तरुण भारत

घोकंपट्टीपासून सुटका

शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अजाणतेपणे घोकंपट्टी करण्याची सवय लागते. कोणतेही बालगीत असो वा कविता, पाढे असोत वा सर्वांसमोर सांगण्याची गोष्ट असो, अनेक शिक्षक-पालक ते सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ करवून घेतात. माझी कन्या सानिया चौथीमध्ये शिकत होती. त्यावेळी वक्तृत्व स्पर्धेत तिला भाग घे, असे तिला सांगितले. स्पर्धेमध्ये बोलण्याचे काही विषय आयोजकांनी ठरवले होते, त्याची माहिती समजल्यानंतर त्या विषयाची तयारी कशी करायची असा तिने प्रश्न विचारला. तिला संबंधित विषयाबद्दल मी आणि माझी पत्नी निशा, दोघांनी माहिती दिली. त्यावर तिने काही प्रश्न विचारले, त्याचे शंकानिरसन केले. त्यानंतर साधारण विषयाचा आराखडा तयार झाला आणि सानियाला तो विषय समजला. आता प्रश्न तो विषय स्टेजवरून कसा मांडायचा, हाच होता. त्यावर तिला कोणताही पाठांतर न करता, तिला त्या विषयाचे दहा मुद्दे काढण्यास सांगितले.  तिने काढलेल्या मुद्यांवर काही मुद्दे सुचवले आणि त्याचा एक क्रम लावला. आता ते मुद्दे बघून स्वतःच्या भाषेत मांडण्याचा सराव तिला करावयास सांगितला. तसे केल्यानंतर तिचे भाषण तिच्याच भाषेत तयार झाले. विलक्षण उत्साहामध्ये असलेल्या सानियाने स्पर्धेत भाग घेतल्याचे टेन्शन न घेता स्टेजवर जाऊन कोणताही कागद हातात न घेता, उत्स्फूर्तपणे तो विषय मांडला. तिच्यापूर्वी आणि नंतरच्या स्पर्धकांनी “आदरणीय परीक्षक, माझे आदरणीय शिक्षक याना वंदन करून मी माझे चार शब्द मांडते’’  अशा प्रकारची पठडीबद्ध सुरुवात करून पाठ केलेले भाषण विषय न समजता स्टेजवरून अवघड शब्दात मांडले. यामधील अनेक स्पर्धकांची मांडणी त्यांच्या वयास साजेशी नव्हती. परीक्षकांनी उत्तम पाठांतर असलेल्या स्पर्धकांना बक्षीस जाहीर केले. त्यानंतर काही दिवस अशा पद्धतीने तयारी केली, त्यामुळे इतरांप्रमाणे भाषण चांगले झाले नाही, असा समज करून घेऊन सानिया नाराज झाली. अशाच पद्धतीने घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने ‘टीच फॉर इंडिया’ द्वारे शिक्षणक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. एक दिवस तिच्या शाळेत जाहीर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांची तयारी तिने त्याच पद्धतीने उत्स्फुर्तपणे करवून घेतली आणि संध्याकाळी तिची शालेय जीवनातील तीच आठवण तिच्या विद्यार्थ्यांना सांगितली. मुद्दा एवढाच आहे की घोकंपट्टी केल्यामुळे तात्पुरते यश मिळत असल्याचा कदाचित भास होत असेलही, परंतु करियरमध्ये पाठांतर करण्याच्या सवयीचा कधीही उपयोग होत नाही, झालाच तर दीर्घकालीन तोटा होतो.

