तरुण भारत

ऑपरेशन डिकॉय!

हैदराबाद येथील डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने गत महिन्यामध्ये संपूर्ण देश हादरला. देशभर त्याविरोधात नागरिकांनी आंदोलन छेडले. पोलिसांनी आरोपींचे एन्काउंटर करून मोठय़ा संतापाला शमविण्याचे काम केले. पोलिसांचे हे कृत्य योग्य की अयोग्य यावर चर्चा झडत राहिल्या. अजूनही झडत आहेत. पण, आरोपींचे एन्काउंटर झाल्यानंतर तरी स्त्री सुरक्षित झाली आहे काय? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. आजही प्रत्येक आठव्या मिनिटाला देशातील एखादी तरी स्त्री कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अत्याचाराला आणि हिंसाचाराला सामोरी जातच आहे. रोज शेकडो जणींची छेड काढली जाते. अनेकजणी वासनेची शिकार बनतात. त्यांची कुठे खबरबातही लागत नाही. एखाद्या निर्भयाच्या घटनेनंतर देशातील वातावरण ढवळून निघते. एखाद्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराला वाचा फुटल्यानंतर देशभर मोर्चांची जंत्री लागते. वातावरण निवळले, लोकांना विस्मरण झाले की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होते. पण, नाशिक पोलिसांनी या घटनेनंतर सजगपणे केलेली कृती देशभर चर्चेचा आणि अनुकरणाचा विषय झाली पाहिजे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी राज्यभर आहे तसेच आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या निर्भया पथकाची रचना नव्याने केली. रात्री, अपरात्री घडणाऱया घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गर्दीची मात्र धोक्याची ठिकाणे हेरली आणि महिला पोलिसांना साध्या वेशामध्ये रात्रीच्यावेळी बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यांच्या सोबत साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचारीही आसपास घुटमळत राहतील अशी व्यवस्था केली आणि नाशिकच्या त्र्यंबक रोडवर ठक्कर बझार बसस्थानक परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास गाडीची वाट पाहत असलेल्या एका महिलेला छेडणारा, अश्लिल हावभाव करणारा नराधम त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी रचलेल्या सापळय़ात हा वासनांध गुन्हेगार अलगद सापडला. संपूर्ण देशात अशाप्रकारे झालेली ही पहिली आणि एकमेव कारवाई आहे. या कारवाईसाठी विश्वास नांगरे-पाटील, डीवायएसपी पौर्णिमा चौघुले आणि त्यांचे सर्व सहकारी कौतुकास पात्रच आहेत. देशातील कोणत्याही पोलीस अधिकाऱयाने अशा प्रकारचा सापळा रचल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांनी केलेल्या या कृतीची देशातील सर्व पोलीस महासंचालकांनी तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे. महिलांची छेडछाड आणि अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथके, कार्यालयांमधील लैंगिक शोषण रोखण्यासाठी विशाखा समित्या सर्वत्र नेमलेल्या आहेत. मात्र त्यांची कामगिरी काय? त्या फक्त कागदाची शोभा वाढविण्यापुरत्या आणि कुणालातरी मोठेपण देण्यापुरत्याच ठरलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांच्या अधिपत्याखालील पोलिसांनी केलेली ही कृती निश्चितच अभिनंदनीय आहे. राज्यातील पोलीस दलाच्या अनेक चमकदार कामगिरीशी नांगरे-पाटील यांचे नाव गेल्या दशकभरात अनेकदा जोडले गेलेले आहे. त्यामुळे त्यांना मिळालेली प्रसिध्दी आणि त्यांच्या वाढत्या लौकीकाचा, त्यांच्या वर्क्तृत्व शैलीचा राज्यभरातील पोलीस अधिकारी, सनदी अधिकारी इतकेच काय मंत्र्या-संत्र्यांनाही हेवा वाटतो. