तरुण भारत

विराटसेनेचा ‘पंगा’

टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या तगडय़ा प्रतिस्पर्ध्यावर मालिका विजय प्राप्त करीत नवीन वर्षाची सुरुवात अगदी झकास केली आहे. सांघिक कामगिरीच्या बळावरच विराटसेनेने ही मजल मारली असून, भारतीय संघ आता अधिकाधिक ताकदवान होत असल्याचे दिसून येते. पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात डेव्हिड वॉर्नर व ऍरोन फिंच यांच्या दमदार शतकामुळे कांगारूंकडून भारताला दारुण पराभव पत्करावा लागला होता. परंतु, कोणतेही मानसिक दडपण येऊ न देता जोरदार कमबॅक कशा पद्धतीने करायचे, हे भारतीय संघाने दाखवून दिले आहे. एकेकाळी मनोबलात भारतीय खेळाडू कमी पडत. सचिन तेंडुलकरवर प्रामुख्याने सर्व आशा केंद्रित असत. अशा अवलंबित्वातून बाहेर पडण्यास गांगुली युगापासून खऱया अर्थाने सुरुवात झाली. धोनीच्या कारकिर्दीत सांघिक कामगिरी अधिक खुलली. आता विराटपर्वात अशा पद्धतीचा खेळ अधिक बहरलेला पहायला मिळतो. कोणत्याही संघाच्या खऱया बलिष्ठपणाचे हेच निदर्शक. मालिकेत शिखर धवनचा खेळ सर्वार्थाने चांगला झाला. पहिल्या सामन्यात 74 धावा तडकवणाऱया शिखरचे दुसऱया सामन्यात शतक थोडक्यात हुकल्याने चाहत्यांची निराशा झाली असेल. तथापि, सातत्यपूर्ण खेळ कसा करावा, हे त्याने दाखवून दिले. तिसऱया सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने त्याला फलंदाजी करता आली नाही. स्वाभाविकच तो न्यूझिलंड दौऱयाला मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत ऐन बहरात असताना शिखर जायबंदी झाल्याने त्याची उणीव जाणवली. मात्र, के. एल. राहुल याच्याकडेही दुसऱया सलामीवीराची भूमिका पेलण्याची क्षमता असल्याने तोल ढळू न देता प्रसंगानुरूप पुढे जावे लागेल. राहुलची अलीकडील कामगिरीही नक्कीच समाधानकारक. चांगली सुरुवात करून मध्येच माघारी परतण्याची खोड त्याने सोडलेली दिसते. भविष्यात त्याने आणखी खेळ उंचावावा. यष्टिरक्षक म्हणून त्याची कामगिरी ऋषभ पंत वगैरेंपेक्षा निश्चितच उत्तम. त्याने यावरही फोकस ठेवला, तर एक फलंदाज जादा खेळवता येईल. रोहित शर्मा हा तर अलीकडे भारतीय संघाचा आधारस्तंभच बनला आहे. मॅचविनिंग खेळी, हे त्याचे वैशिष्टय़ मानता येईल. रोहित एकदा का टिकला, की त्याला रोखणे अवघड असते. 217 डावात 29 शतकांसह 9 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याच्या त्याच्या कामगिरीतूनच रोहित हे काय रसायन आहे, हे कळते. भारतीय क्रिकेटमध्ये कपिल देव, सचिन, गांगुली, द्रविड, विराट, धोनी यांना वेगळे स्थान आहे. त्या पंक्तीत रोहितही जाऊन बसला असून, भविष्यातही अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदवले जातील. विराटही दिवसागणिक कर्णधार म्हणून अधिक प्रगल्भ होऊ लागला आहे. पूर्वी त्याचा संयम लवकर सुटत असे. आक्रस्ताळेपणात त्याचा खेळ हरवून जाई. या मालिकेत त्याच्या नावावर शतक नोंदविले गेले नसले, तरी त्याने शेवटच्या दोन्ही सामन्यात केलेला खेळ त्याच्या फॉर्मवरच प्रकाश टाकतो. कर्णधारपदाचे कोणतेही ओझे न बाळगता मुक्तपणे खेळण्याची हातोटी पाहता विराटची वाटचाल श्रेष्ठ कर्णधार होण्याच्या दिशेने सुरू आहे, असे म्हणता येईल. श्रेयस अय्यर यानेही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मनीष पांडे मात्र अजून