तरुण भारत

गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर, गोठा खाक

शिंदेवाडी (ता.हुक्केरी) येथील घटना : 5 लाखांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी टळली : नाईक कुटूंबिय उघडय़ावर

प्रतिनिधी/ संकेश्वर

Advertisements

 गॅस सिलिंडरचा स्फोट होवून लागलेल्या आगीत घर, झोपडी व जनावराचा गोठा जळून खाक झाला. ही घटना सोलापूर ग्रा. पं. हद्दीतील शिंदेवाडी (ता. हुक्केरी) येथे बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.  या आगीत रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्यासह सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले. मलाप्पा चंदाप्पा नाईक, महादेव बय्याजी शेंडे व आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी अशी नुकसानग्रस्तांची नावे आहेत. संकेश्वरच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारची घरे बचावली.

या घटनेबाबात समजलेली अधिक माहिती अशी की, मलाप्पा नाईक हा बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुलांना शाळेत सोडण्यास गेला होता. तर पत्नी पत्नीला शेताकडे गेली होती. याच दरम्यान अचानक घरातून मोठा आवाज आला व  धुरासह आगीचे लोळ घराबाहेर पडले. आवाजाने शेजारील तसेच परिसरातील लोकांनी धाव घेतल्यानंतर सिलींडरचा स्फोट झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. घराशेजारीच जनावरांचा गोठा होता. यावेळी प्रसंगावधान राखून गोठय़ातील जनावरांचे दोर कापून त्यांना गोठय़ाबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी  संकेश्वर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत मलाप्पाचे घर खाक झाले. तसेच मलाप्पाच्या घराशेजारी आप्पासाहेब नाईकवाडी यांची झोपडी व महादेव शेंडे याचा जनावराचा गोठा होता. हेदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

घटनास्थळी संकेश्वर पोलीस ठाण्याचे हवालदार एस. आर. लमानी, सोलापूर  ग्रा. पं. सदस्य फत्तेसिंग पाटील-सांळुखे, अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सिलिंडरचा कशाने स्फोट झाला याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

शासकीय मदतीची गरज

या दुर्घटनेने मलाप्पा नाईक यांचे संसारोपयोगी साहित्यासह घरही जळून खाक झाल्याने संपूर्ण कुटुंब उघडय़ावर पडले आहे. याची दखल घेत नाईक कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिले. मात्र भरपाईची प्रक्रिया गतीने राबवित त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

50 हजाराची रोकड खाक

मलाप्पा नाईक हा भाजीपाल्याचा व्यापार करतो. दररोज सौद्याची भाजी भरुन आठवडी बाजारात दुकान थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मंगळवारी तो व्यापाराचे व काही कर्जाऊ असे 50 हजार रुपये घेऊन घरी आला होता. बुधवारी दुपारनंतर याच पैशातून बाजार भरायचा याचे नियोजन त्याने केले होते. दरम्यान 10 वाजण्याच्या सुमारास पत्नी, मुलगा व मलाप्पा हे तिघेही घरातून बाहेर पडले. काही वेळातच हा स्फोट झाला. यात घरातील कपडे, अन्यधान्य, 50 हजाराची रोख रक्कम, जीवनावश्यक वस्तूंसह सारेच आगीत बेचिराख झाले. मात्र सुदैवाने ते तिघेही स्फोटापूर्वी घरापासून काही अंतरावर गेल्याने बचावले.

Related Stories

उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱ्या वृध्दाला अटक

Rohan_P

ट्रफिक सिग्नल पुन्हा बंद; रहदारी पोलीसही गायब!

Amit Kulkarni

यंदा तलावांमध्ये सोडणार 92 लाख मत्स्यबीज

Amit Kulkarni

भाऊराव काकतकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Patil_p

घरपट्टी वसूलीसाठी मनपाने लपविला आदेश

Patil_p

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे म. फुले पुण्यतिथी

Patil_p
error: Content is protected !!