तरुण भारत

भारत-रशियात ‘नया दोस्ताना’

संरक्षण-व्यापारविषयक करारांना मूर्त रुप : 2025 पर्यंत 30 अब्ज डॉलर्सचा व्यापार, 50 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या माध्यमातून सोमवारी भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली. पुतीन यांच्यासह अन्य रशियन मंत्र्यांच्या एक दिवशीय भारत दौऱयात द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. दोन्ही नेते 21 व्या वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर ‘आम्ही भारताकडे एक महान शक्ती, विश्वासू मित्र म्हणून पाहतो’ असे निवेदन पुतीन यांनी केले. द्विपक्षीय चर्चेत काही महत्त्वाचे करार झाले असून भारतीय सैनिकांच्या हाती लवकरच एके-203 असॉल्ट रायफल हे नवे शस्त्र मिळणार आहे. दोन्ही देश संयुक्तपणे तब्बल 5 लाख? एके-203 रायफल्स तयार करणार आहेत.

एक दिवसीय भारत दौऱयावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सोमवारी सायंकाळी दिल्लीत पोहोचले. विमानतळावरून पुतीन हैदराबाद हाऊसमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा आणि भविष्यकालीन वाटचालींबाबत सविस्तर चर्चाही झाली. चर्चेनंतर पुतीन आणि मोदी यांनी प्रसारमाध्यमांना त्यासंबंधीची माहिती दिली. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत दोन्ही देशांचे सहकार्य अधिक मजबूत होत आहे. दोन्ही देश संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचे मित्र आहेत. कोरोनाविरुद्धही सहकार्य मिळाले आहे. आर्थिक क्षेत्रातही आमचे नाते पुढे नेण्यासाठी आम्ही मोठय़ा दृष्टिकोनातून काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच आम्ही 2025 पर्यंत 30 अब्ज डॉलर्सचा व्यापार आणि 50 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवल्याचे स्पष्ट केले.

कोरोनामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली असतानाही भारत-रशिया संबंधांच्या वाढीच्या गतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आमची विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही सहयोगी आहोत आणि ऊर्जा क्षेत्र, अवकाश यासह उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर एकत्र काम करत आहोत. या भविष्यकालीन कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली असून त्यात भारतीय अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाचा समावेश असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

गेल्या काही दशकांमध्ये जगाने अनेक मूलभूत बदल पाहिले आहेत. याचदरम्यान विविध प्रकारची भौगोलिक-राजकीय समीकरणे समोर आली असतानाही भारत आणि रशियामधील मैत्री अबाधित आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हे आंतरराज्य मैत्रीचे एक अद्वितीय आणि विश्वासार्ह मॉडेल असल्याचेही मोदी म्हणाले. त्यानंतर बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले, आम्ही भारताला एक महान शक्ती, एक मैत्रीपूर्ण राष्ट्र आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला मित्र म्हणून पाहतो. आपल्या देशांमधील सहकार्य वाढत असून भविष्यात ते अधिकच बळकट होईल, असा आशावाद पुतीन यांनी व्यक्त केला. भारत दौऱयामुळे मला खूप आनंद होत आहे. गेल्या वषी दोन्ही देशांमधील व्यापार 17 टक्क्मयांनी घसरला होता. मात्र यंदा पहिल्या नऊ महिन्यांत 38 टक्क्मयांनी व्यापार वाढल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.

भारतीय जवानांच्या हाती येणार एके-203 असॉल्ट रायफल

मेक इन इंडियाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशच्या अमेठी येथे एके-203 असॉल्ट  रायफल्सची निर्मिती केली जाणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रशियाच्या सर्गेई शोइंगु यांनी या करारावर स्वाक्षऱया केल्या. भारताने या एके-203 रायफलला ‘एक रायफल, श्रेष्ठ रायफल’ अशी टॅगलाईन दिली आहे. या बंदुकींची निर्मिती अमेठीच्या कोरबा ओएफबी प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. या रायफल्स तयारीसाठी एक नवी कंपनी तयार करण्यात आली असून ‘इंडिया रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे नाव देण्यात आले आहे.

‘टू प्लस टू’ संवादामुळे द्विपक्षीय संबंध बळकट

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइंगु यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना भारत आणि रशिया यांच्यातील संबंध काळाच्या कसोटीवर उतरले आहेत. जागतिक शांतता, समृद्धी, परस्पर समंजस्यपणा आणि विश्वास यासारख्या अनेक मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये समान हितसंबंध असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. तत्पूर्वी सकाळी 10.30 वाजता रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. दोन्ही बैठका ‘टू प्लस टू’ संवाद अंतर्गत झाल्या. भारत आणि रशियामधील भागिदारी पूर्णपणे पारदर्शक आणि सकारात्मक आहे. आजही दोन्ही देशांदरम्यान झालेली चर्चा खूप यशस्वी झाल्याचे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

पश्चिम बंगालच्या विद्यापीठात तोडफोड

Patil_p

मोदी-पवार यांच्यात खलबतं

datta jadhav

कोरोना : पंजाबमध्ये 215 नवे रुग्ण; 10 मृत्यू

Rohan_P

महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल भारतीय वैज्ञानिकाचा इशारा

Patil_p

पंतप्रधानांकडून सरदारधाम भवनाचे उद्घाटन

Patil_p

भारतात 91 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav
error: Content is protected !!