तरुण भारत

शेअर बाजाराला मोठय़ा घसरणीचा फटका

सेन्सेक्स 949 अंकांनी गडगडला, एअरटेल, इंडसइंड बँक नुकसानीत

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisements

सोमवारी ओमिक्रॉनविषयी अनिश्चितता आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात दिसला.  आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 949 अंकांनी घसरला तर निफ्टी निर्देशांक 284 अंकांनी घसरल्याचे दिसले. यात इंडसइंड बँक आणि एअरटेल यांच्या समभागांमध्ये 3 टक्के घसरण दिसली. ओमिक्रॉनचा प्रभाव सोमवारीही बाजारावर दिसला.

सोमवारी सरतेशेवटी बाजारात सेन्सेक्स निर्देशांक 949 अंकांची घसरण नोंदवत 56,747 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 284 अंकांच्या घसरणीसह 16,912 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक सुमारे 1.65 टक्के इतके घसरले. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व 30 समभाग सोमवारी घसरणीत राहिले. इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि एचसीएल टेक यांच्यात मोठी घसरण दिसली. साधारणपणे या समभागांमध्ये 3 टक्के इतकी घसरण नोंदवली गेली. मोठय़ा घसरणीमुळे बाजार भांडवलात 4.29 लाख कोटींची घट दिसली. दुसरीकडे निफ्टीतील सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीतच बंद झाले आहेत. आयटी निर्देशांकात सर्वाधिक 2 टक्के इतकी तर ऑटो, एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांकात 1.5 टक्के इतकी घसरण नोंदवली गेली.

शुक्रवारी शेअर बाजार कोसळला होता. पण सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीही शेअर बाजार सुस्तीत प्रवास करताना दिसला. एकावेळी दिवसभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 500 अंकांच्या पडझडीसह 57,172 अंकावर होता. सेन्सेक्समधील मारुती व इन्फोसिस यांचे समभाग प्रत्येकी 1 टक्के घसरणीत होते. इंडसइंड बँकही 2 टक्के इतकी घसरणीत होती. याखेरीज बजाज फायनान्स, महिंद्रा आणि महिंद्रा, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, ऍक्सिस बँक, बजाज ऑटो यांचे समभाग घसरणीत होते. एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय, एचडीएफसी व टाटा स्टील मात्र तेजीत होते.

सकाळी सुरुवातीला सेन्सेक्स निर्देशांक 82 अंकांच्या वधारासह 57,778 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 17209 अंकांवर खुला झाला होता. बँक व वित्तसेवेचा निर्देशांक घसरणीत होता. आनंद राठी वेल्थचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी सोमवारी बंद झाला आहे. 3.02 पट गुंतवणूकदारांनी सदरचा आयपीओ सबस्क्राईब केलाय. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक सुरू असून तीन दिवस चालणाऱया बैठकीकडे बाजाराचे लक्ष आहे.

Related Stories

अदानी ग्रीनचा स्टर्लिंगसोबत करार

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 871 अंकांनी कोसळला

Patil_p

पीएलआय योजनेसाठी 19 कंपन्यांचा अर्ज

Patil_p

अदानी समूह पेट्रोल-डिझेलही विकणार

Patil_p

एचडीएफसी समूहाला 50 हजार कोटींचा नफा

Patil_p

‘एसबीआय कार्ड्स’ लिस्टिंगवर कोरोनाची छाया

tarunbharat
error: Content is protected !!