्णधार केन विल्यम्सन ढोपराच्या दुखापतीमुळे कसोटीतून बाहेर

न्यूझीलंडचा कर्णधार व अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन डाव्या ढोपराच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सामन्याच्या पहिल्या दिवशी स्पष्ट झाले. त्याच्या गैरहजेरीत टॉम लॅथमकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.

अलीकडील कालावधीत विल्यम्सनला ढोपराच्या दुखापतीने सातत्याने त्रस्त केले असून पूर्ण वर्षभरात, तसेच टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान तो यावर थोडीफार मात करु शकला होता. आता मात्र, दुखापत आणखी चिघळण्याचा धोका असल्याने त्याला विश्रांती घेणे भाग पडले असल्याचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी नमूद केले.

बॅट-पॅड असतानाही विराटला पायचीत दिल्याने वादंग

या लढतीत पुनरागमन करत असलेल्या विराट कोहलीला पायचीत दिले जाणे सर्वात वादग्रस्त ठरले. कोहलीसाठी चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट सरळ आला आणि त्याने फॉरवर्ड डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यात चेंडू किंचीत बॅटची कड घेत पॅडवर आदळताच पायचीतचे जोरदार अपील झाले. मैदानी पंच अनिल शर्मा यांनी विराटला बाद ठरवले. पंचांच्या या निर्णयाने धक्का बसलेल्या विराटने लागलीच डीआरएस घेतला. रिप्लेत चेंडूने प्रथम बॅटला स्पर्श केला की पॅडला, हे टीव्ही पंच विरेंदर शर्मा यांच्यासाठी स्पष्ट नव्हते आणि त्यांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयावर विराटला विश्वास ठेवणेही कठीण झाले. त्याने लेग अम्पायर नितीन मेनन यांच्याकडेही याबाबत आपली नाराजी मांडली. ड्रेसिंगरुममध्ये परतल्यानंतर तो काही वेळ बाल्कनीत उभा होता आणि त्यावेळीही त्याची नाराजी चेहऱयावरुन स्पष्टपणे दिसून येत होती.

माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन म्हणाले, विराट नॉट आऊट!

डावातील 30 व्या षटकात विराट कोहलीला वादग्रस्तरित्या बाद दिले गेल्यानंतर माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनने ट्वीटरचा आधार घेत या निर्णयावर तीव्र नाराजी नोंदवली. ‘नॉट आऊट’, इतकेच ट्वीट करत वॉनने यात नेमके काय घडले, ते दर्शवून दिले.

‘त्या’ पडझडीमुळे भारत बिनबाद 80 वरुन 3 बाद 80!

मयांक व शुभमन यांनी तडाखेबंद फलंदाजी साकारल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना एकवेळ बिनबाद 80 धावांवर पोहोचला. पण, नंतर याच धावसंख्येवर शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा व विराट कोहली असे तिघे फलंदाज बाद झाले आणि भारताची बिनबाद 80 वरुन 3 बाद 80 अशी पडझड झाली.

सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप

सत्र / षटके / धावा / बळी / सरासरी

पहिले / – /- / -/ –

दुसरे / 37 / 111 / 3 / 3.00

तिसरे / 33 / 110 / 1 / 3.33

Related Stories

इराणच्या वेटलिफ्टरला आठ वर्षानंतर मिळाले ऑलिम्पिक सुवर्णपदक

Patil_p

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

Patil_p

बिग बॅश लीगचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना मुदतवाढ शक्य,

Patil_p

सनरायजर्सविरुद्ध चेन्नईला विजयाची गरज

Omkar B

‘खेल रत्न’ पुरस्कारासाठी श्रीजेश, दीपिकाची शिफारस

Patil_p
error: Content is protected !!