तरुण भारत

कामत यांच्यामुळे काँग्रेसबरोबर भाजपच्या गोटातही खळबळ

दोन्ही पक्षांतील अस्वस्थतेत वाढ

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने विरोधी काँग्रेस पक्षासह भाजपच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिगंबर कामत भाजपात गेल्यास काँग्रेस पक्ष खिळखिळा होण्याची भीती काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे तर कामत भाजपात आल्यास दक्षिण गोव्यातील बऱयाच भाजप नेत्यांचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱयांमध्येही याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू आहे.

दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात आणि गोवाभरात चर्चा सुरू आहे. याबाबत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरणही दिलेले आहे. मात्र असे असले तरी कामत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा थांबलेली नाही.

काँग्रेसच्या पाचपैकी कामतच सक्रीय आमदार

कामत हे तुर्तास कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते व पक्षातील एक प्रमुख नेते आहेत. काँग्रेस पक्षाकडे राहिलेल्या पाच आमदारांमध्ये तेच तेवढे सक्रीय आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक तसेच आलेक्स रेजिनाल्ड हे सध्या अलिप्त राहिलेले आहेत. पक्षाच्या कोणत्याच उपक्रमात हे आमदार भाग घ्यायला तयार नाहीत. केवळ विरोधी पक्षनेते असलेले कामत हेच तेवढे सक्रीय आहेत.

काँग्रेस पक्ष गर्भगळीत होण्याची भीती

कामत हे भाजपात गेल्यास काँग्रेस पक्ष गर्भगळीत होण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. या अगोदर विरोधी पक्षनेते असलेले बाबू कवळेकर यांच्यासह भाजपने दहा कॉंग्रेस आमदारांना भाजपात नेले. त्यामुळे कामत यांना भाजपने उचलल्यास पक्षाला मोठे खिंडार पडेल. याची जाणीव काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.

काँग्रेसचे 18 पैकी 13 आमदार भाजपात

2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीवर बाबूश मोन्सेरात निवडून आले होते. एकूण 18 आमदारांपैकी आतापर्यंत तब्बल 13 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. भाजपची रणनीती काँग्रेसने जाणली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे.

भाजपच्याही काही नेत्यांमध्ये अस्वस्थता

दिगंबर कामत भाजपात आल्यास दक्षिणेतील भाजपच्या अनेक इच्छुक नेत्यांचे पत्ते कापले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे महत्वही कमी होणार आहे कामत हे भाजपात आल्याचे अनेकांना नको आहे. मडगावातील बरेच कार्यकर्ते सध्या नाखुष आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेकांना कामत भाजपात आलेले नको आहेत. भाजपकडे सध्या 28 आमदारांचे संख्याबळ आहे. अशा स्थितीत आणखी राजकीय अस्वस्थता निर्माण करू नये असे भाजपच्या काही नेत्यांना वाटते. 

दक्षिण गोवा मजबुतीसाठी भाजपचा खटाटोप

2017 च्या निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यात मोठा धक्का बसला होता. येत्या निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्यात सुरक्षित बनविण्यासाठी भाजप नेते दिगंबर कामत यांना भाजपमध्ये नेण्याचा खटाटोप करीत आहेत. अनुसूचित जमातीचे नेते असलेले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे भाजपमध्ये आहेत. कामत हे दक्षिण गोव्यातील सर्वमान्य नेते आहेत. त्यामुळे कामत भाजपात आल्यास भाजपसाठी ते बरेच सहाय्यक ठरणार आहेत. त्यामुळे केडरचे एक प्रमुख नेते सध्या कामत यांच्या संपर्कात आहेत.

Related Stories

आईच्या टाहोने पोलिसांच्या डोळय़ात तरारले पाणी ….

Omkar B

देवस्थान मालकीची शेतजमिनही कूळ

Amit Kulkarni

प्रत्येकाच्या जिवनात प्रकाश आणण्यासाठी सज्ज होऊया

Amit Kulkarni

तृणमूल काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी दशरथ मांदेकर

Amit Kulkarni

करासवाडा येथे वीज सबस्टेशनचे उद्घाटन

Omkar B

सुरावलीत झाल्या बैलांच्या झुंजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!