तरुण भारत

साहित्य निर्मिती होत राहिल..तोपर्यंत वाचन सांस्कृती टिकेल..!

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

माहिती तंत्रज्ञान मानवनिर्मित आहे. त्यामुळे या माध्यमातून मिळणारी माहिती ही अचूक असेल याची खात्री देता येणार नाही. अनेकवेळा अपूर्ण आणि चुकीची उत्तरे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सापडतात. वाचनाचे महत्व पटविणारे मार्गदर्शक व गुरूजन ज्यांना मिळालेले नाहीत, त्यांच्याकडून वाचन संस्कृतीच्या संवर्धनाची अपेक्षा बाळगता येणार नाही, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केले.

Advertisements

 कोकण मराठी परिषद गोवा आयोजित पंधराव्या शेकोटी संमेलनातील ‘वाचन आणि वाचक’ या परिसंवादात अध्यक्ष या नात्याने त्यांनी हा निष्कर्ष मांडला. आजच्या पिढीला वाचण्यासाठी उद्युक्त करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी त्याच्या विश्वाचा कानोसा घेतला पाहिजे. तरूणाईला पचेल, रूचेल, आवडेल अशी साहित्य निर्मिती व्हायला हवी. मागच्या पिढीची तुलना सद्याच्या पिढीशी करता येणार नाही. कारण काळाबरोबर परिस्थिती बदलत असते. लेखकाला त्यासाठी अनुभवात उतरण्याची गरज आहे. अनेक बाबतीत केवळ कल्पना विश्वात गुरफटून न राहता वास्तवाशी नाते सांभाळूनच लेखन झाले पाहिजे असे आग्रही मत प्रा. महाजन यांनी व्यक्त केले.

वाचन संस्कृती टिकली… यापुढेही टिकणार

वाचन संस्कृती आत्तापर्यत टिकलेली आहे, पुढेही टिकेल. ती लयाला जाणे शक्यच नाही, असे सांगताना उस्मानाबाद येथे नुकत्याच भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये तब्बल 2 कोटी रूपयांची ग्रंथविक्री झाल्याच्या संदर्भ त्यांनी दिला. साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकांची विक्री लाखो घरात झाली. अनेक आवृत्त्या निघालेल्या विश्वास पाटील, उद्धव शेळके, मृत्यूजयकार शिवाजी सावंत यांच्या निवडक पुस्तकांच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्याचे संदर्भ देताना सर्वासमावेषक लिखाणावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण वाचन संस्कृतीबाबत समाधानी असल्याचा आशावादही त्यांनी बोलून दाखविला.

नितीन लाळे यांनी, पुस्तक वाचनामुळे वाचकाला स्थैर्य प्राप्त होते. पुस्तक वाचल्याने आपले संबंध विविध विषयांशी आणि वेगवेगळय़ा परिस्थितीशी येत असतात. परंतु साहित्याच्या आधुनिकीकरणामुळे लेखन आणि वाचन प्रक्रियेवर त्याचे परिणाम जाणवत असल्याचे सांगताना माहिती तंत्रज्ञानाचाही त्यांनी उल्लेख केला. वाचन संस्कृती समृद्ध आहे आणि तिच्या वृद्धीबाबत आपण संकोचित नसल्याचा सकारात्मक सूर त्यांनी व्यक्त केला.

पुस्तक वाचण्याचा आनंद वेगळाच : याळगी

अशोक याळगी म्हणाले, पुस्तक वाचण्यातला आनंद वेगळाच असतो. पाहिजे तेव्हा पान उघडून हवा तो संदर्भ पुस्तकातून उचलण्यात जे सुख असते ते माहिती तंत्रज्ञान देऊ शकत नाही. नव्या कोऱया पुस्तकाचा सुगंध तर वाचकाला अंतबाहर्य़ खुलवित असतो. साहित्य शाश्वत आहे, हे जरी खरे असले तरी वाचन संस्कृती घसरणीला लागली आहे हेही वास्तव आहे. पुस्तक भेट, वाचनालय आदी माध्यमातून वाचन संस्कृती व्याप्तीच्या दृष्टीने प्रयत्न हवेत अशी सूचना श्री. याळगी यांनी केली.

