तरुण भारत

यू-19 विश्वचषकासाठी धनयंजयाकडे लंकेचे नेतृत्व

17 जानेवारीपासून सुरू होणार स्पर्धा, भारताच्याच गटात लंकेचा समावेश

वृत्तसंस्था/ किम्बर्ली, द.आफ्रिका

डावखुरा युवा फलंदाज निपुन धनंजयाकडे या महिन्यात 17 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱया तेराव्या यू-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लंका संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता, असे आयसीसीने सांगितले.

2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत धनंजयाला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यावेळी प्लेट विभागात झालेल्या अंतिम सामन्यात लंका संघाला विंडीजकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना नववे स्थान मिळाले होते. आगामी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात 15 पैकी 11 सदस्य गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लंकेतच झालेल्या यू-19 आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाले होते. त्या स्पर्धेत लंकेने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या संघात कमिल मिशारा हा एकमेव यष्टिरक्षक असून नवोद परणविथानाला अष्टपैलू म्हणून निवडण्यात आले आहे.

कर्णधार धनंजया, रविंदू रसंथा, कविंदू नदीशन, आहन विक्रमसिंघे फलंदाजीचा केंद्रबिंदू राहणार असून चमिंडू विजेसिंघे, दिलशान मधुशानका, अमशी डिसिल्वा हे या संघातील आघाडीचे वेगवान गोलंदाज असतील. ऑफस्पिनर ऍशेन डॅनियल हा एकमेव फिरकी गोलंदाज या संघत आहे.

या स्पर्धेत लंका युवा संघाचा समावेश अ गटात असून याच गटात भारत, न्यूझीलंड व जपान संघही आहेत. 19 जानेवारीस लंकेची सलामीची लढत विद्यमान विजेत्या भारताविरुद्ध ब्लोमफौंटन येथे होणार आहे. 2000-01 या वर्षी लंकेतच झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत लंकेने उपविजेतेपद पटकावले होते. ही त्यांची सर्वोच्च कामगिरी असून त्यावेळी अंतिम लढतीत त्यांना भारताकडून पराभूत व्हावे लागले होते.

यू-19 विश्वचषकासाठी लंका संघ : निपुन धनंजया (कर्णधार), नवोद परणविथाना, कमिल मिशारा, आहन विक्रमसिंघे, सोनल दिनुशा, रविंदू, रसंथा, मोहम्मद शमाझ, थवीशा अभिषेक, एमए चमिंडू विजेसिंघे, ऍशेन डॅनियल, दिलुम सुदीरा, कविंदू नदीशन, एलएम दिलशान मधु, मथीशा पथिराना, अमशी डिसिल्वा.

Related Stories

बायर्न म्युनिचची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p

स्विटोलिना, केर्बर, कोंटा पराभूत

Patil_p

विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबई अजिंक्य

Patil_p

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळय़ा घालून हत्या

Patil_p

न्यूझीलंडचा विंडीजवर डावाने मोठा विजय

Patil_p

सराव सामन्यात बुमराहचे दमदार अर्धशतक

Patil_p
error: Content is protected !!