तरुण भारत

विराट परतताच मायभूमीत ‘विराट’ विजय!

दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 372 धावांनी एकतर्फी, विक्रमी धुव्वा

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय क्रिकेट संघाने पाहुण्या न्यूझीलंडचा संघाचा येथील दुसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात विक्रमी 372 धावांनी फडशा पाडत नियमित कर्णधार विराट कोहलीने पुनरागमन अगदी धुमधडाक्यात साजरे केले. फिरकीपटू जयंत यादवने सोमवारी येथे सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडची तळाची फळी आपल्या भेदक गोलंदाजीने कापून काढली आणि विजयासाठी 540 धावांचे टार्गेट असताना किवीज संघाचा डाव अवघ्या 167 धावांमध्येच खुर्दा झाला. भारताचा मायभूमीतील हा सर्वात मोठा विजय ठरला.

सोमवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर 43 मिनिटातच, सकाळी 10 वाजून 13 मिनिटांनी रविचंद्रन अश्विनने (4-34) न्यूझीलंडचा शेवटचा फलंदाज बाद करत भारतीय भूमीत 300 बळींचा माईलस्टोन सर केला. शिवाय, न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणत एकतर्फी विजयावर सहज शिक्कामोर्तब केले.

यापूर्वी, कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यात किवीज संघाने झुंजार खेळ साकारत भारताला विजयापासून वंचित ठेवले होते. येथे मात्र एजाझ पटेलच्या डावातील 10 बळीनंतरही भारताने न्यूझीलंडचा चांगलाच फडशा पाडला.

आश्चर्याची बाब म्हणजे पटेलने दोन्ही डावात मिळून 73.5 षटके गोलंदाजी केली तर त्यांच्या पूर्ण संघाला दोन्ही डावात मिळून फक्त 84.4 षटकेच फलंदाजी करता आली. 540 धावांचे टार्गेट असताना न्यूझीलंडने 5 बाद 140 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केली. पण, अवघ्या 27 धावांमध्ये त्यांचे उर्वरित 5 फलंदाज बाद झाले. तिसऱया दिवशी अजिबात बहर न सापडलेल्या जयंत यादवने येथे 14 षटकात 4 निर्धाव व 49 धावात 4 बळी, असा भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जयंत यादवसाठी 2017 नंतर हा पहिलाच कसोटी सामना होता.

टाटा एंडकडून मारा करणाऱया जयंत यादवने चेंडू फारसे वळवले नाहीत. मात्र, पिचवरील रफचा पुरेपूर उपयोग करत त्याने फलंदाजांना सातत्याने पेचात टाकले. रचिन रविंद्र फ्लाईट दिलेल्या एका चेंडूवर दुसऱया स्लीपमध्ये झेल देत परतला तर काईल जेमिसन बॅकफूटवर जात ऑफ ब्रेक खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. टीम साऊदी त्रिफळाचीत झाला तर कानपूर टेस्टमधील हिरो विल सॉमरव्हिले फॉरवर्ड शॉर्ट लेगकडे सोपा झेल देत तंबूत परतला.

तीन आठवडय़ांच्या कालावधीत भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना सुरु होणार असून त्यापूर्वी संघ पुरेसा बहरात आहे. मध्यफळीत मात्र अद्याप काही चिंता कायम आहेत. संघाचा येथील मालिकाविजय आत्मविश्वास उंचावणारा आहे. मात्र, दस्तुरखुद्द कर्णधार विराट कोहलीसह अनुभवी अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या खराब फॉर्ममुळे चिंतेचीही स्थिती आहे.

श्रेयस अय्यर, शुभमन गिल यांनी आपला फॉर्म दाखवून दिला असून हनुमा विहारीनेही मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. इशांत शर्मा बहरात नाही, ही देखील संघासाठी चिंतेची बाब आहे.

धावफलक

भारत पहिला डाव ः सर्वबाद 325.

न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 62.

भारत दुसरा डाव ः 7 बाद 276 डाव घोषित.

न्यूझीलंड दुसरा डाव ः टॉम लॅथम पायचीत गो. अश्विन 6 (15 चेंडूत 1 चौकार), विल यंग झे. बदली खेळाडू (सुर्यकुमार), गो. अश्विन 20 (41 चेंडूत 4 चौकार), डॅरेल मिशेल झे. जयंत यादव, गो. पटेल 60 (92 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), रॉस टेलर झे. पुजारा, गो. अश्विन 6 (8 चेंडूत 1 चौकार), हेन्री निकोल्स यष्टीचीत साहा गो. अश्विन 44 (111 चेंडूत 8 चौकार), टॉम ब्लंडेल धावचीत (बदली खेळाडू) केएस भरत-साहा 0 (6 चेंडू), रचिन रविंद्र झे. पुजारा, गो. जयंत यादव 18 (50 चेंडूत 4 चौकार), काईल जेमिसन पायचीत गो. जयंत यादव 0 (4 चेंडू), टीम साऊदी त्रि. गो. जयंत यादव 0 (2 चेंडू), विल्यम सॉमरव्हिले झे. अगरवाल, गो. जयंत यादव 1 (7 चेंडू), एजाझ पटेल नाबाद 0 (5 चेंडू). अवांतर 12. एकूण 56.3 षटकात सर्वबाद 167.

