तरुण भारत

शिवाजी महाराज भारतीय लष्कराचे दैवत

ब्रिगेडिअर एम. एस. मोखा यांचे प्रतिपादन : लोकमान्य सोसायटीला सदिच्छा भेट, लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचे कौतुक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम हा देदीप्यमान आहे. छत्रपतींनी आपल्या युद्धनितीतून ‘ऑपरेशन आर्ट’ जगाला शिकविले. त्यांचा एक एक सेनानी हा शंभर मावळय़ांची ताकद ठेवत होता. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शिलेदारांकडून प्रत्येकालाच प्रेरणा मिळते. त्यामुळे भारतीय सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानते, असे प्रतिपादन डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सिचे ब्रिगेडिअर एम. एस. मोखा यांनी केले.

त्यांनी सोमवारी गुरुवारपेठ येथील लोकमान्य को-ऑप. सोसायटीला सदिच्छा भेट दिली. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी लोकमान्य सोसायटीच्या प्रगतीचे कौतुक करत यापुढेही लोकमान्यने भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची विनंती केली.

मराठीशी जवळचा संबंध

माझा जन्म व शिक्षण हे महाराष्ट्रातील मातीमध्ये झाले. त्यामुळे मराठी व छत्रपती शिवरायांशी एक वेगळी नाळ जोडली गेली. लष्करात नेमणूक होत होती, तेव्हाही मराठा लाईट इन्फंट्रीला प्रथम प्राधान्य दिले. त्यावेळी काही लोक मला विचारत होते. शीख असूनही मराठा लाईट इन्फंट्रीमध्येच नेमणूक का घेणार? तेव्हा मी त्यांना सांगायचो छत्रपतींची प्रेरणा घेऊन मी मोठा झालो त्यामुळे त्यांच्या विचाराने चालणाऱया रेजीमेंटमध्येच काम करणार. यातूनच मराठी व माझे नाते अधिकच दृढ झाल्याचे ब्रिगेडिअर मोखा यांनी
सांगितले.

बेळगावमध्ये उभारणार शूरवीरांचे स्मारक

बेळगावमधील लोकांनी लोकवर्गणीतून शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारली. यामुळे बेळगावमध्ये आलेला प्रत्येकजण शिवतीर्थला भेट देऊन मूर्ती व आसपास बनविलेले किल्ले पाहतो. त्यावेळी ब्रिगेडिअर मोखा यांनी सहकार्य केल्यामुळेच अश्वारुढ शिवमूर्ती उभी राहू शकली. याच धर्तीवर बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप यासारख्या शूरवीरांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे लोकमान्यचे चेअरमन किरण ठाकुर यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष डॉ. डी. पी. वागळे, संचालक अजित गरगट्टी, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक विनायक जाधव यांनी केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.

बेळगाव विषयी कृतज्ञता व्यक्त

बेळगाव व माझे नाते हे अनेक वर्षांपासूनचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी प्रथमतः बेळगावला आलो. त्यानंतर एका प्रशिक्षणासाठी व डेप्युटी कमांडर म्हणून बेळगावमध्ये काम केले आहे. मी बेळगावमध्ये असतानाच शिवतीर्थावर महाराजांची भव्य मूर्ती बसविण्यात आली. शिवतीर्थमुळे बेळगावची नवी ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल ब्रिगेडिअर मोखा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात पाच उपआरटीओ कार्यालये

Patil_p

धामणे बसवाण्णा मंदिर चोरीबाबत नागरिकांची पोलीस निरीक्षकांशी चर्चा

Patil_p

मंड्या : तहसील कार्यालय तीन दिवस सील

Abhijeet Shinde

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली

Amit Kulkarni

आनंदवाडीतील नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

किणये येथे बालिकांनी साकारल्या नवदुर्गा

Amit Kulkarni
error: Content is protected !!