तरुण भारत

बॅक कर्मचाऱयाच्या सतर्कतेने टळली वृध्देची फसवणूक

आंगठा घेऊन परस्पर पैसे लाटण्याचा प्रयत्न फसला

वार्ताहर/ संगमेश्वर

Advertisements

बँक कर्मचाऱयाच्या सतर्कतेमुळे एका वृध्देची दुसऱयांदा होणारी आर्थिक फसवणूक थोडक्यात टळली. मात्र याच महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत तब्बल 40 हजाराची रक्कम एका गावपुढाऱयाने आपल्या खात्यात वर्ग केल्याची बाबही या प्रसंगातून उघड झाली आहे.

हा प्रकार वांझोळे जवळच्या एका गावात घडला आहे. येथील एका महिलेच्या  पतीचे निधन झाले असून मुलगा बाहेर असतो. काबाडकष्ट करून महिलेने लाखभर रुपयांची बचत साखरप्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेत ठेवली होती. ही बाब गावातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या लक्षात आली. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत या ग्रामपंचायत सदस्याने निराधार पेशन योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमीष दाखवत महिलेला रिक्षाने साखरपा येथे बँकेत आणले. सोबत त्या महिलेचे बँक पासबूक आणि आधारकार्ड व अन्य कागदपत्र होते. बँकेत गर्दी असल्यामूळे पेन्शनचे कागदपत्र असल्याचे सांगून पैसे काढण्याच्या स्लीपवर वृध्देचा आंगठा या सदस्याने घेतला व तेथेच बसण्यास सांगितले. प्रत्यक्षात वृध्देच्या खात्यातील 40 हजार रुपये काढून या महाशयांनी ते आपल्या खात्यात जमा केले होते.

काही दिवसांनी बँकेत पेन्शनच्या चौकशीसाठी जाण्याचा बनाव करून त्या सदस्याने पुन्हा तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील नामक बँक कर्मचाऱयाला त्याचा संशय आल्याने त्याने खातेदार महिलेला घेऊन येण्याचा आग्रह धरला. गर्दी आणि वृध्देच्या तब्ब्येतीचे कारण देऊन या ग्रामपंचायत सदस्याने ते महिलेला पुढे आणणे टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र बँक कर्मचाऱयाने पैसे देण्यास ठाम नकार दिल्याने ‘त्या’ पुढाऱया’चा नाईलाज झाला. त्याला त्या महिलेला बँक कर्मचाऱयासमोर आणणे भाग पडले. यावेळी महिलेकडे खात्यातून पैसे काढण्याबद्दल बँक कर्मचाऱयाने विचारणा केली असता आपण पैसे काढायला नव्हे तर पेन्शन जमा झाली का हे पाहायला आल्याचे सांगितले. यामुळे त्या पुढाऱयाचा बनाव उघड झाला.

आता आपला तमाशा होईल या भीतीने त्या ग्रामपंचायत सदस्याने त्या महिलेची कशीबशी मनधरणी केली व तेथून काढता पाय घेतला. मात्र बँकेतील या प्रकाराची जोरदार चर्चा सुरु झाली होती. कर्णोपकर्णी होत गावातील काही मंडळीना ही माहिती समजली. त्यांनी वृध्देचे पासबूक अपडेट करून आणले. यावेळी 40 हजार रुपये त्या ग्रामपंचायत सदस्याने आधीच हडप केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

हा प्रकार आता गावातच ‘मिटवण्या’चे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. घावातील काही सुजाण नागरिकांनी त्या महिलेला तिचे पैसे परत मिळालेच पाहिजेत यासाठी आग्रह धरला आहे तर काही राजकीय मंडळी ‘त्या’ पुढाऱयाला धडा शिकवण्याची भाषाही करू लागले आहेत. मात्र यासंबंधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थ कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

पोलादपूरनजीक पर्यटकांची कार दरीत कोसळली

Abhijeet Shinde

अडकलेले जहाज हलवण्याची संधी हुकणार!

Patil_p

विलगीकरण कक्षात आणखी एक रुग्ण

NIKHIL_N

रत्नागिरीसाठी आठ दिवसांची टाळेबंदी आदेश सर्वथा चुकीचा: ऍड.भाटकर

Patil_p

कार्तिकी एकादशीच्या उत्सावाला सशर्त परवानगी

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हा बँकेकडून 57.58लाख

NIKHIL_N
error: Content is protected !!