गडी बाद होण्याचा क्रम

1-13 (लॅथम, 3.6), 2-45 (विल यंग, 14.3), 3-55 (रॉस टेलर, 16.1), 4-128 (डॅरेल, 34.3), 5-129 (ब्लंडेल, 36.5), 6-162 (रचिन, 51.5), 7-165 (जेमिसन, 53.2), 8-165 (साऊदी, 53.4), 9-167 (सॉमरव्हिले, 55.1), 10-167 (निकोल्स, 56.3).

गोलंदाजी

सिराज 5-2-13-0, रविचंद्रन अश्विन 22.3-9-34-4, अक्षर पटेल 10-2-42-1, जयंत यादव 14-4-49-4, उमेश यादव 5-1-19-0.

जयंत यादवचे दुसऱया डावात उत्तम पुनरागमन

पहिल्या डावात फारशी लक्षवेधी कामगिरी करु न शकलेल्या फिरकीपटू जयंत यादवने दुसऱया डावात मात्र 4 बळी घेत आपल्या फिरकी गोलंदाजीची कमाल दाखवली. वानखेडे स्टेडियमवर आपल्याला खेळपट्टीकडून नेहमीच मदत मिळते, याचा जयंतने येथे उल्लेख केला. ‘सोमवारी सकाळच्या सत्रात बरेच दव होते आणि त्याचा मला लाभ झाला. फक्त योग्य टप्प्यावर मारा करण्याची आवश्यकता होती, त्यात मला यश लाभले. वानखेडेवरच मी एकदा शतकही झळकावले आहे. येथे डावात 5 बळी घेण्याच्या माईलस्टोनपासून किंचीत दूर रहावे लागले असले तरी संघाचा विजय माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे’, असे तो येथे म्हणाला.

कोट्स

युवा खेळाडूंनी उत्तम खेळ साकारल्याने निवडीसाठी अनेक भक्कम पर्याय उभे झाले आहेत. भविष्यातही आम्हाला निवडीचे अनेक पेच सोडवावे लागतील आणि त्यावेळी देखील ज्या-त्या खेळाडूशी थेट संवाद साधून समन्वय साधण्यावर भर असणे क्रमप्राप्त असेल.

-भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड

रहाणेच्या खराब फॉर्मबद्दल मला निष्कर्ष काढता येणार नाही. त्याच्या खराब फॉर्मबद्दल केवळ तोच सांगू शकेल. मात्र, त्याच्यासारखा फलंदाज अशा बॅड पॅचमधून जात असताना आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे असणे महत्त्वाचे असणार आहे.

-भारतीय कर्णधार विराट कोहली

पहिला डाव अवघ्या 62 धावांमध्ये खुर्दा झाला, त्याची आम्हाला पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली. वानखेडे स्टेडियमवरील कसोटीत प्रथम फलंदाजी हाच सर्वोच्च प्राधान्यक्रम असावा लागतो. त्यानंतर खेळ पुढे सरकेल, त्याप्रमाणे येथे फलंदाजी आव्हानात्मक होत जाते.

-न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम

तंत्रशुद्ध खेळापेक्षाही लढवय्या प्रवृत्ती अधिक महत्त्वाची ः मयांक

तंत्रशुद्ध खेळामुळे यशाची खात्री देता येणार नाही. पण, त्यापेक्षा लढवय्या प्रवृत्ती अधिक महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन भारतीय सलामीवीर मयांक अगरवालने केले. मयांकने पहिल्या डावात दीडशतकी खेळी साकारली व त्यानंतर दुसऱया डावात 62 धावांचे योगदान देत सामनावीर पुरस्कार संपादन केला. न्यूझीलंडविरुद्ध भारताने एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.

‘पुन्हा बहरात परतणे नेहमीच दिलासादायक असते आणि येथील योगदान माझ्यासाठी अधिक खास आहे. पहिल्या कसोटीच्या तुलनेत येथे मी माझ्या फलंदाजीत काही बदल केले नाहीत. मी फक्त अधिक खंबीर राहण्यावर भर दिला’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.

