तरुण भारत

सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 37 नानावाडी

इवलेसे रोप लावियले द्वारी। तयाचा वेलू गेला गगनावरी।।’ या उक्तीप्रमाणे समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षण मंदिरे स्थापण्यात आली. शिक्षणाची महती वाढत गेली आणि रोपटय़ाचे वटवृक्षात रुपांतर होत गेले. मात्र रोपटे जगविताना, वाढविताना आणि जपताना घेतलेला त्रास हा सध्याच्या परिस्थितीत सर्वांसाठी आदर्शच ठरणार आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ असा ठाम निर्धार करुन संघर्षातही भक्कमपणे शिक्षणाचे अमृत देणारी संघर्ष शाळा म्हणजे सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 37, नानावाडी. पंचाहत्तरीकडे वाटचाल करणाऱया या शाळेने अनेक चढउतार अनुभवले. मात्र आजही शाळा हक्काच्या इमारतीत नव्या आशा, आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन उपक्रमशीलतेने चालविली जात आहे.

नानावाडी  येथील सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा क्र. 37ची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 15 ऑगस्ट 1941 साली करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक आणि  स्वातंत्र्यानंतर देशाचे पंतप्रधानपद भूषविलेल्या मोराराजी देसाई यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले होते. नाना आजगांवकर यांच्या पुढाकारातून त्यांच्या मालकीच्या जागेत शाळा भरविली जायची. या शाळेचे उद्घाटन कौलारु इमारतीत चार वर्गखोल्यांमध्ये 4 शिक्षक वर्गाच्या माध्यमातून शाळा चालविली जात होती.
2011 पर्यंत शाळा त्याच  जागेत भरविण्यात आली. मात्र पुढे शाळेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि शाळा रस्त्यावर आली.

Advertisements

संघर्ष शाळा

शाळेची इमारत खाली करण्याचा आदेश बजाविण्यात आल्याने 2011 पासून शाळेला स्वतःच्या इमारतीसाठी संघर्ष करावा लागला. नानावाडी आवारात भाडेतत्वावर इमारत मिळत नसल्याने दीड दोन वर्षे शाळा मकरंद वाली यांच्या कार गॅरेजमध्ये भरविण्यात आली. तितक्या संघर्षातदेखील शाळेची पटसंख्या समाधानकारक होती. पुढे शिक्षण खात्याच्या आदेशानुसार 2013 मध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून शाळा
व्हॅक्सिन डेपो शाळेच्या आवारात स्थलांतरीत करण्यात आली. शाळेच्या अस्तित्वासाठी आणि शाळा टिकविण्यासाठीचा मोठा संघर्ष करण्यात आला.

हक्काच्या इमारतीची वर्षपूर्ती

शाळेचे अस्तित्व कायम राखण्यात शाळा यशस्वी झाली असून 14 जानेवारी 2019 साली शाळेला स्वतःची हक्काची इमारत मिळाली. नानावाडी येथे ंिगंडे कॉलनीत शाळेची इमारत बांधण्यात आली. माजी आमदार
 कै. संभाजी पाटील यांच्या प्रयत्नातून  2018 साली बुडाकडून शाळेसाठी जागा मंजूर करुन घेण्यात आली. यानंतर 20 लाख रुपये खर्चून शाळेसाठी दोन वर्गखोल्या बांधण्यात आल्या. नानावाडी येथील नागरिकांचे सहकार्य, शाळा सुधारणा कमिटी, शिक्षकांचे प्रयत्न यामुळे शाळेला स्वतःची इमारत प्राप्त झाली, मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी शाळेला हक्काची इमारत मिळून वर्ष पूर्ण झाले.

मदतीचा हात अन्  मोलाची  साथ

शाळेचा संघर्ष नानावाडी येथील नागरिकांनी पाहिला. कोणत्याही परिस्थितीत शाळा विलिनीकरण न करता शाळा चालविण्यात आली. यावेळी शाळेला नारा संघटना तसेच नानावाडी गणेशोत्सव युवक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आजही विद्यार्थ्यांना गणेश वितरण करणे, विविध साहित्य पुरवणे यामध्ये संघटना कार्यरत आहे. तसेच रोटरी क्लबतर्फे शाळेला वॉटर प्युरीफायर देण्यात आला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय केएलई वुमेन्स वेलफेअर यांच्यातर्फे करुन देण्यात येणार असून यासाठी काम सुरु आहे. शिवाय कलघटगी यांच्यातर्फे शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठीचे साहित्य देण्यात आले आहे. 

शिक्षकांचा मोलाचा वाटा

शाळेच्या संघर्षात शाळेला स्वतःची इमारत मिळविण्यासाठी शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. जागा मिळविण्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा, लेखी नोंदी तसेच शिक्षण खात्याशी साधावा लागणारा संपर्क, गॅरेजमधील शाळेमध्ये बजावावी लागलेली सेवा, यानंतर शाळेचे स्थलांतर हा प्रवास पूर्ण करताना शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. शाळेत कार्यरत असणारे कन्नड शिक्षक ए. बी. अख्खीसागर तसेच माजी मुख्याध्यापिका ए. सी. डिसोजा, व सुरेखा कांबळे यांनी शाळा टिकविण्यासाठी मोलाची भूमिका बजाविली. तसेच व्ही. आर. संकपाळ यांनीदेखील 2015 पासून शाळेच्या संघर्षात आपली भूमिका बजावली. शिक्षकांनी केलेले प्रयत्न फळाला आले आणि शाळेला हक्काची इमारत प्राप्त झाली.

एकतेचे शिक्षण

शाळेची पटसंख्या कमी होत असली तरी शिक्षकांच्या प्रयत्नातून आजच्या परिस्थितीत शाळेची पटसंख्या 25 इतकी आहे. शाळेत मुस्लिम, कन्नड, नेपाळी, मराठी तसेच हिंदी भाषिक विद्यार्थी शिक्षण घेत असून यामुळे शाळेत विविधतेतून एकता नांदत आहे. यामुळे जात, धर्म, भाषा यापेक्षा शिक्षण मोलाचे हा विचार समोर ठेवत विद्यार्थी साक्षरतेचे धडे गिरवत आहेत.

सध्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाचा भार ए. बी. अख्खीसागर यांच्यावर असून शाळेच्या संघर्षापासून स्थैर्यापर्यंतच्या वाटचालीतील ते वाटसरु आहेत. कन्नड विषय शिक्षक असूनदेखील मराठी शाळेचा कार्यभार ते चालवीत आहेत. मराठी शिक्षिका म्हणून मेघा एन. सेवा बजावित आहेत. तर शिक्षण सेवेत मदत म्हणून साधना सप्रे या आठवडय़ातून तीन दिवस विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत.

ए.बी.अख्खीसागर प्रभारी मुख्याध्यापक

शाळेची स्थापना 1941 साली झाली, मात्र पुढे शाळेच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि शाळेसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या. मात्र सातत्याने पाठपुरावा करुन त्या वेळी कार्यरत शिक्षकांच्या मदतीतून शाळेला 2019 साली स्वतःची इमारत मिळाली. शाळेचे कामकाज सध्या सुरळीतपणे सुरु असून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार दर्जेदार व उपक्रमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    राधिका सांबरेकर

Related Stories

कलारंगी विश्व रंगले..

Patil_p

सारे काही मानसिक स्वास्थ्यासाठी

Patil_p

या वर्षातील पहिले ग्रहण

Patil_p

वेदांत सखी

tarunbharat

नवजात शिशुची काळजी

Patil_p

शोध सावलीचा

tarunbharat
error: Content is protected !!