तरुण भारत

नदाल, मेदवेदेव्ह, प्लिस्कोव्हा, हॅलेपची आगेकूच

वृत्तसंस्था / मेलबर्न :

अग्रमानांकित राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाणे यजमान ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस, अलेक्झांडर व्हेरेव्ह, डॉमिनिक थिएम, डॅनील मेदवेदेव्ह, कॅरोलिना प्लिस्कोव्हा, सिमोना हॅलेप, बेन्सिक, डोना व्हेकिक यांनीही तिसऱया फेरीत स्थान मिळविले. कॉर्नेट, गिलेस सायमन यांचे आव्हान समाप्त झाले.

नदालने यापूर्वी फक्त एकदाच ही स्पर्धा जिंकली असून दुसऱयांदा जेतेपद मिळविण्यासाठी त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकताना अर्जेन्टिनाच्या फेडरिको डेल्बोनिसचा 6-3, 7-6 (7-4), 6-1 असा पराभव केला. मेलबर्नमधील गेल्या नऊ सामन्यांत त्याने केवळ तीन सेट्स गमविले आहेत. गेल्या वर्षीच्या अंतिम लढतीत त्याने हे तीन सेट्स जोकोविचविरुद्ध गमविले होते. स्थानिक खेळाडू किर्गिओसने फ्रान्सच्या गिलेस सायमनचे आव्हान 6-2, 6-4, 4-6, 7-5 असे संपुष्टात आणले. त्याची पुढील लढत कॅरेन खचानोव्ह किंवा स्वीडनचा मायकेल वायमर यापैकी एकाशी होईल.

व्हेरेव्ह, थिएमची आगेकूच

जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हनेही तिसरी फेरी गाठताना बेलारुसच्या इगोर गेरासिमोव्हवर 7-6 (7-5), 6-4, 7-5 अशी मात केली. या स्पर्धेआधी झालेल्या एटीपी चषक स्पर्धेत व्हेरेव्हने तीन पराभवात तब्बल 31 डबल फॉल्ट्स केले होते. पण येथील सामन्यात त्याने एकही तशी चूक केली नाही. त्याने 9 बिनतोड सर्व्हिसही केल्या. व्हर्डास्को किंवा बॅसिलाश्विली यापैकी एकाशी त्याची पुढील लढत होईल. जागतिक पाचव्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स बोल्टचे कडवे आव्हान 6-2, 5-7, 6-7 (5-7), 6-1, 6-2 असे परतावून लावत आगेकूच केली. ही लढत सुमारे सव्वातीन तास रंगली हाती. चौथ्या मानांकित रशियाच्या मेदवेदेव्हने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझवर 7-5, 6-1, 6-3 अशी मात केली. या सामन्यावेळी त्याच्या नाकातून रक्तही येत होते. एटीपी चषक स्पर्धेतील तीनही सामने त्याने जिंकले आहेत.

हॅलेप, प्लिस्कोव्हा विजयी

महिला एकेरीत रोमानियाच्या चौथ्या मानांकित सिमोना हॅलेपने तिसरी फेरी गाठताना पात्रता फेरीतून आलेल्या ब्रिटनच्या हॅरिएट डार्टचा 6-2, 6-4 असा पराभव केला. अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने जर्मनीच्या लॉरा सीगमंडचा 6-3, 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हा किंवा अमेरिकेच्या टेलर टाऊनसेन्ड यापैकी एकीशी होईल. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्सिकने एलेना ओस्टापेन्कोचा 7-5, 7-5 असा पराभव केला तर 19 व्या मानांकित डोना व्हेकिकने फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटचा 6-4, 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.

Related Stories

क्रीडा शिबिरांनाही कोरोनाचे ग्रहण

Patil_p

जोकोव्हिचचे वर्षअखेरचे अग्रस्थान निश्चित

Patil_p

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

Patil_p

वेटलिफ्टींगमध्ये कुरुंदवाडच्या अनिरुद्ध, अनन्याचे सोनेरी यश

Patil_p

अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोना

Patil_p

पुढील वर्षी भारताचा इंग्लंड दौरा

Omkar B
error: Content is protected !!