तरुण भारत

नवी पहाट

एखाद्या अपयशानंतर न खचता उसळी मारून पुन्हा उभे राहणाऱयाच्या मागे यश नेहमी धावत असते. चांद्रयान 2 मोहिमेच्या अपयशानंतर हार न मानता चुकांवर मात करीत अवघ्या तीन महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आगामी चांद्रयान तीन व गगनयान मोहिमेची घोषणा केली आणि नववर्षाच्या आरंभीच तमाम भारतीयांना एक आनंदाची बातमी दिली. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञांचे सर्वप्रथम अभिनंदन यासाठी करायला हवे की, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी 7 सप्टेंबर 2019 ला चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना अगदी शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडरचे हार्ड लँडिंग झाले. त्यामुळे नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्याने महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेला शेवटच्या टप्प्यात अपयश आले. पण इस्रोचे शास्त्रज्ञ पुन्हा जोमाने कामाला लागले आणि त्यांनी अवकाश संशोधनाचे नवीन प्रकल्प जाहीर केले. अपयशाच्या अंधारानंतर आशेची एक नवी पहाट नेहमीच उगवत असते. यासाठी तुम्हाला जिद्द आणि उमेद जिवंत ठेवावी लागते. विज्ञानातील प्रयोगाचा प्रवाह निरंतर असतो. अपयश, चुका, दुरुस्ती, नवा बोध, प्रयत्नांची पुनरावृत्ती व अखेर यश या टप्प्यातून विज्ञानाचा प्रवास अखंड सुरू असतो. तो कधी थांबत नाही. भारतीय शास्त्रज्ञही त्याला अपवाद नाहीत, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले आहे.  चांद्रयान 3 च्या घोषणेच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अवकाश क्षेत्र ही आगामी काळातील मोठी बाजारपेठ असणार आहे.  जगभरातील प्रगत देश या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. मंगळ, चंद्र या ग्रहांवर मानवी वस्ती उभी करण्याचे स्वप्न ते पाहत आहेत.  काही बडय़ा खासगी कंपन्या या नव्या क्षेत्रात व्यवसायाभिमुख दृष्टिकोन बाळगून नियोजनबद्ध काम करीत आहेत. भारताच्या दृष्टीने आगामी दशक हे फार महत्त्वाचे आहे.  आपले संरक्षण बळ, अवकाश संशोधन व जागतिक स्तरावरील आपले स्थान येत्या दहा वर्षात निश्चित करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण आणि अवकाश संशोधन क्षेत्रात केंद्रातील मोदी सरकार मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. बेंगलोर येथील संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यातील ही गरज बोलून दाखवली. संशोधन क्षेत्रातील देशाच्या वाटचालीची दिशा त्यावेळी स्पष्ट केली. अमेरिका, रशिया, चीन यासारखी प्रगत राष्ट्रे अवकाश क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी अवकाश संशोधन व उपग्रह तंत्रज्ञान विकास कार्यक्रमावर भर देत आहेत. युद्ध ज्याप्रमाणे जमिनीवर, समुद्रात, हवेत अथवा सायबर क्षेत्रात लढले जाते त्याप्रमाणे यापुढे ते अवकाशातही लढले जाणार आहे. अमेरिकेने त्या दिशेने पाऊल उचलले असून आगामी काळातील गरज म्हणून त्यांनी स्वतंत्र स्पेस फोर्सची (अवकाश दल) स्थापना केली आहे,  ही धोक्याची घंटा आहे. मानवी कल्याण व विकासासाठी सुरू झालेल्या अवकाश संशोधनाची परिणती प्रतिस्पर्धी राष्ट्रांमधील अवकाश युद्धाच्या पातळीवर गेली तर त्यासारखी दुर्दैवी बाब कुठलीही असणार नाही. हे जरी खरे असले तरी अवकाशातील आपलीही संरक्षण सिद्धता असायला हवी, हे देखील महत्त्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गगनयान व चांद्रयान तीनच्या रूपाने भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात नव्या अध्यायास प्रारंभ होत आहे.  