तरुण भारत

गोवंश हत्येने कामथेत तणाव!

वार्ताहर /  चिपळूण :

  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोटे येथे गतवर्षी घडलेल्या गोवंश हत्त्या प्रकाराची पुनरावृत्ती गुरूवारी कामथे येथे घडली. निर्दयपणे केलेल्या हत्येने प्रचंड संताप निर्माण झाला असून पोलिसानी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच गुन्हेगाराला अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याने रास्ता रोको साठी उतरलेला जमाव  शांत झाला.

  लोट परिसरातील गोवंश हत्येबाबत पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गतवर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनी संतप्त जमाव महामार्गावर उतरला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर हिंसक बनलेल्या जमावाने वाहनांची जाळपोळ करत पोलीस अधिकाऱयांना मारहाण केली होती. या घटनेला वर्ष पूर्ण होत आले असतानाच गोवंश हत्येची पुनरावृत्ती घडल्याने तणाव निर्माण झाला. 

  कामथे येथे सतीश हरिश्चंद्र मोरे यांच्या मालकीच्या उंबरडोह धोंडीचा टेप याठिकाणी भराव टाकलेल्या जागेत अज्ञातांनी ही गोवंश हत्या केली. गुरूवारी सकाळी रवींद्र उदेग हे शेताला पाणी देण्यासाठी गेले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांना कळवले. घटनास्थळी रक्ताचा सडा व शरीराचे अवशेष पडले होते. बाजूच्याच खालच्या उतरत्या जागेत एक बैल मृतावस्थेत पडला होता.

   गोवंश हत्येची घटना समजताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, संदीप पाटील पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले.  सरपंच विजय माटे, उपसरपंच प्रदीप उदेग, तंटामुक्त समिती अध्यक्ष नीलेश माटे, मनोज खेडेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख संभाजी खेडेकर, सुनील गोरिवले, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मोरे, विभागप्रमुख राम डिगे, रवींद्र डिगे यांच्यासह मोठय़ासंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

   रास्ता रोकोच्या पवित्र्यात, पण…

   यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी समोरचे दृष्य पाहिल्यानंतर प्रचंड चीड व्यक्त केली. यातूनच रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला जात होता. मात्र पोलीस अधिकाऱयांनी लवकरच गुन्हेगाराला अटक केली जाईल असे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. यातच तंटामुक्त समिती अध्यक्ष माटे यांनी जमावाला शांत करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

  आमदार जाधवांची भेट

  घटनास्थळी आमदार भास्कर जाधव यांनी भेट देत जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस अधिकाऱयांजवळ त्यांनी चर्चा करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही जाधव यांच्याशी चर्चा केली. 

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

  दरम्यान, जनावर कापून नेणाऱया आणि एक बैल मृतावस्थेत तेथेच सोडणाऱया  अज्ञाताविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 2015 नुसार 5,6,9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंजेक्शनने बेशुध्द करत हत्या?

  प्रचंड ताकदीच्या या जनावरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतरच कापले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर जागेवर गाडीची चाके उमटलेली असून गाडीतून ही जनावरे याठिकाणी आणली गेली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 तोच कालखंड…तोच प्रकार

  लोटे येथे गतवर्षी जानेवारीमध्ये ज्या कालखंडात गोवंश हत्येचा प्रकार घडला. त्याच कालखंड  कामथेतील घटना घडली आहे. गतवर्षीच्या घटनेत रास्ता रोकोवेळी झालेला हिंसाचार, दाखल झालेले गुन्हे, महिनाभर झालेला मनस्ताप आणि न्यायालयात मारावे लागणारे हेलपाटे या पार्श्वभुमीवर कामथेतील घटना संयमाने हातळण्यात यश आले.

Related Stories

कोकण मार्गावर उद्यापासून जबलपूर-कोईमत्तूर स्पेशल धावणार

triratna

संशोधनात्मक साहित्य वाचनाकडे वाढला कल!

Patil_p

रत्नागिरी : ठोक निधीसाठी राजापूर नगरपरिषदेत आंदोलन

Shankar_P

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रिफायनरी समर्थकांचे 26 ला आंदोलन

Patil_p

रत्नागिरीत ‘कोरोना लॅब’ चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

triratna

कोकण मार्गावर आजपासून मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल

Patil_p
error: Content is protected !!