तितकासा या जागेवर फिट वाटत नाही. गोलंदाजांमध्ये शमीने पुन्हा एकदा आपला धडाका दाखवून दिला आहे. सध्या शमी हा बुमराहपेक्षा अधिक भेदक वाटतो. मालिकेतील त्याची गोलंदाजी जबरदस्तच. अर्थात शमी असो वा बुमराह त्यांनी फिटनेसकडे लक्ष द्यावे. नवदीप सैनीला अजून कामगिरीत सुधारणा करावी लागेल. जडेजा व कुलदीपने फिरकीची बाजू चांगलीच सांभाळली. कुलदीपने 58 सामन्यांमध्ये 100 बळींची नोंद करीत आशा वाढविल्या आहेत. सातत्य व वैविध्य याचा ताळमेळ राखता आला, तर कुलदीप लंबी रेस का घोडा ठरू शकतो. जडेजाचे परिपक्व अष्टपैलुत्वही सुखदायी. क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिलेले असले, तरी धोनी व विराटच्या काळात भारतीय संघ कांगारूंसाठी बव्हंशी वरचढच ठरलेला आहे. कांगारू, किवी असोत वा आणखी कुणी, आज कुठल्याही संघाशी पंगा घेण्याच्या दृष्टीकोनातून जी कौशल्ये असावी लागतात, ती भारतीयांकडे पुरेपूर आहेत. फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही पातळय़ांवर आपण सरस आहोत. क्षेत्ररक्षण पूर्वीपेक्षा नक्कीच उजवे आहे. सूर मारून झेल घेणे वा  चेंडू अडविण्याचे कसब आपणही प्राप्त केले असून, या पातळीवर आणखी सुधारणेला वावदेखील आहे. 24 जानेवारीपासून न्यूझिलंड दौऱयाला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमधील या संघाची कामगिरी पाहता आपल्यासाठी हा दौरा खडतर असेल. परदेशी खेळपट्टय़ांवर आपला नेहमीच कस लागतो. फलंदाजी, गोलंदाजी अशा सगळय़ाच पातळय़ांवर किवी तोडीस तोड आहेत. त्यांना घरच्या मैदानावर हरविण्यासाठी आपल्याला खेळ उंचावण्याबरोबरच योग्य रणनीतीही आखावी लागेल. कसोटीत शिखरच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ हाही चांगला पर्याय ठरू शकेल. अ संघाकडून त्याने न्यूझिलंड इलेव्हनविरूद्ध खेळताना 100 चेंडूत 150 धावा टोलवत आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले आहे. अजिंक्य रहाणेसारखा चिवट फलंदाजही परदेशात उपयुक्त ठरू शकतो. एकीकडे क्रिकेटची सगळी धामधूम सुरू असताना माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी चटका लावणारीच ठरते. डावखुरे फिरकी गोलंदाज असणाऱया  बापू नाडकर्णींना ‘मेडन किंग’ म्हणत. तब्बल 21 षटके सलग निर्धाव टाकण्याचा विक्रम त्यांच्यावर नावावर आहे. यातूनच ते किती टिच्चून गोलंदाजी करत असत, याची कल्पना येते. फलंदाजीतही बापूंनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. क्रिकेटप्रती आत्मियता व प्रेम असलेले बापू  नाडकर्णी खेळासाठी 100 टक्के योगदान देण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असत. निवृत्तीनंतरही बापू नाडकर्णी यांनी विविध प्रकारे भारतीय क्रिकेटची सेवा केली. आज क्रिकेटचा खेळ, त्याचे नियम बदलले असतील. परंतु, क्रिकेट तेच आहे. जुन्यांची जिद्द व खेळाप्रतीची निष्ठा घेऊनच पुढे जायचे आहे, हे नव्यांनी ध्यानात घ्यावे. खिलाडू वृत्ती कायम ठेऊन भिडावे, हाच खरा खेलमंत्र आहे.

Related Stories

ऑनलाईन शिक्षणक्षेत्रातील रोजगाराच्या संधी

Patil_p

नैतिक पराभव

Omkar B

टोळधाड

Patil_p

कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी!

Patil_p

मम चित्ता तुमचे पाय

Patil_p

तो म्यां वरिलासि अमृतघन

Patil_p
error: Content is protected !!