तरुण भारत

बामणोलीत भरदिवसा पोलिसाचा बंगला फोडला

प्रतिनिधी / कुपवाड

कुपवाड शहर परिसरात सध्या चोऱया, घरफोडीचे सत्र सुरुच आहे. अज्ञात चोरटय़ांनी गुरुवारी भरदिवसा बामणोलीत पोलिसाचाच बंद बंगला फोडून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. या घरफोडीत चोरटय़ांनी बंगल्यांचे कुलूप तोडून दोन बेडरुममधील दोन्ही लाकडी कपाटे फोडून साहीत्य विस्कटून कपाटातील तब्बल 11 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह अडीच हजाराची रोकड मिळून अंदाजे तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.

Advertisements

 दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका रात्रीत चोरटय़ांनी शहरातील कापसे प्लॉटमधील एका पोलिसाचा तसेच अन्य दोन मिळून तीनठिकाणची बंगले फोडून 23 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे उजेडात आले होते. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी चोरटय़ांनी पुन्हा बामणोलीत भरदिवसा पोलिसाचाच बंगला ‘लक्ष्य’ केल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

 पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, बामणोली (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरासमोर मनोहर रामजी बामणे यांचा बंगला आहे. शेजारी मोठी लोकवस्ती आहे. त्यांचा मुलगा गणेश बामणे सांगलीच्या पोलीस मुख्यालयात तर सून सौ. दीपाली नाशिक येथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. दोघेही डय़ूटीवर होते. मनोहर बामणे कुपवाड एमआयडीसीतील एका कारखान्यात नोकरीस तर त्यांच्या पत्नी सौ. नंदा बामणोलीत अंगणवाडी शिक्षिका आहेत. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मनोहर व त्यांच्या पत्नी सौ. नंदा दोघेही बंगल्याला कुलूप लावुन कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास मनोहर बामणे जेवणासाठी घरी आले असता त्यांना बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. दरवाजा उघडून आत पाहीले. यावेळी हॉलमधील तसेच दोन्ही बेडरुममधील कपाटातील सर्व साहीत्य अस्ताव्यस्त विस्कटले होते. चोरीची शंका आल्याने त्यांनी फोन करुन पत्नीला घरी बोलावून घेतले. यावेळी बंगल्यात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 बंगला बंद असल्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश केला. दोन्ही बेडरुममधील दोन्हीही कपाटे फोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दोन घंटन, चेन, अंगठय़ा, कर्णफुले, मंगळसूत्र मिळुन 11 तोळे यांसह चांदीचे पैंजण, छल्ले व ब्रेसलेट व रोख अडीच हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. यावेळी चोरटय़ांनी तिजोरीतील सर्व साहीत्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकले होते. याबाबत मनोहर बामणे यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी तातडीने याबाबत कुपवाड पोलिसांना आणि त्यांच्या मुलास कळवले. सपोनी नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी व पंचनामा केला. चोरटय़ांच्या शोधासाठी श्वानपथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. तातडीने पोलीस पथकेही रवाना केली. यावेळी श्वान घटनास्थळी घुटमळल्याने चोरटय़ांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरटय़ांचा कसून तपास सुरु असल्याचे सपोनी नीरज उबाळे यांनी सांगितले.

Related Stories

मिरजेत रुग्णालयासमोर रिक्षा चालकाची भाईगिरी

Abhijeet Shinde

महापालिका विरोधी पक्षनेतेपदाचा संजय मेंढेंनी पदभार स्विकारला

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचे बोगस प्रमाणपत्र देणारा ‘सिनर्जी’चा कर्मचारी जाळ्यात

Abhijeet Shinde

पूरपट्ट्यातील हजार मुलींना ५० हजारांची मुदतठेव

Abhijeet Shinde

सांगली : शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांचे अनुदान द्या : धनंजय देशमुख

Abhijeet Shinde

विट्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!