तरुण भारत

भक्ती भजन मंडळाचा सुवर्ण महोत्सव

बेळगावच्या सांस्कृतिक कार्यामध्ये आणि उपक्रमांमध्ये महिला मंडळांचा सहभाग महत्वाचा आहे. शहरातील अनेक मंडळांनी सुवर्ण व अमृत महोत्सव साजरा केला आहे. त्यापैकी एक महत्वाचे म्हणजे अनगोळमधील भक्ती भजन मंडळ. या मंडळाचा सुवर्ण महोत्सव दि. 8 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दुपारी 4 वाजता अनगोळ, विवेकानंद रोडवरील सुधा जोशी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार आहे. यावेळी माधवी नरगुंदकर, रोहिणी गणपुले व यशवंत बोंदे उपस्थित राहणार आहेत.

बेळगावच्या पहिल्या महिला महापौर शांताबाई नरगुंदकर यांच्या प्रेरणेने 26 जुलै 1969 रोजी भक्ती भजनी मंडळाची स्थापना झाली. प्रारंभी शांताबाई संचालित बेळगाव भजनी मंडळाची उपशाखा म्हणून हे मंडळ कार्यरत होते. मात्र सहा महिन्यात त्या निवर्तल्या. तत्पूर्वी वत्सलाबाई केळकर यांना दवाखान्यात बोलावून ‘आता मंडळ तू चालव’, असे त्यांनी सांगितले होते आणि वत्सलाताईंनी ते मान्य केले.

Advertisements

टाळासाठी रुपये तीन व मासिक वर्गणी 1 रुपये असे हे मंडळ अनगोळच्या दत्तमंदिरात सुरु झाले. एकूण सभासद संख्या 20 होती. त्या काळी तबलजी नारायणराव चिकोडी यांना साथीसाठी दहा रुपये देण्यात येत. तेसुध्दा हौसेने येत. कार्यक्रमासाठी पेटीची ने-आण करण्याचा खर्च सभासद करीत. पुढे वत्सलाताईंनी देणगी दिली आणि हळूहळू पैसे जमू लागले.

पुष्पाताई गाडगीळ, प्रमिला नाडकर्णी, भारती मराठे, निर्मला जोगळेकर, यमुताई मराठे, लक्ष्मीबाई करंदीकर, निर्मला बोडस यांच्या पुढाकाराने मंडळाची प्रगती होऊ लागली. पुढे वत्सलाताईंच्या घरी मंडळ भरु लागले व पंडीत बी. व्ही. कडलास्कर बुवा भजन शिकविण्यास येऊ लागले. त्यांनी जवळजवळ 25 वर्षे हिंदुस्थानी रागदारीवर आधारीत अभंग शिकविले.

हळुहळु गणेशोत्सव, नवरात्र या प्रसंगी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होऊ लागले. तसेच आर्टस् सर्कलच्या भजन स्पर्धेत भाग घेणेही सुरु झाले. सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून कायमस्वरुपी ढालही मिळविली. पंत बाळेकुंद्री येथील कॅसेट भजन स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकाविला. सध्या चालू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या भजन स्पर्धेत मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

वत्सलाताईच्या निधनानंतर राधा नाईक यांनी संवादिनीसाथ केली. सध्या प्रतिभा आपटे संवादिनी साथ व मार्गदर्शन करीत आहेत. 1993 मध्ये मंडळाचा रौप्य महोत्सव गुरुवर्य कडलास्कर बुवांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्या वेळी बेळगावातील काही महिला भजनी मंडळे सहभागी झाली होती. आज सुवर्ण महोत्सव साजरा करताना मंडळाला आनंद आहेच. परंतु बेळगावकरांच्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ कृतज्ञ आहे.

Related Stories

यशाचा पाया आत्मविश्वास

Patil_p

आरंभ प्रवेश पर्वाचा

tarunbharat

खरी श्रद्धांजली

tarunbharat

राष्ट्रीय नारा ‘जय हिन्द’

Patil_p

नृत्यपूर्ण आविष्कार

Patil_p

शिशुची काळजी आणि लसीकरण

Patil_p
error: Content is protected !!