यापूर्वी, कानपूरमधील पहिल्या कसोटीत मयांकला अनुक्रमे 13 व 17 अशा किरकोळ धावांवर बाद व्हावे लागले होते. पण, त्यावेळी देखील मुख्य प्रशिक्षक द्रविडनी त्याला तंत्रात कोणताही बदल करणे अपेक्षित नसल्याचे सांगितले होते.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने एजाझ पटेलचा सत्कार

कसोटी क्रिकेटमध्ये डावात 10 बळी घेणारा इतिहासातील केवळ तिसरा गोलंदाज एजाझ पटेलचा मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सन्मान केला. मुंबईचा जन्म असलेल्या एजाझ पटेलने पहिल्या डावात भारताचे सर्वही 10 गडी बाद करत जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुंबई संघटनेच्या वतीने यावेळी एजाझला स्कोअरशीट व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. एजाझने यावेळी मुंबई संघटनेच्या प्रस्तावित म्युझियमसाठी या सामन्यातील चेंडू व टी-शर्ट प्रदान केला. एजाझचे बालपण मुंबईत व्यतित झाले असून त्याचे काही चुलते आताही जोगेश्वरीमध्ये स्थित आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध मालिकाविजयानंतर भारत कसोटी मानांकनात ‘नंबर वन’

2 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 1-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय संघ यानंतर कसोटी मानांकनात अव्वलस्थानी विराजमान झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता आयसीसी कसोटी मानांकन यादीत दुसऱया स्थानावरील न्यूझीलंडपेक्षा 3 गुणांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 108 गुणांसह तिसऱया स्थानी आहे. अव्वलमानांकित भारताच्या खात्यावर 124 तर न्यूझीलंडच्या खात्यावर 121 गुण आहेत. इंग्लंडचा संघ 107 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

भारताचे पुढील लक्ष्य… मिशन दक्षिण आफ्रिका

भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका दौऱयावर जाणार असून तेथे उभय संघात 3 कसोटी व 3 वनडे खेळवले जातील. ही मालिका 26 डिसेंबरपासून सुरु होणे अपेक्षित आहे.

कोट्स

माझ्या दृष्टीने विराट कोहली हा भारताला लाभलेला आजवरचा सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याची विजयाची टक्केवारी 59.09 इतकी लक्षवेधी आहे आणि दुसऱया क्रमांकाची टक्केवारी 45 टक्के इतकी आहे. हा फरकच खूप काही सांगून जाणारा आहे.

-माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण

प्रत्येक क्रिकेट प्रकारात 50 सामने जिंकणारा विराट पहिला खेळाडू

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रत्येकी 50 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून देणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला. भारताने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडचा एकतर्फी फडशा पाडला आणि त्यानंतर विराटच्या खात्यावर हा पराक्रम नोंद झाला.

कसोटी / वनडे / टी-20

50 विजय / 153 विजय / 59 विजय

सामने ः 97 / सामने ः 254 / सामने ः 95

2010-2011 / 2008-2021 / 2010-2021

बॉक्स

कसोटीत भारताचे सर्वात मोठे 5 विजय

धावांचा फरक / वर्ष / प्रतिस्पर्धी / ठिकाण

372 / 2021 / न्यूझीलंड / मुंबई

337 / 2015 / द. आफ्रिका ़/ दिल्ली

321 / 2016 / न्यूझीलंड / इंदोर

320 / 2008 / ऑस्ट्रेलिया / मोहाली

318 / 2019 / वेस्ट इंडीज ़/ अँटिग्वा.

मायदेशात भारताचा सलग 14 वा मालिकाविजय

दौरा / वर्ष / विजयी संघ / फरक (सामने)

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा / 2012-13 / भारत / 4-0 (4)

विंडीजचा भारत दौरा / 2013-14 / भारत / 2-0 (2)

द. आफ्रिकेचा भारत दौरा / 2015-16 / भारत / 3-0 (4)

न्यूझीलंडचा भारत दौरा / 2016-17 / भारत / 3-0 (3)

इंग्लंडचा भारत दौरा / 2016-17 / भारत / 4-0 (5)

बांगलादेशचा भारत दौरा / 2016-17 / भारत / 1-0 (1)

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा / 2016-17 / भारत / 2-1 (4)

श्रीलंकेचा भारत दौरा / 2017-18 / भारत / 1-0 (3)

अफगाणचा भारत दौरा / 2018 / भारत / 1-0 (1)

विंडीजचा भारत दौरा / 2018-19 / भारत / 2-0 (2)

द. आफ्रिकेचा भारत दौरा / 2019-20 / भारत / 3-0 (3)

बांगलादेशचा भारत दौरा / 2019-20 / भारत / 2-0 (2)

इंग्लंडचा भारत दौरा / 2020-21 / भारत / 3-1 (4)

न्यूझीलंडचा भारत दौरा / 2021-22 / भारत / 1-0 (2).

Related Stories

कोरियन एफए चषक फुटबॉल स्पर्धा 9 मे पासून

Patil_p

इंग्लिश संघात रुटकडेच शतक झळकावण्याची क्षमता

Amit Kulkarni

दुसऱया कसोटीतून शकीब अल हसन बाहेर

Patil_p

मँचेस्टर युनायटेडची न्यू कॅसलविरुद्ध बरोबरी

Patil_p

संकटावर मात करीत अमित, सोनियाने मिळविली पदके

Patil_p

जॉर्डन हेंडरसन वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p
error: Content is protected !!