तरुण भारत

तणाव विकोपाला

अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला : कमांडर सुलेमान यांच्या हत्येला प्रत्युत्तर

वृत्तसंस्था / बगदाद, वॉशिंग्टन

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष बुधवारी विकोपाला गेला. इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर इराणने तब्बल 22 क्षेपणास्त्रे डागली. ‘आम्ही कमांडर सुलेमान यांच्या हत्येचा बदला घेतला असून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे’, असे इराणचे सर्वोच्च नेता आयातोल खोमेनी यांनी सुनावले. दरम्यान, या हल्ल्यातील नुकसानीचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्विट करत सारे काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष चिघळला असून आखातावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत.

मागील आठवडय़ात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले होते. इराणने यास प्रत्युत्तर देत इराकची राजधानी बगदादमध्ये असणाऱया अमेरिकेच्या दुतावासाववर रॉकेट हल्ला केला. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणमधील 52 ठिकाणांवर तत्काळ विध्वंसक हल्ला केला जाईल, असा इशारा दिला होता. मात्र तो झुगारत इराणने बुधवारी बगदादमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

अल असद, इरबिलमधील तळांवर हल्ला

इराणमधील प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बगदादमधील अल असद आणि इरबिलमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर इराणच्या वतीने 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात अमेरिकेचे  80सैनिक ठार झाल्याचा दावा इराणच्या लष्कराने केला आहे. दरम्यान, अमेरिकेने जीवितहानीची पडताळणी सुरू असल्याचे केले आहे. ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी चर्चा केली. यानंतर ट्विटरवर ‘ऑल इज वेल’ असा संदेश देत सारे काही आलबेल असल्याचा दावा केला.

इस्त्रालयसह अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवरही हल्ल्याची शक्यता

कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेवेळी अमेरिकेविरोधात जोरदार निदर्शने झाली होती. इराणने अमेरिकेच्या सर्व नेत्यांना दहशतवादी घोषित केले. तसेच पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या लष्कराला मदत करणाऱयांना दहशतवादी घोषित केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमेरिकेचा पश्चिम आशियातील मित्र देश इस्त्रायल आणि सौदी अरेबियाच्या तेल विहिरींवरही इराण हल्ला करू शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. कमांडर सुलेमानी यांनीच तयार केलेले हिजबुल्ला आणि हूती बंडखोरांच्या गटांची मदत घेण्याचीही तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बगदादमधील दुतावासाच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

खालील चौकटी पान एकला घेणे                           

अमेरिकेला दिले सडेतोड प्रत्युत्तर : इराण

आम्ही कमांडर सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतला असून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले असल्याचे इराणचे सर्वोच्च नेता आयातोल खोमेनी यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना ते बोलत होते. मध्य-पूर्व अशियामधील अमेरिकेचे अवैध वास्तव्य आम्ही उखडून टाकू. अमेरिकेच्या अन्य देशांमधील हस्तक्षेपामुळेच युद्ध, मतभेद आणि विनाश सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इराणमधील रिव्हॉल्युशनरी गार्डनेही हा हल्ला सुलेमान याच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी केल्याचे म्हटले आहे. हा हल्ला आत्मरक्षणासाठी करण्यात आला होता, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आखाती देशातील भारतीयांवर संकटाचे ढग

इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे संपूर्ण आखातामधील तणाव वाढला आहे. येथील भारतीयांवरील संकटाचे ढग अधिक गहिरे झाले आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीयांचे वास्तव्य आहे. सध्या इराणमध्ये केवळ 800 ते 1200 भारतीय आहेत. मात्र इराण-अमेरिका युद्ध झाल्यास आखाती देशांमधील सर्व भारतीयांना देशात परतावे लागेल. 1990 मध्ये इराक-अमेरिका युद्धावेळी सुमारे 1.75 लाख भारतीयांना हवाई मार्गाने भारतात परत आणण्यात आले होते.

                                   इंधन दरवाढीची टांगती तलवार

इराण हा भारतासाठी अनेक बाबींमुळे महत्त्वपूर्ण देश आहे. इराणकडून तेलाची आयात करणारा भारत जगातील दुसऱया क्रमांकाचा देश आहे. भारत एकूण 39 टक्के इंधन हे सौदी अरेबिया आणि इराणकडून खरेदी करतो. युद्ध सुरू झाल्यास कच्च्या तेलांची जहाजे रोखली जातील. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता असून याचा फटका अन्य देशांबरोबर भारतालाही बसणार आहे.

                        इराणची 140 ठिकाणांवर हल्ल्याची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणमधील 52 ठिकाणांवर तत्काळ विध्वंसक हल्ला केला जाईल, असा इशारा दिला होता. याला उत्तर देताना अमेरिका आणि त्याच्या मित्र देशातील 140 ठिकाणांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी इराणच्या वतीने इराणमधील रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वतीने देण्यात आली आहे

Related Stories

इराकमधील अमेरिकन दुतावास टार्गेट

Patil_p

इटली : परिस्थिती बिघडली

Patil_p

तुर्कस्तान-फ्रान्स यांच्यात व्यंगचित्रयुद्ध

omkar B

क्रोमोसोममुळे भारी ठरतेय महिलांची इम्युनिटी

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबधितांची संख्या 4 लाखांवर, 24 तासात 2 हजार मृत्यू

prashant_c

चव बिघडणे, गंधक्षमता गमाविणे

Patil_p
error: Content is protected !!