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना धनिकांच्या मुलांच्या रेव्ह पाटर्य़ांवर त्यांनी छापे घातले. नशेत झिंगणारी तरूण पोरं, पोरी ज्यांना आपल्या अवस्थेचे भानही नव्हते त्यांना छाप्यातून पकडून नेतानाचे व्हिडीओ जेव्हा जगाने पाहिले तेव्हा लोक धास्तावले होते. आपली तरूणाई नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे? याची चिंता त्याकाळी व्यक्त झाली होती. पुढे या मुलांना नारकोटिक्सच्या जाळय़ातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना या प्रकरणातील पहिलाच गुन्हा असल्याने शिक्षा लागून त्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ नये म्हणून माफी मिळवून देण्यासाठीही न्यायालय पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. 26-11 च्या अतिरेकी हल्ल्यावेळीही ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांशी चकमकीत ते होते. त्यांचे काही साथीदार त्यात शहीदही झाले. तंटामुक्तीच्या निमित्ताने ते युनोपर्यंत पोहोचले. अशा एक ना अनेक घटनांनी नांगरे-पाटील नेहमीच चर्चेत होते. आताही आहेत. केवळ रात्री-अपरात्री अशी पाळत ठेऊन चालणार नाही हे निश्चित लक्षात घेऊन नाशिक जिल्हय़ातील प्रत्येक कॉलेजमध्ये पोलीसकाका आणि पोलीसदिदेचा संपर्क ठेवण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. निर्भया पथकाची पोलीस गाडी आजूबाजुला असेल याची धास्ती बसण्यापेक्षा साध्या वेशामध्ये एखादा पोलीस मुलींच्या संरक्षणासाठी उभा आहे याची धास्ती गुन्हेगारांमध्ये बसण्यासाठीचा हा उपक्रमही निश्चितच कौतुकाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, वर्दळीचे रस्ते अशा विविध ठिकाणी अशा प्रकारची पथके आणि काही पोलीस जर तैनात राहिले तर केवळ छेड काढणारे, अत्याचार करणारेच नव्हे तर विविध अवैध व्यवसाय करणारे, तरूणाईला नशेच्या जाळय़ात ओढणारे गुन्हेगारही पोलिसांच्या हाती लागू शकतील. अर्थात सर्व अधिकाऱयांना या विरूध्द काही करावं असं वाटणं, त्यांच्या कृतीत सातत्य असणं त्याहून अधिक महत्वाचं आहे. आज देशातल्या प्रत्येक शहरात कॉलेजच्या आसपासच्या पानपट्टय़ांवर इ सिगारेटसारखी घातक वस्तु लहान मुलांनाही विकणाऱया टोळय़ा कार्यरत आहेत. नशेत मुलांच्या हातून गुन्हेही घडताहेत. या घटना रोखायच्या असतील तर नाशिकमधला प्रयोग देशाच्या कानाकोपऱयात राबवला पाहिजे. तर पोलिसांबरोबरच लोकही आपली जबाबदारी पार पाडण्यास पुढे सरसावतील. मुले पळविणारी टोळी समजून गरीब मजुरांचा बळी घ्यायला लोक धजावतात कारण, त्यांच्यात संताप असतो. पण, हाच संताप हातात चाकू, ऍसिड घेऊन मुलींची वाट रोखणाऱयांच्या विरोधात का दिसत नाही? कारण त्या रस्त्यावर आपण एकटे आहोत आणि एकटय़ाचा विरोध कितपत टिकणार? याची लोकांना भीती असते. अशा ठिकाणी पोलीस असतात असा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर अशा घटनांना आळा बसेलच, पण, पोलिसांच्या गैरहजेरीत नागरिकांची एक हाक किंवा ओरडाही दुर्घटना रोखू शकेलSet featured image.

Related Stories

कूटश्लोक

Patil_p

तीस वर्षे तळय़ात-मळय़ात

Amit Kulkarni

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

Patil_p

भाजप नेत्यांच्या तारखा!

Omkar B

दिल्लीच्या धर्तीवर चिपळूणचे आंदोलन सरकारला अडचणीचे ?

Patil_p

तूंहे तयांसि होयीं शरण

Patil_p
error: Content is protected !!