तरुण भारत

‘अ’ गट नाटय़स्पर्धेत रुदेश्वरचे ‘पालशेतची विहिर’ प्रथम

नागेश महालक्ष्मी बांदिवडेचे ‘येळकोट’ द्वितीय तर नटरंग क्रिएशन नार्वेचे ‘आवरण’ तृतीय

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

कला अकादमीने आयोजित केलेल्या 52 व्या ‘अ’ गट नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून रुद्रेश्वर पणजी यांनी सादर केलेल्या ‘पालशेतची विहिर’ या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़समाज बांदिवडे फेंडा यांच्या ‘येळकोट’ या नाटकास पंचाहत्तर हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले.

  नटरंग क्रिएशन्स नार्वे डिचोली यांच्या ‘आवरण’ या नाटकाची पन्नास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिक अथर्व वेद आल्तिनो पणजी यांच्या रामोशान आणि श्री बाळसती नाटय़कला संघ सुकतळी धारबांदोडा यांच्या ‘तनमाजोरी’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आले.

दीपक आमोणकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक दीपक आमोणकर यांना ‘पालशेतची विहिर’ या नाटकासाठी प्राप्त झाले असून अजीत केरकर यांना येळकोट नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले, तर तृतीय पारितोषिक आवरण या नाटकासाठी संतोष शेटकर यांना देण्यात आले.

अभिषेक नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक

पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी अभिषेक नाईक यांना येळकोट नाटकातील श्रीधर भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक मयूर मयेकर यांना रामोशोन या नटाकातील कालिराम भूमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे दीपक आमोणकर (तात्यासाहेब कोल्हटकर – पालशेतची विहिर), मिलिंद बर्वे (नारायण शास्त्री – आवरण), ऋतुज शेट वेरेकर (वाश्या – तनमाजोरी), व्यंकटेश गावणेकर (हलवाई / इसम / इन्स्पेक्टर – बुड बुड रे घागरी), सौरभ कारखानीस (सिराज – दो बजनिए), अमोघ बुडकुले (अशोक – येळकोट), विश्वजित फडते (द्रोणाचार्य – द्रोणाचार्य पुन्हा एकदा) यांना प्राप्त झाली.

सिद्धी उपाध्ये ठरल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी सिद्धी उपाध्ये यांना पालशेतची विहिर नाटकातील हिराबाई भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून ममता शिरोडकर यांना आवरण या नाटकातील लक्ष्मी गौडा भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे प्राजंल मराठे (मंजिरी -यदृच्छा), मंगला जांभळे (शनिचरी – रुदाली), प्रज्ञा कामत (अमू कोमल आणि तीव्र खिडक्या), स्नेहल शेटये (स्त्री – राशोमोन), साध्वी मावजेकर (सुनंदा – यळकोट), पूर्ती सावर्डेकर (अंजना – बॉयल्ड बिन्स ऑन टोस्ट) आणि पद्मा भट (मायावती – चाफा) यांना प्राप्त झाली.

मयुर कांबळी यांना नेपथ्यसाठी प्रथम पारितोषिक

उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक मयुर कांबळी यांना बॉयल्ड बिन्स ऑन टोस्ट नाटकासाठी प्राप्त झाले असून शंभूनाथ केरकर यांना यळकोट नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. पालशेतची विहिर नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी सतीश नार्वेकर यांनी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्र आवरण नाटकासाठी संतोष शेटकर यांना देण्यात आले आहे. वेशभूषेसाठी बक्षीस मनुजा नार्वेकर लोकुर यांना पालशेतची विहिर नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्र प्रियांका नाईक यांना चाफा नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक केदार मणेरीकर यांनी कोमल आणि तीव्र खिडक्या या नाटकासाठी प्राप्त केले असून सनी राऊळ यांना राशोमोन नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.

ज्ञानेश मोघे यांना नाटय़संहिता अनुवादनाचे पारितोषिक

रंगभूषेचे पारितोषिक एकनाथ नाईक यांनी पालशेतची विहिर या नाटकासाठी संपादन केले, तर अमिता नाईक यांना दो बजनिएसाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्वतंत्र नाटय़संहिता लेखनाचे प्रथम पारितोषिक विजयकुमार नाईक यांना पालशेतची विहिर या नाटकासाठी तर द्वितीय पारितोषिक मिलिंद बर्वे यांना आवरण नाटकासाठी देण्यात आले असून खास स्पर्धेसाठी नाटय़संहिता अनुवादनाचे पारितोषिक ज्ञानेश मोघे यांना राशोमोन नाटकासाठी देण्यात आले.

स्पर्धेसाठी 18 नाटकांचे सादरीकरण

या स्पर्धेसाठी एकूण 21 प्रवेशिका विविध संस्थाकडून आल्या होत्या. त्यातून 18 नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण सुनील खानोलकर (मुंबई), सुभाष भागवत (मुंबई) व राहूल अनंत वैद्य (मुंबई) या परीक्षक मंडळाने केले. पारितोषिक प्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल याची नाटय़प्रेमी रसिकांनी व स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे कला अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

कोरोनाचे रविवारी 57 रुग्ण, एकाचा मृत्यू

Patil_p

सोनसडय़ाचे कामकाज ‘शॅडो कौन्सिल’कडे सोपवा

Amit Kulkarni

मिशन मोदी अगेन पीएम मोहिमेचा राज्यात विस्तार करणार

Patil_p

नावेली आरोग्य केंद्राचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार : आरोग्यमंत्री

Amit Kulkarni

स्पेनचे झेवियर एफसी गोवाचे स्ट्रँग्थ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक

Omkar B

डॉ. एडविन गोम्स ठरले देवदूत…

Omkar B
error: Content is protected !!