तरुण भारत

चांद्रयान-3, गगनयानसह 25 मोहिमांवर लक्ष्य

इस्रो प्रमुख सिवान यांची माहिती : गगनयान मोहिमेसाठी चौघांची निवड, रशियात प्रशिक्षण

बेंगळूर / वृत्तसंस्था

Advertisements

इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने यंदाची उद्दिष्टे आणि योजना देशवासियांसमोर मांडल्या. 2020 मध्ये ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-3’ या मोठय़ा योजनांसह एकूण 25 मोहिमांवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात इस्रो मंगळ ग्रहापासून ते शनी ग्रहापर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहिमांवर काम करणार आहे. गगनयान मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून रशियामध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.

गेल्या दोन वर्षातच दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची बरीच तयारी केली गेली आहे.  अंतराळ विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या देशातील नागरिकांचे जीवन सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2019 मध्ये आम्ही गगनयान मोहिमेत बरीच प्रगती केली आहे. या अभियानासाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून जानेवारीच्या तिसऱया आठवडय़ापासून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यापूर्वी सिवान यांनी या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश असेल अशी घोषणा केली होती. मात्र निवड झालेल्या अंतराळवीरांमध्ये महिलेचा समावेश नाही. गगनयानसाठी एक राष्ट्रीय सल्लागार समिती गठित केली गेल्याचेही सिवान यांनी सांगितले.

‘चांद्रयान-3’साठी 250 कोटी खर्च

चांद्रयान-3 अभियानाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. याचे काम सुरू झाले आहे. त्याची कार्यप्रणाली चांद्रयान-2 प्रमाणेच असेल. तेथे लँडर आणि रोव्हर देखील असतील. या अभियानासाठी 250 कोटी रुपये खर्च येणार आहे, असेही सिवान यांनी सांगितले. इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात बरीच चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘गगनयान’साठी रशियाची मदत

गगनयान मोहिमेसाठी इस्रो रशियाची मदत घेणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम ‘इंडियन हय़ुमन स्पेसफाईट प्रोगाम’चा भाग आहे. गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणे आवश्यक असून, अंतराळवीरांचे प्रशिक्षण यावर्षीची सर्वात मोठी घडामोड असणार असल्याचे सिवान यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गंत विविध चाचण्या यावर्षीच पूर्ण केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तुतुकुडीमध्ये अवकाश संशोधन केंद्र

सिवन यांनी देशात उभ्या राहणाऱया दुसऱया अवकाश केंद्राबद्दलही माहिती दिली. हे केंद्र तामिळनाडू येथील तुतुकुडी येथे उभारण्यात येणार आहे. सध्या या केंद्रासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार नजिकच्या काळात येथे विकासकामे हाती घेऊन अवकाश संशोधन प्रक्रियेतील कामांना गती दिली जाणार आहे.

 

Related Stories

71 भूसुरुंगांचा शोध लावणारा शूर उंदिर

Patil_p

भारताने लसीकरणात अमेरिकेला टाकले पिछाडीवर

Patil_p

ऍमेझाँन विरोधी नाही, पण कायद्याच्या चौकटीत गुंतवणूक आवश्यक : पियुष गोयल

prashant_c

उत्तराखंड : कॅबिनेट मंत्री मदन कौशिक यांचे एंटीजन रिपोर्ट पॉझिटिव्ह

Rohan_P

मंत्र्याच्या पुत्राच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार

Patil_p

श्रीनगरमध्ये चकमक; दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav
error: Content is protected !!