तरुण भारत

पंजाबमध्ये भाजपसोबत आघाडी : अमरिंदर सिंह

पक्षाच्या कार्यालयाचे केले उद्घाटन

वृत्तसंस्था  / चंदीगड

Advertisements

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी चंदीगडमध्ये स्वतःचा नवा पक्ष पंजाब लोक काँग्रेसच्या कार्यालयाचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर बोलताना अमरिंदर यांनी निवडणुकीसाठी कमी कालावधी शिल्लक असणे माझ्यासाठी कुठलेच आव्हान नसल्याचे म्हटले. तसेच भाजप तसेच शिरोमणी अकाली दल संयुक्तसोबत आघाडी करून पंजाबची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी रविवारी पाकिस्तानसोबतचा व्यापार पुन्हा सुरू व्हावा असे म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानावर कॅप्टन यांनी निशाणा साधला आहे. प्रथम पाकिस्तानने आमच्या सैनिकांवर गोळय़ा झाडणे बंद करावे मग चर्चा करू असे अमरिंदर म्हणाले.

निवडणुकीसाठी सज्ज

आम्ही लढाईसाठी तयार आहोत. 10 दिवसांपूर्वी सदस्यत्व मोहीम सुरू झाली असून लवकरच जिल्हा स्तरावर नियुक्त्या केल्या जातील. पंजाबची निवडणूक आम्ही जिंकू यात कुठलाच संशय नाही. लवकरच भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि पंजाब प्रभारींसोबत बैठक होईल. त्यानंतर शिरोमणी अकाली दल (संयुक्त) सोबत मिळून जागावाटप निश्चित करू असे कॅप्टन यांनी म्हटले आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला

भाजप आणि शिअद संयुक्तसोबत जागावाटप केले जाणार आहे. कुणाला किती जागा मिळतील हे ठरणार नाही. तर ज्या पक्षाचा उमेदवार विजय मिळविण्याच्या क्षमतेचा असेल तेथे त्याला तिकीट मिळेल. उर्वरित दोन्ही पक्ष संबंधित उमेदवाराला  विजयी करण्यासाठी पूर्ण जोर लावतील. सत्तेवर आल्यावर निवडून आलेले आमदार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणार असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले आहे.

काँगेसला लवकरच गळती

माझ्या पक्षात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते येणार आहेत. हे नेते आचारसंहित लागू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सिद्धू हे 35 आमदारांना उमेदवारी देणार नसल्याचे सांगत आहेत. या सर्वांना पक्षात घेऊ असे नाही. पक्षाच्या धोरणानुरुप या नेत्यांची निवड होणार असल्याचे अमरिंदर म्हणाले.

आम आदमी पक्षावर टीका

आम आदमी पक्ष पंजाबमध्ये प्रभावशाली असल्यास 20 पैकी 11 आमदारांनी पक्षत्याग का केला? आम आदमी पक्षाला पंजाबच्या राजकारणात फारसे स्थान नाही. अरविंद केजरीवाल यांच्याकडून केवळ पोकळ हमी देण्यात येत असल्याच दावा कॅप्टन यांनी केला.

Related Stories

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

देशात 12,689 नवे बाधित, 137 मृत्यू

datta jadhav

लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान मोदी काय करतात? शेअर केला व्हिडिओ

prashant_c

सीबीएसई 10 वी-12 वी परिक्षांचे वेळापत्रक घोषित

Patil_p

देशवासियांना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी

Abhijeet Shinde

देशात चोवीस तासात 25,320 नवे रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!