तरुण भारत

भारताविरुद्ध मालिकेसाठी रबाडा-नोर्त्झेचे पुनरागमन

कसोटी मालिकेसाठी यजमान दक्षिण आफ्रिकेचा 21 सदस्यीय संघ जाहीर, उभय संघातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून

जोहान्सबर्ग / वृत्तसंस्था

Advertisements

भारताविरुद्ध खेळवल्या जाणाऱया 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला 21 सदस्यीय संघ जाहीर करताना अव्वल दर्जाचे खेळाडू निवडण्यावर पूर्ण भर दिला. निवडलेल्या संघात अनुभवी जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झेचे पुनरागमन लक्षवेधी आहे. याशिवाय, 2019 मध्ये शेवटची कसोटी खेळलेल्या मध्यमगती गोलंदाज डय़ुआन ऑलिव्हरचेही संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकन संघाचे नेतृत्व डीन एल्गारकडे असेल.

या 21 सदस्यीय संघातील सिसान्दा मगला व यष्टीरक्षक-फलंदाज रियान रिकेल्टन हे दोन नवे चेहरे आहेत. ग्लेन्टॉन स्टूरमन व प्रेनेलन सुब्रायन हे देखील संघात समाविष्ट आहेत. दक्षिण आफ्रिकेत नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण सापडल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे. या कारणामुळे ही मालिका देखील धोक्यात होती. मात्र, दोन्ही मंडळांनी सहमतीने मालिका एका आठवडय़ाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकन निवड समितीचे समन्वयक व्हिक्टर मित्संग यांनी कसोटी मालिका विशेष महत्त्वाची असून दोन्ही नियामक मंडळांचा हा प्राधान्यक्रम राहिला आहे, असे सांगितले. ‘आपल्या संघाने विंडीजविरुद्ध वर्चस्व गाजवल्यानंतर प्रदीर्घ कालावधी क्रिकेट मालिका होऊ शकलेल्या नाहीत. आता नव्या दमाने संघ मैदानात उतरेल, त्यावेळी वर्चस्वाची ही मालिका कायम ठेवण्यात त्यांना यश येईल, अशी अपेक्षा आहे’, याचा व्हिक्टर यांनी पुढे उल्लेख केला.

उभय संघातील 3 कसोटी सामन्यांची ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल आणि भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील पहिल्यावहिल्या मालिकाविजयासाठी तेथे निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे. मालिकेतील पहिली कसोटी सेंच्युरियन, दुसरी कसोटी जोहान्सबर्ग व तिसरी कसोटी केपटाऊन येथे खेळवली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात 3 वनडे होतील. या मालिकेत प्रारंभी समाविष्ट असणारी 4 टी-20 सामन्यांची मालिका कालांतराने खेळवली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकन संघ ः डीन एल्गार (कर्णधार), तेम्बा बवूमा (उपकर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), कॅगिसो रबाडा, सारेल इर्वी, ब्यूरन हेन्ड्रिक्स, जॉर्ज लिंडे, पेशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्करम, वियान मल्डर, ऍनरिच नोर्त्झे, किगन पीटरसन, रॅस्सी व्हान डर डय़ुसेन, काईल व्हेरेएन, मार्को जान्सेन, ग्लेन्टॉन स्टूरमन, प्रेनेलन सुब्रायन, सिसान्दा मगला, रियान रिकेल्टन, डय़ुआन ऑलिव्हर.

पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून, मालिकेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने भारताविरुद्ध होणाऱया आगामी कसोटी व वनडे मालिकेचा सुधारित कार्यक्रम सोमवारी जाहीर केला असून यानुसार, उभय संघातील पहिली कसोटी दि. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवली जाणार आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका व बीसीसीआय यांनी यापूर्वी मागील आठवडय़ात मालिका एका आठवडय़ाने लांबणीवर टाकत असल्याची संयुक्त घोषणा केली होती. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, भारतीय संघ दि. 9 डिसेंबर रोजी या दौऱयावर रवाना होणार होता. मात्र, नंतर दक्षिण आफ्रिकेतील प्रतिकूल परिस्थिती पाहता, यात बदल करण्यात आले.

‘या दौऱयात तीनऐवजी 2 मालिका होतील. एकंदरीत 4 मैदानांवर दि. 26 डिसेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत बेटवे कसोटी व वनडे आंतरराष्ट्रीय मालिका होईल. 4 सामन्यांची केएफसी टी-20 मालिका नव्या वर्षात परिस्थितीनुरुप आयोजित केली जाईल’, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पत्रकाद्वारे नमूद केले.

कसोटी, वनडे मालिकेची रुपरेषा

लढत / कालावधी / ठिकाण

पहिली कसोटी / 26 ते 30 डिसेंबर / सेंच्युरियन

दुसरी कसोटी / 3 ते 7 जानेवारी / जोहान्सबर्ग

तिसरी कसोटी / 11 ते 15 जानेवारी / केपटाऊन

पहिली वनडे / 19 जानेवारी / पर्ल

दुसरी वनडे / 21 जानेवारी / पर्ल

तिसरी वनडे / 23 जानेवारी / केपटाऊन.

Related Stories

ऍथेन्स मॅरेथॉन रद्द

Patil_p

दोन्ही व्यवस्थापनात सुसंवाद आहे का?

Patil_p

पोर्टो, डॉर्टमंड विजयी, ज्युवेंट्स पराभूत

Amit Kulkarni

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

Patil_p

19 डिसेंबरला आयओएची निवडणूक

Patil_p

सेहवाग म्हणाला, ‘त्या’ पंचांनाच द्या सामनावीर पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!