तरुण भारत

सच्चिदानंद स्वरूपाचा प्रभाव

अध्याय बारावा

भगवंत म्हणाले, उद्धवा ! ज्याचा जसा भाव असतो, त्यासाठी मी तसाच देव होतो. ह्यात संशय नाही. मी भक्तांना कोणत्याही वेळी विन्मुख होत नाही. जो भक्त जशी भावना धरतो, त्याला मी तसाच फलद्रूप होतो. मी लोकांना नेहमी सन्मुख आहे. पण लोकच मला विन्मुख होतात. त्याला माझा काही इलाज चालत नाही. मी सकामाच्या ठिकाणी सकाम असतो व निष्कामाच्या ठिकाणी निष्काम असतो. नास्तिकाला तर मी तिन्ही लोकात असताही नास्तिकपणामुळे नाहीसा होतो. असो, ही उपपत्ती किती सांगावी ? ऐक. गोपीना माझी प्रीती होती म्हणून माझ्या सुखाच्या संगतीत त्यांनी ज्या रात्री घालवल्या, त्या त्यांनी निमिषार्धासारख्या मानल्या पण त्यांना निसर्गतःच ज्या रात्री प्राप्त झाल्या होत्या, त्या रात्री माझ्या वियोगाने त्या गोपिका, त्यांचे पती जवळ असताही कल्पाप्रमाणे मोठय़ा मानू लागल्या. त्यांच्या या दुःखाची स्थिती शब्दाने मुळीच सांगवत नाही. माझ्या वियोगामध्ये माझे स्मरण करीत असता त्या समाधिअवस्था पावल्या ! मी जरी गोकुळ सोडून गेलो तरी त्या माझ्याच आठवणीत रमायच्या. सडासंमार्जन करताना त्या गोपिकांना माझेच ध्यान लागलेले असे. फार काय, माझे स्मरण करूनच त्यांचे बालकांना झोके देणे चालत असे. गाईची धार काढताना माझ्याच स्मरणावर त्यांची आसक्ति असे. तात्पर्य, सर्व कामे करताना माझ्या विस्मरणाची गोष्टच त्या विसरून गेल्या होत्या. कोठेही जाणे येणे करीत असताना त्यांचे मन माझ्या ठिकाणी अखंडपणे लागलेले होते. बसताना, जेवताना, पिताना त्यांना माझेच ध्यान लागलेले असे. सारांश, मी गेल्यावर त्यांना माझी अशी अतिशय आवड लागली होती. त्यांचे डोळे अखंड मजकडेच लागून राहिले होते. त्या सदासर्वदा माझ्याच गोष्टी बोलत असत. अशी सर्व ठिकाणी गोपींची आणि माझी अनन्य प्रीती होती. त्या घरादारात वागत असूनही माझ्यामघ्यें रंगून गेल्या होत्या. अशाप्रकारे त्यांची बुद्धीच मत्स्वरूप झाली होती, म्हणून त्या घरदारही विसरून गेल्या. त्या पुत्र व पती विसरून गेल्या आणि आपला कामधंदाही त्या विसरल्या. माझा निदिध्यास लागल्यामुळे त्या विषयसुख विसरल्या. त्या शीत-उष्ण इत्यादि द्वंद्वदुःखे विसरल्या. त्या तहान-भूक विसरल्या. ज्या देहामुळे पतीला व पुत्राला त्यांच्या मनाने आप्त असे मानलेले होते, त्या देहाला विसरून मनानंच माझ्यामध्ये रममाण झाल्या. त्या इहलोक व परलोक विसरल्या. त्या संपूर्ण कार्यकारण विसरल्या. हे पहा ! माझे ध्यान करीत राहिल्यामुळे होणाऱया आनंदसुखाचा उपभोग घेता घेता त्या आपले नाम व रूप देखील विसरल्या. चोवीस तत्वांचे सर्व विकार निरसून टाकून मुनिश्रे÷ समाधी लावतो. तो त्या समाधीत ज्याप्रमाणे सर्व संसार विसरतो, त्याप्रमाणे गोपीही सर्व संसार विसरून मत्स्वरूपच झाल्या. ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या नद्या आपल्या समुद्राला मिळाल्या असता त्या जशा समुद्राशी एकरूपता पावून आपली नावे व रूपे विसरून जातात त्याप्रमाणे गोपिकाही अनन्यप्रीतीने मत्स्वरूपाला मिळाल्यामुळे नामरूपाचे बोलणेच विसरून गेल्या. त्यांना ह्यापैकी कशाचीच स्फूर्ति होईना. माझ्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रभाव काय सांगावा ? खरोखर माझा स्वभाव त्यांना माहित नसताही त्या गोपिकांचा अनन्यभाव माझ्याच ठिकाणी होता. त्यामुळेच त्या परब्रह्मस्वरूपाला पोचल्या. त्या माझे खरे रूप जाणत नव्हत्या त्या मला फक्त प्रियतमच समजत होत्या आणि जारभावाने भेटण्याची इच्छा करीत होत्या असे असूनही त्या शेकडो, हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगाच्या प्रभावानेच परब्रह्म अशा मला प्राप्त करून घेतले. त्या गोपी केवळ अबला होत्या हे तर खरेच पण माझ्या संगतीचे त्यांना अत्यंत प्रेम होते. आणि ती संगतीसुद्धा कामासक्तीची म्हणजे शास्त्रप्रवृत्तीच्या विरुद्ध अशी होती. मी शास्त्राप्रमाणे त्यांचा पती नव्हतो. पण स्वरूपाने मात्र मदनालाही मोह पाडणारा असा सुंदर होतो. त्यामुळे माझा मोह त्यांना सहजी पडे पण मी सच्चिदानंद असल्याने माझ्या सहवासात कामाचा समावेश होणे शक्मयच नव्हते. त्यामुळे गोपिकांचा समज काहीही असला तरी माझ्या संगतीत राहिल्याने, मी त्यांना तात्पुरते सहवाससुख न देता मुक्ती दिली.

Advertisements

क्रमशः

Related Stories

औद्योगिक संस्था प्रमुखांचे आचरण शुद्ध हवे

Patil_p

आरक्षणाचा खेळ झालाच!

Patil_p

महत्त्वपूर्ण निवडणुका

Amit Kulkarni

रक्ताळत्या हातांची चिंता!

Patil_p

‘टॉम अँड जेरी शो’ नव्हे, सिंहावलोकन हवे!

Patil_p

नाग्याची व्यसनमुक्ती

Patil_p
error: Content is protected !!