मंगला नारळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे पाढे कसे तयार होतात याचे तंत्र समजून घेतल्यास पाढे पाठ करण्याची गरज भासत नाही. नवाचा पाढा दोन हातावरच्या बोटांनी दाखवता येतो. ‘बापू सेहत के लिये तू तो हानिकारक है’ (दंगल) असे कोणतेही चित्रपटातील गाणे शब्द समजून तीन चार वेळा ऐकले, त्याचा चित्रपटातील संदर्भ समजला तर पूर्ण गाणे पाठ करावे लागत नाही. कारण ‘हम पे थोडी दया तो कर, हम नन्हे बालक है’ या भावनांशी समरस झालेले बालक अशी गाणी पाठ न करता, खड्या आवाजात म्हणू शकतात. मराठी वा इंग्रजी भाषेतल्या कवितेचा संदर्भ समजला आणि अर्थ मनाला भिडला तर त्याचा अर्थ सांगता येईल. कवितेला चाल न लावल्यामुळे मुलांना ती जवळची वाटत नाही.  अन्यथा दुसरीच्या मुलांना ‘अग्गोबाई, ढग्गोबाई’ कविता पाठ न करता सहज येते.  अलीकडे एकच रेडियोवर घरातील सर्वांनी गाणी ऐकण्याची सवय नसल्यामुळे ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ हे गाणे त्यांनी ऐकलेले नसते. त्यामुळे ती कविता मुलांना अर्थ लक्षात न घेता पाठ करावी असे वाटते. पालक-शिक्षकांनी हे गाणे विद्यार्थ्यांना ऐकवल्यास तो प्रश्न सुटू शकतो. मुळात एखादा विषय समजला तर पाठ करावा लागत नाही. ‘दंगल’ सारखा चित्रपट बघितल्यानंतर त्याची कथा काय होती, हे पाठ करण्याची गरज नसते. क्रिकेटची आवड असेल तर नुकत्याच बघितलेल्या सामन्यात नेमके काय झाले या विषयावर गप्पा मारताना त्या विषयाची तयारी करावी लागत नाही. पण फुटबॉल या खेळात रस नसेल तर तो सामना बघितला तरी त्यामध्ये काय झाले हे सांगता येत नाही. विद्यार्थी आणि पालकांनी त्या विषयांमधील निरसता टाळून तो विषय आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत करून त्या विषयाची गोडी लावल्यास हे शक्मय आहे. 

Advertisements

इतिहास हा विषय कंटाळवाणा वाटत असेल तर त्या धड्य़ासंबंधित चित्रफिती (शॉर्ट फिल्म्स) यु ट्युबवर बघू शकतो. अशा फिल्म्स शोधून देणे हे पालक करू शकतात. कठीण विषय दृश्य माध्यमातून बघितल्यानंतर समजण्याची शक्मयता वाढते. अर्थात अर्धा तास शॉर्ट फिल्म्स बघितल्यानंतर किमान एक तास वाचनाची जोड दिली तरच उपयोग होऊ शकतो. अन्यथा गेल्या दीड वर्षातील ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलवरील लेक्चर्सद्वारे शिक्षण घेण्याची सवय लागली आहे.  ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर तेवढाच वेळ पुस्तके वाचणे गरजेचे आहे, हेच अनेक विद्यार्थी विसरले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे परंतु त्याला वाचनाची जोड दिल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही.  पाचवीच्या विद्यार्थ्यांना पृथ्वीवरची जीवसृष्टी अभ्यासक्रमामध्ये आहे. तो धडा वाचण्यापूर्वी डेव्हिड ऍटनबोरो यांची ‘लाईफ ऑन अर्थ’ सिरीज विद्यार्थी-पालकांनी एकत्र बघावी. अशा सिरीज बघताना सहसा विद्यार्थ्यांचे दृश्यात्मकतेकडे लक्ष अधिक असते. त्यामुळे ऍटनबोरो यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाकडे पालकांनी लक्ष वेधल्यास इंग्रजी, इतिहास, भूगोल  आणि जीवशास्त्र या सर्व विषयात गोडी लागते. उत्क्रांती (Evolution)  या विषयावर ऍटनबोरो यांनी लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील अवशेष दाखवताना उत्कृष्ट निवेदन केले आहे. हा विषय आपण शिकणे का गरजेचे आहे हे त्यांनी फिल्ममध्ये सांगितले आहे. कोणताही विषय शिकण्यापूर्वी त्याचे प्रयोजन काय आहे हे पालक-शिक्षकांनी सांगितल्यास विद्यार्थ्यांना तो विषय आवडण्याची शक्मयता जास्त असते. नागरिकशास्त्र हा विषय पाठ्य़पुस्तकामध्ये अत्यंत निरसपणे सांगितला गेला असल्यामुळे आणि त्याचे प्रयोजन न शिकवल्यामुळे मला शालेय जीवनात तो नावडता होता परंतु आता त्या धड्य़ांचे आताच्या बातम्याशी संबंध जोडून मी तो विषय आता चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो.

विषय कोणताच कंटाळवाणा नसतो, तो विषय गोष्टीरूप कसा करावा हे शिकणाऱया किंवा शिकवणाऱया व्यक्तीवर अवलंबून असते. इतर विषयांमधील गोडी अशाच प्रकारे वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दल पुढील लेखामध्ये.     

– सुहास किर्लोस्कर

Related Stories

कोरोनामुळे जगाला व भारताला धडा

Patil_p

कृष्णरंगें सुरंग जाले

Patil_p

तो तूं प्रद्युम्न कृष्णनंदन

Patil_p

स्वभावो दुरतिक्रमः।……….(सुवचने)

Patil_p

हस्तिदंती मनोऱयातील ‘कन्फ्युजन’

Patil_p

गानविद्या बडी

Patil_p
error: Content is protected !!