तरुण भारत

खानापूर ते सुवर्णविधानसौध संघर्ष पदयात्रा काढणार

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची घोषणा : खानापूर तालुक्यातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन

प्रतिनिधी /खानापूर

Advertisements

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत खानापूर तालुक्यातील विविध समस्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये शेतकऱयांना योग्य ती नुकसानभरपाई, बस समस्या, अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, पुलांचा विकास, शाळा इमारती, ग्रामीण रस्त्यांचा विकास यासारख्या एक ना अनेक समस्या आहेत. याबद्दल विधानसभेत वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. सरकारला निवेदने दिली. पण राज्य शासनाने याकडे दुर्लक्षच केल्याने तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दि. 13 डिसेंबरपासून बेळगावला विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. खानापूर तालुक्याच्या समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 12 व दि. 13 डिसेंबर रोजी खानापूर ते सुवर्णसौध अशी 40 कि. मी. संघर्ष पदयात्रा काढून सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी त्या म्हणाल्या, खानापूर तालुक्यात गेली दोन वर्षे शेतकऱयांना अतिवृष्टीमुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे खानापूर तालुक्यातील जवळपास साडेतीन हजार हेक्टरमधील भातपिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पण राज्य शासनाने 1 एकर भातशेतीला केवळ 2720 रुपये इतकी अल्पशी नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. भात उत्पादनासाठी शेतकऱयांना कमीतकमी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. यामुळे एकरी 20 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करूनही राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

तालुक्यातील शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. तालुक्यातून दररोज हजारो विद्यार्थी शाळा-कॉलेजसाठी ग्रामीण भागातून खानापूर व बेळगावला जातात. पण जाण्या-येण्यासाठी अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. तसेच जिल्हय़ातील सर्व बसस्थानके हायटेक झाली. खानापूर बसस्थानकाचे हायटेक बसस्थानक व्हावे यासाठी 8 कोटीचा निधी मंजूर करून आणला. पण त्या कामाला सुरुवात करण्यासाठी राज्य शासनाकडून दिरंगाई केली जात आहे. तसेच अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जवळपास 23 कि. मी. राज्यमार्ग अतिशय खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यक्षेत्रात येणारे जिल्हा रस्तेही अत्यंत खराब झाले आहेत. या मार्गावर 8 ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी करावी, अशी राज्य शासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. तसेच ग्रामीण भागातील नोंदणीकृत 872 रस्त्यांपैकी जवळपास 720 रस्त्यांचा विकास झालेला नाही. विशेषतः वनखात्याच्या अखत्यारीत येणाऱया रस्त्यांच्या विकासासाठी तसेच पुलासाठी निधी मंजूर करून आणला तरी त्याची पूर्तता करताना वनखात्याकडून अडसर निर्माण केला जात आहे. 

तालुक्यात जवळपास 270 शाळा खोल्यांची कमी जास्त प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच 67 शाळा इमारती पूर्णतः कोसळल्या आहेत. याकडेही राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन तसेच जलजीवन योजनेची घोषणा केली. या योजनांसाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा होती. पण यासाठी दरवर्षी ग्रा. पं. ना मिळणाऱया 22 लाख रुपयाच्या निधीमधील काही भाग या योजनांसाठी खर्च केला जात असल्याने ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील इतर विकासकामे करणे कठीण जात आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाने विशेष निधी मंजूर करावा, अशीही आपली मागणी आहे.

प्रत्येक अधिवेशनामध्ये याविरुद्ध आपण आवाज उठविला. विधिमंडळात आश्वासन मिळते. पण त्याची पूर्तता होत नाही. यामुळे राज्य शासन खानापूर तालुक्यातील समस्यांचे निवारण करणार की नाही, की खानापूर तालुक्याला राज्य शासनाने वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या साडेतीन वर्षात तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत राज्य शासनाकडून केवळ 600 कोटीचा निधी मंजूर झाला. पण अपुऱया निधीमुळे बरीच विकासकामे रखडली आहेत. यामुळेच आता खानापूर तालुक्याला न्याय मिळण्यासाठी संघर्षाची भूमिका स्वीकारली असून या संघर्ष पदयात्रेत तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शेतकरी तसेच जनतेने मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

ही संघर्ष पदयात्रा रविवार दि. 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता तहसीलदार कार्यालयापासून सुरू होणार आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग, पारिश्वाड रोड, बरगाव, गर्लगुंजी, राजहंसगडमार्गे येळळूरला पोहोचणार आहे. येळळूर येथे संघर्ष पदयात्रेचा मुक्काम असून सोमवार दि. 13 रोजी पहाटे पुन्हा पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. येळळूर, वडगाव, येडियुराप्पा रोड मार्गे सकाळी 9.30 वा. सुवर्णसौधसमोर पदयात्रा पोहोचणार आहे. त्याठिकाणी धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.

कुचकामी खासदार

खानापूर तालुक्यातील जनतेने कारवार मतदारसंघातील खासदार अनंतकुमार हेगडे यांना भरघोस पाठिंबा देऊन सतत पाचवेळा लोकसभेला निवडून आणले. पण या खासदारांकडून खानापूर तालुक्याच्या विकासाला कोणताच हातभार लागला नाही. कुचकामी खासदार व अकार्यक्षम राज्य शासन यामुळेच तालुक्याच्या विकासाला योग्यप्रकारे चालना मिळत नसल्याची खंत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Related Stories

जुना महात्मा फुले रोड रुंदीकरणाचा आटापिटा

Patil_p

मनपा निवडणूक प्रकियेला प्रारंभ

Amit Kulkarni

कर्नाटक: रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या आहारात केले बदल

Abhijeet Shinde

भडकल गल्ली परिसरात गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

टिळकवाडी, शहापूर, अनगोळ, वडगाव सुनेसुने

Amit Kulkarni

रानडे रोड येथील ड्रेनेज वाहिनीची अखेर दुरुस्ती

Omkar B
error: Content is protected !!