तरुण भारत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडचा पुन्हा फडशा

नॅथन लियॉनचे सामन्यात 10 बळी

सिडनी / वृत्तसंस्था

Advertisements

नॅथन लियॉनने डावात 50 धावात 5 व सामन्यात 10 बळी घेतल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातही 279 धावांनी अक्षरशः फडशा पाडला आणि ही मालिका 3-0 फरकाने जिंकली. विजयासाठी 416 धावांच्या सुधारित आव्हानाचा पाठलाग करताना लियॉनच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 136 धावांवरच खुर्दा झाला.

यापूर्वी, या मालिकेत पर्थ व मेलबर्नमधील पहिल्या दोन कसोटीत जे निकाल लागले, त्याचीच पुनरावृत्ती येथे तिसऱया कसोटीतही झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या भूमीत या मालिकेत अद्याप अपराजित आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व 5 कसोटी सामन्यात (विंडीजविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 3) त्यांनी विजय संपादन केले आहेत. त्यापूर्वी, इंग्लंडमध्ये ऍशेस कायम राखण्यातही त्यांनी यश मिळवले होते.

ऑस्ट्रेलियाला 5 धावांचा दंड

या लढतीत डेव्हिड वॉर्नरने नाबाद शतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 217 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. पण, ऑस्ट्रेलियाच्या डावातील उत्तरार्धात वॉर्नरकडून आगळीक झाल्यानंतर याची संघाला किंमत मोजावी लागली. वॉर्नर खेळपट्टीच्या मधूनच धावल्याने पंच अलीम दार यांनी त्याला अधिकृत समज दिली व ऑस्ट्रेलियाला 5 धावांचा दंड करण्यात आला. यामुळे, न्यूझीलंडसमोरील 421 धावांच्या आव्हानात 5 धावांची कपात झाली आणि त्यांना 416 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. मात्र, जलद गोलंदाज मिशेल स्टार्कने तिखट मारा सुरु केल्यानंतर प्रारंभीच न्यूझीलंडची 3 बाद 25 अशी दाणादाण उडाली आणि अखेरपर्यंत ते यातून सावरु शकले नाहीत.

न्यूझीलंडची प्रारंभापासूनच दाणादाण

स्टार्कने पहिल्या 5 षटकात टॉम लॅथम व टॉम ब्लंडेल या दोन्ही सलामीवीरांना बाद केले तर लियॉनने त्यापुढील दोन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडला 4-27 अशा बिकट स्थितीत आणले. ग्लेन फिलीप्स, जीत रावल यांना रिप्लेनुसार झेलबाद दिले गेले. या डावादरम्यान रॉस टेलरने (7174) स्टीफन फ्लेमिंगचा न्यूझीलंडतर्फे 7172 चा सर्वोच्च कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. कॉलिन ग्रँडहोमने लियॉनला षटकार खेचत अर्धशतक साजरे केले. पण, पुढील चेंडूवरच तो डीप मिडविकेटवरील जो बर्न्सकडे झेल देत बाद झाला. टॉड ऍसलला जेम्स पॅटिन्सनने डाईव्ह मारत घेतलेल्या अप्रतिम झेलामुळे परतावे लागले.

हंगामात लाबुशाने प्रभावी

स्टार्कच्या यॉर्करवर सोमरव्हिलेचा त्रिफळा उडाला तर बीजे वॅटलिंग पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे झेल देत बाद होणारा डावातील शेवटचा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियातर्फे लाबुशानेने घरच्या भूमीतील 5 कसोटी सामन्यात एकूण 896 धावांची आतषबाजी केली, हे विशेष लक्षवेधी ठरले. तो सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 454

न्यूझीलंड पहिला डाव : सर्वबाद 256

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : 52 षटकात 2-217 धावांवर घोषित. (डेव्हिड वॉर्नर 159 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 111, लाबुशाने 74 चेंडूत 3 चौकारांसह 59, जो बर्न्स 79 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 40. अवांतर 7. मॅट हेन्री, टॉड ऍसल प्रत्येकी 1 बळी).

न्यूझीलंड दुसरा डाव : 47.5 षटकात सर्वबाद 136. (कॉलिन डे ग्रँडहोम 93 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 52, रॉस टेलर 22. अवांतर 4. नॅथन लियॉन 5-50, मिशेल स्टार्क 3-25, कमिन्स 1-29). 

मालिकेवर दृष्टिक्षेप

लढत / निकाल / ठिकाण

पहिली कसोटी / ऑस्ट्रेलिया 296 धावांनी विजयी / पर्थ

दुसरी कसोटी / ऑस्ट्रेलिया 247 धावांनी विजयी / मेलबर्न

तिसरी कसोटी / ऑस्ट्रेलिया 279 धावांनी विजयी / सिडनी

ब्लर्ब

उभय संघात दि. 13 रोजी पहिली वनडे होईल.

Related Stories

1500 मी.इनडोअर शर्यतीत गुडाफ त्सेगेचा नवा विश्वविक्रम

Patil_p

भारतीय महिलांचा ग्रेट ब्रिटनवर विजय

Patil_p

तेंडुलकर, संगकारा, जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पनेसर

Patil_p

मल्ल सनी जाधवला आर्थिक साहय़

Amit Kulkarni

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात!

pradnya p

माद्रिद टेनिस स्पर्धा न घेण्याचा आयोजकांना सल्ला

Patil_p
error: Content is protected !!