लक्ष्मण पित्रे, प्रकाश क्षीरसागर यांच्या पुस्तकांवर चर्चा

या सत्रात लक्ष्मण पिंगे यांच्या ‘सुक्ती सुधास्वाद’ या पुस्तकावर बोलताना डॉ. सोमनाथ कोमरपंत म्हणाले, लेखक पित्रे हे व्युत्पन्न, रसन्न कवी असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यांच्या पुस्तकातील सुभाषितामुळे समुपदेशन, दिशादर्शन या गोष्टी साध्य होत आहेत. अन्वर्थ, अनुवाद, विवेचन ही त्रिसुत्रे त्यांच्या लेखनात आढळतात. कल्पना सैंदर्य उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लिखाणात आहे.

प्रकाश क्षिरसागर यांच्या ‘मामीच्या बोक्याला हो’ या विनोदी कथा संग्रहामध्ये लेखकाने सभोवतालाच्या वातावरणात डोळसपणे निरीक्षण केल्याचे जाणवते. ऐकलेले आणि अनुभवलेले विनोद त्यांनी एकूण 24 कथांसाठी वापरलेले असून या छोटय़ा छोटय़ा कथा वाचताना त्या परिणामकारक वाटतात असे विलास कुवळेकर म्हणाले. क्षीरसागर यांच्या कथा साधेपणा या निकषास पात्र ठरतात. साधेपणा जपणे व सौदर्यदृष्टीने तो इतरांपर्यंत पोचविणे ही कला त्यांना जमल्याचेही कुवळेकर यांनी नमूद केले.

 प्रा. विनय बापट यांनी प्रा. नारायण महाले यांच्या ‘घर कौलारू’ या कथासंग्रहाचे विवेचन केले. कथा प्रकारात आपले वेगळे विश्व निर्माण करताना प्रा. महाले यांनी ग्रामीण संवेदनांना आश्रय या कथांमध्ये दिल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक आणि ग्रामीण भागांचे बदलते स्वरूप यामधील द्वंद ते यथोचितपणे मांडताना प्रगती आणि लय यामधील लढाई वाचकांसमोर आणण्याची हातोटी लेखकाला अवगत असून सत्य, माणुसकी, देव, अंधश्रद्धा यावरील त्यांचे विचार उल्लेखनीय असल्याचे प्रा. बापट म्हणाले. लेखकाने बोली भाषेतले शब्द ग्रामीण कथेच्या निर्मितीत वापरावे. वेदनेच्या मुळांशी जात असताना काळाचे बदल टिपण्याची गरज असून लेखक आणि वाचकामधील अद्वैत साधला तरच साहित्याचा उत्तम प्रभाव पडतो असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

आईबाप होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र पालक होणे ही संस्कारांशी जोडलेली प्रक्रिया आहे. संस्कार कृतीतून येतात. आचरणातून येतात. जोपर्यंत संवाद आहे, तोपर्यंत साहित्य टिकेल आणि साहित्य निर्मिती होत राहिल, तोपर्यंत वाचन संस्कृती टिकेल या आशावादी विधानावरच या परिसंवादाचा समारोप झाला.

Related Stories

भाजपात जाण्याचा अद्याप तरी विचार नाही : गावडे

Amit Kulkarni

आपच्या रोजगार यात्रेस सर्वत्र जोरदार प्रतिसाद

Amit Kulkarni

आपतर्फे राजकारणावरील संगीत चित्रफितीचे प्रकाशन

Amit Kulkarni

जनसंपर्क म्हणजे चांगली प्रतिमा, सदिच्छा राखणे : पिल्लई

Amit Kulkarni

शेतकऱयांनी शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने पहावे यासाठी सरकारचे प्रयत्न

Patil_p

शिथीलतेमुळे जनजीवन येतेय पूर्वपदावर

Omkar B
error: Content is protected !!