तरुण भारत

ऑस्ट्रेलियात वणवा, हजारोंचे स्थलांतर

4 हजारांहून अधिक जण अडकले : बचावमोहीम सुरूच

वृत्तसंस्था/ मेलबोर्न 

 ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-पूर्व भागातील जंगलांमध्ये भीषण आग पसरली आहे. व्हिक्टोरिया प्रांताच्या मल्लकुटा शहरात 4 हजारांहून अधिक रहिवासी आणि पर्यटक अडकून पडले आहेत. तर हजारो लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. ऑस्ट्रेलियात सुटी व्यतित करण्यासाठी पोहोचलेल्या पर्यटकांना त्वरित अन्यत्र जाण्याचा इशारा अधिकाऱयांनी दिला आहे.

घर सोडून जाण्याशिवाय पर्यायच नसल्याचे उद्गार मल्लकुटाचे रहिवासी जेसन सेल्मेस यांनी काढले आहेत. आगीच्या ज्वाळांमुळे आकाशाला नारिंगी रंग प्राप्त झाला आहे. मल्लकुटा येथे आपत्कालीन सेवेची तीन पथके तैनात आहेत. समुद्र किनाऱयावर आश्रय घेतलेल्या 4 हजार जणांची देखभाल त्यांच्याकडून केली जात आहे. आपत्कालीन सेवा विभागाने वैद्यकीय केंद्र स्थापन करण्यासह लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे.

मल्लकुटा शहर अद्याप आगीच्या ज्वाळांमध्ये अडकून पडले आहे. येथील अनेक घरे जळून खाक झाली आहेत. शहरात राहत असलेल्या समुदायासाठी हा अत्यंत अवघड काळ आहे. या लोकांना भीतीच्या छायेत जगावे लागत आहे. या लोकांची जीवन लवकरच पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण अनेक जणांनी स्वतःच्या घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती फायर अथॉरिटीचे प्रमुख स्टीव्ह वॉरिंग्टन यांनी दिली आहे.

40 अंशापेक्षा अधिक तापमान

बिघडत चाललेली स्थिती पाहता ऑस्ट्रेलियातील 4 राज्यांमध्ये आपत्कालीन स्थितीचा इशारा देण्यात आला आहे. या क्षेत्रांमधून पर्यटकांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना माघारी येण्याचा निर्देश देण्यात आला आहे. 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आणि 100 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असल्याने व्हिक्टोरिया प्रांताच्या पूर्व गिप्सलँडमधून 30 हजार जणांना स्थलांतराची सूचना करण्यात आली आहे.

न्यू साउथ वेल्समध्ये मोठे नुकसान

आगीच्या तावडीत सापडल्याने न्यू साउथ वेल्सच्या कोरबॅगो शहरात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 वर्षीय स्वयंसेवकाचा सोमवारी मृत्यू झाला आहे. तर डिसेंबरच्या प्रारंभी अन्य दोन स्वयंसेवकांना जीव गमवावा लागला होता. मागील 4 महिन्यांपासून आगीच्या घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. न्यू साउथ वेल्समध्ये वणव्यामुळे 1000 हून अधिक घरे जळून भस्मसात झाली आहेत. दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियाच्या 3 लाख हेक्टर क्षेत्रांमध्ये आग फैलावली आहे.

Related Stories

पाकव्याप्त काश्मिरमध्ये 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प

datta jadhav

लसनिर्मितीत महिला वैज्ञानिक आघाडीवर

Patil_p

चीनमध्ये महापूर;140 जणांचा मृत्यू

datta jadhav

रशियाची ‘ती’ लस ऑगस्ट मध्यापर्यंत होणार उपलब्ध

datta jadhav

अमेरिकेचे भारताला समर्थन, ड्रगन बिथरला

Omkar B

चीन : 15 नवे रुग्ण

Omkar B
error: Content is protected !!