तरुण भारत

हस्तांदोलन टाळा, गर्दीवर मर्यादा घाला

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढली चिंता : नागरिकांनी स्वतःहून नियम पाळणे आवश्यक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मनुष्य उत्सवप्रिय आहे. लोकांना भेटणे त्याला आवडते. परंतु कधीकधी उत्साह की आरोग्य? याचा विचार करणे भाग आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, संमेलने, मेळावे, विवाह आणि तत्सम सर्व समारंभांवर नियंत्रण आले होते. लॉकडाऊन सारख्या सक्तीच्या नियमाला आपल्याला सामोरे जावे लागले. नियमांची कडक अंमलबजावणी झाल्याने कोरोना नियंत्रणात आला. मात्र तो हद्दपार झाला नाही. हे बहुतेक जणांनी लक्षात घेतले नाही.

कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर आणि लॉकडाऊन उठल्यानंतर सर्व नियमांचा विसर जनतेला पडला. सरकार आणि प्रशासन सातत्याने नियमांकडे बोट दाखवत असूनही नागरिकांनी मात्र या गोष्टी खूप सहजपणे घेतल्या. बाजारपेठेत गर्दी करणे, मास्क न वापरणे, सामाजिक अंतराचा नियम पूर्ण धुडकावून लावणे. यामुळे शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. नव्या विषाणूचा शिरकाव झाला आणि पुन्हा हळुहळू नियमांचे पालन करणे अपरिहार्य बनले.

उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा

गेल्या दोन ते चार महिन्यात शहरात गर्दीचे प्रमाण कमालीचे वाढले. या गर्दीने मास्कचे भान बाळगले नाही. सामाजिक अंतर तर पूर्णपणे धुडकावून लावले. इतकेच नव्हे तर सार्वजनिक कार्यक्रम आणि विविध स्वरुपाच्या गेट टुगेदरना ऊत आला. यातच लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने लग्नांमध्ये कमालीची गर्दी दिसून येत आहे. आता मात्र प्रशासनाने त्यावर काही निर्बंध आणले आहेत. ज्या सभागृहात किंवा ज्या ठिकाणी विवाह किंवा तत्सम समारंभ होणार आहेत तेथे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

गर्दीने सावध व्हायला हवे

सभागृहाची जागा जितकी आहे त्याच्या निम्मी उपस्थिती असा नियम करण्यात आला आहे. विवाह हा एक महत्त्वाचा सोहळा आहे. परंतु आपले आरोग्य त्याहून महत्त्वाचे आहे. अलिकडच्या दिवसांत बेळगावमध्ये झालेल्या काही विवाह सोहळय़ांमध्ये कोरोना कधी अस्तित्वातच नव्हता, असे चित्र दिसून आले. मात्र या गर्दीने आता सावध व्हायला हवे. वधू किंवा वरपक्षाच्या मंडळींनी आमंत्रणावर मर्यादा आणण्यास काहीच हरकत नाही. कारण प्राप्त परिस्थितीत त्याचे कारण जाणण्याइतका सुज्ञपणा निश्चितच आहे.

प्रत्येकाने सवधगिरी बाळगावी

कोविड-19 च्याच नियमांचे पालन आजही करणे भाग आहे. सॅनिटायझर वापरणे किंवा सतत हात धुणे यामध्ये कसूर करून चालणार नाही. वेगवेगळे विषाणू येतच राहतील. परंतु वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता त्यामुळेच महत्त्वाची ठरणार आहे. निर्बंध उठल्यानंतर लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले आणि प्रशासनानेही त्याकडे कानाडोळा केला. जेंव्हा नवीन विषाणूचा शिरकाव झाला तेंव्हा पुन्हा मास्कची सक्ती आणि तपासणीचे नाटक सुरू झाले. यामध्ये सातत्य आणणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र प्रशासनाने कारवाई करण्यापेक्षा प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे हेच सोयीस्कर ठरणार आहे.

वधू-वरांशी हस्तांदोलन टाळा…

विवाह सोहळा किंवा स्वागत समारंभासाठी आलेले निमंत्रक वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन येतात. त्यांचे स्वागतच आहे. मात्र वधू-वरांचे हात हाती घेऊन हस्तांदोलन करणे टाळायला हवे, तशी सूचना जाहीरपणे करणेसुद्धा उपयुक्त ठरेल, अथवा वधू-वरांच्या आणि निमंत्रीतांच्यामध्ये अंतर ठेवून नियमांचे पालन करता येते. जेणेकरून शेकडो लोकांशी हस्तांदोलन करण्याचे टाळले जाऊ शकेल.

सोहळय़ांसाठी परवानगी आवश्यक…

सर्व ठिकाणी मंगल कार्यालये आणि हॉल लग्नासाठी बुक झाले आहेत. परंतु तेथील उपस्थितींवर मर्यादा घालण्यात आली आहे. शहर परिसरात म्हणजेच मनपाच्या कार्यक्षेत्रात विवाह होणार असेल तर मनपामधील आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे तर ग्रामीण भागात होणाऱया सोहळय़ांसाठी तहसीलदारांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

Related Stories

गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सला नॅक मूल्यांकनात ‘ए’ नामांकन

Amit Kulkarni

व्ही. एम. शानभाग स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Patil_p

‘बिम्स’वर उपचारासाठी प्रशासकाची नियुक्ती

Amit Kulkarni

कुमारस्वामी लेआऊट परिसरात घरफोडी

Patil_p

स्वतःकडे लक्ष देत छंद जोपासा

Patil_p

आळस झटका आणि कामाला लागा…

Patil_p
error: Content is protected !!