नवे प्रक्षेपण केंद्र, 25 प्रलंबित अवकाश मोहिमा येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. चांद्रयान 2 मोहिमेतील ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरू असून ते चंद्राभोवती फिरत असल्यामुळे चांद्रयान तीन मोहिमेत फक्त लँडर आणि रोव्हर यांचा समावेश असणार आहे. लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद लँडिंग कसे केले जाईल, याची पूर्ण काळजी या मोहिमेत घेण्यात आली आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर ज्या ठिकाणी चांद्रयान 2 उतरले होते त्याच ठिकाणी चांद्रयान तीन उतरेल. या ठिकाणाची माती परीक्षणासाठी यानातील प्रयोगशाळेत तसेच इस्रोच्या प्रयोगशाळेत पाठवली जाईल. मागील वेळेस भारतीय यान यशस्वीपणे उतरले असते तर रशिया, अमेरिका व चीन पाठोपाठ चांद्रमोहीम  यशस्वी करणारा  भारत चौथा यशस्वी देश ठरला असता. चांद्रयान 2 मोहिमेला जरी अंशतः अपयश आले असले तरी चांद्रयान यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत नेण्यात त्यांना यश मिळाले. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यापूर्वी कोणत्याही राष्ट्राने मोहीम केली नव्हती. ती भारताने केली. अमेरिकेचे अपोलो 11 हे यान चंद्राच्या विषुववृत्ताजवळ उतरले होते. त्या ठिकाणी त्यांनी ध्वज लावला. चंद्राच्या दक्षिण गोलार्धात जिद्दीने यान उतरण्याचे धारिष्टय़ दाखवले त्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक.  कारण तो अंधारात मारलेला तीर नव्हता तर जाणीवपूर्वक डोळे उघडे ठेवून पत्करलेला धोका होता. कारण चंद्राच्या दक्षिण गोलार्धात बर्फाच्या स्वरूपात पाण्याच्या अस्तित्वाची शक्यता संशोधकांना भेडसावत असल्यामुळे दक्षिण गोलार्धातील मोहीम अतिशय महत्त्वाची मानली जाते. चांद्रयान 2 मोहिमेत सर्व काही गमावले नव्हते.  त्यातच आगामी संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली होती.  येत्या दहा वर्षांच्या काळात चंद्राच्या दक्षिण गोलार्धात संशोधनासाठी प्रचंड स्पर्धा होणार आहे.  चंद्रावर मानवरहित व समानव अनेक मोहिमांचे नियोजन जगभरातील राष्ट्रांनी केले आहे.दक्षिण गोलार्धात आगामी काळात उत्खनन, मानवी वस्ती, अवकाश तळ यासाठी प्रचंड झगडा होण्याची शक्यता आहे.  तीन भारतीयांना सात दिवसांसाठी अंतराळात अवकाश संशोधनासाठी पाठवणाऱया गगनयान मोहिमेला केंद्राने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी अंतराळात मानव पाठवण्याची मोहीम यशस्वी केली आहे. भारताची ही पहिलीच मानवी मोहीम आहे. हवाई दलातील चार अंतराळवीरांची निवड केली असून त्यांना या महिन्याच्या अखेरीस रशियात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येत आहे. हे अंतराळवीर पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर सात दिवस एका कॅप्सूलमध्ये राहून अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणार आहेत. या निमित्ताने आपण नव्या दिशेने प्रत्यक्षात वाटचाल सुरू केली आहे. जगभरात यामुळे भारताची नवी ओळख होईल. भारत अवकाश तंत्रज्ञानाबाबत स्वयंपूर्ण झाला असल्याचे संकेत यातून जगात मिळतील.

Related Stories

पंतप्रधान नरेंद मोदींना किती गुण द्याल?

Patil_p

आणीबाणी आणि आपण

Amit Kulkarni

पाऊस आला…

Patil_p

कोकणातल्या चित्रकथीचे संचित

Patil_p

मुंबई आणि कोरोना व्हायरस

Patil_p

लहान, कमी, थोडक्यात

Patil_p
error: Content is protected !!