तरुण भारत

निपाणी आगाराची आंतरराज्य बससेवा बंद

कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज बस ठप्प : प्रवाशांची एकच तारांबळ

प्रतिनिधी/ निपाणी

सीमालढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात आलेले महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीमाभागात एकच तणाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार निपाणीतून महाराष्ट्रात होणारी बसवाहतूक निपाणी आगाराने थांबवली. परिणामी प्रवासीवर्गात एकच गोंधळ निर्माण झाला.

शुक्रवारी दुपारी 3 नंतर निपाणी आगारातून कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, सांगली या भागात होणारी बस वाहतूक थांबवण्यात आली. त्याचबरोबर बेळगाव, हुबळीहून महाराष्ट्रात सातारा, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी आलेल्या बसेस निपाणी आगारातच थांबवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. नियोजित दौऱयात अडथळे आल्याने प्रवासी तसेच बसचालक व वाहकांमध्ये वादावादी झाल्याचे पहायला मिळाले.

अचानक बससेवा थांबवण्यात आल्याने निपाणी आगारात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आगार परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. निपाणीतून महाराष्ट्रात जाणाऱया कर्नाटक महामंडळाच्या बसेस थांबल्या असल्या तरी महाराष्ट्र बसची मात्र निपाणीतून आंतरराज्य वाहतूक सुरू असल्याचे पहायला मिळाले.  

वरिष्ठांच्या सूचनेनंतर बसवाहतूक सुरू करणार

यासंदर्भात निपाणी आगाराचे व्यवस्थापक मंजुनाथ हडपद म्हणाले, भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या सुचनेनुसार निपाणीतून महाराष्ट्रात होणारी बस वाहतूक थांबवली आहे. वरिष्ठांनी सूचना केल्यानंतरच पुढील बसवाहतूक सुरू करणार आहोत, असे सांगितले. सदर बससेवा बंद झाल्याने पुन्हा एकदा प्रवासीवर्गाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

Related Stories

औद्योगिक वसाहत सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी करा

Patil_p

कारवार जिल्हय़ातील तलावांचा विकास करा

Amit Kulkarni

कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवेला आज प्रारंभ

Patil_p

बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये; लॉकडाऊन शिथिल

Patil_p

अनगोळमधील कूपनलिकेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Omkar B

चिदंबरनगरमधील झाडे तोडल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमींची निदर्शने

Patil_p
error: Content is protected !!