तरुण भारत

महिला कल्याण हा राष्ट्राच्या उत्थानाचा पाया

प्रतिनिधी / पणजी :

महिला कल्याण हा राष्ट्राच्या उत्थानाचा पाया आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी केले. दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित ‘यशस्वीनी’ व ‘स्वास्थ्य सखी’ या योजनांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. गोव्यातील महिलांना स्वावलंबी बनविणे तसेच त्यांना आर्थिकदृष्टय़ा बळकट करण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण खात्यातर्फे ‘यशस्वीनी’ व ‘स्वास्थ्य सखी’ या खास महिलांसाठी असलेल्या योजना लागू करण्यात आल्या असून त्यांचे उद्घाटन मंत्री इराणी यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे’ के. श्रीनाथ रेड्डी, पीएनजी कंपनीचे मिलिंद थाते, महिला बाल कल्याण सचिव चोखाराम गर्ग, आरोग्य सचिव नीला मोहनन, आरोग्य संचालक डॉ. जोस डिसा, महिला बालकल्याण संचालक दीपाली नाईक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळे तसेच अन्य महिला गट मिळून 10 हजारांवर महिला उपस्थित होत्या.

 यशस्वीनी योजना ही गोव्यातील महिलांसाठी ऐतिहासिक ठरणार असून या  योजनेमार्फत महिलांना स्वःताचा विकास करण्यास मदत मिळणार आहे. राष्ट्राच्या  उत्थानाचा पाया हा महिला कल्याण आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे. देशातील महिलांना  स्वावलंबी बनविले पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत 70 लाख महिलांनी कर्करोग निदानासाठी लाभ घेतला. तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी 30 लाख महिलांनी केली. 5 लाखपर्यंत लाभ मिळत आहे. तसेच उज्वला योजनेंतर्गत तीन वर्षात 8 कोटी महिलाना गॅस जोडणी मिळवून दिली आहे. तसेच ग्रामीण महिलांना आर्थिक सहकार्य केले आहे. महिला या देशाची ताकद असून महिलांना यशस्वी करण्यासाठी केंद सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. गोव्यात या योजना सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच महिला बाल विकास मंत्र्यांचा मोठा वाटा आहे, असे मंत्री इराणी यांनी सांगितले.

योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा

यशस्वीनी योजना व सेहत स्वास्थ्य सखी योजना या दोन्ही योजनांचा महिलांना मोठा लाभ होणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱयांना हे किट्स देण्यात आले असून आता ग्रामीण भागातील महिलांची कर्करोग तपासणी घरोघरी मोफत होणार आहे. या सेवा पुरविण्यासाठी ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन तसेच पीएनजी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अर्थिक पाठबळामुळे या आरोग्य योजना राज्यातील ग्रामीण भागात महिलासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच यशस्वीनी योजनेचा राज्यातील महिला मंडळ संस्थांना स्वावलंबी बनविण्यासाठी लाभदायक आहे. 5 लाख रुपयांचे कर्ज विना कर देण्यात येणार असून त्यांना स्वःताचा व्यवसाय सुरु करायला मिळणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले

महिलांसाठी अनेक उपक्रम

 आज गोव्यातील महिलांसाठी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. लाडली लक्ष्मी, गृह आधार, या योजना सुरु करणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. या योजनांमुळे अनेक महिलांना लाभ झाला आहे. याचे सर्व श्रेय माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना आहे. त्यांच्या पुढाकाराने महिलांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. आता यशस्वीनी योजनेची भर पडली असून महिला गट या योजनेमार्फत जे साहित्य तयार करणार त्याला योग्य मार्केट देण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. सरकारच्या हस्तकला दालनामध्ये ते सामान विकत घेतले जाणार आहे. तसेच महिलांना सरकार हवे ते प्रशिक्षण मोफत देणार आहे. हे सरकार महिलांसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. 31 मार्च पर्यत गोव्यातील सर्व ग्रामीण घराघरात नळजोडणी पूर्ण होणार आहे. कुठल्याच महिलांना विहिरीतून, नदीतून पाणी आणण्याची गरज पडणार नाही. प्रत्येक घरघरामध्ये गॅस कनेक्शन पोहोचले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

फोंडय़ात पोलीस अधिकाऱयावर प्राणघातक हल्ला

Patil_p

गावणे पूर्वाचार्य जत्रोत्सव 30 रोजी

Patil_p

मांद्रे येथील देवी महालक्ष्मीचे पूजन

Patil_p

पर्रीकरांचा ‘शिष्य’ काय करतोय ? युरी आलेमावने उपस्थितीत केला सवाल

Amit Kulkarni

‘संजीवनी’संबंधी कुठलाही निर्णय शेतकऱयांना विश्वासात घेऊनच !

Patil_p

मडगावहून श्रमिक ट्रेन निघाली जम्मू-काश्मिरला

Omkar B
error: Content is protected !!