तरुण भारत

माधवनगर, बुधगाव, कवलापूरची नगरपालिकेच्या दिशेने वाटचाल

संजय गायकवाड / सांगली

सांगली शहराला खेटून असलेल्या आणि वेगाने नागरीकरण होत असलेल्या माधवनगर, बुधगाव आणि कवलापूर या तिन्ही गावांची नगरपालिकेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तिन्ही गावांची मिळून लोकसंख्या 50 हजाराच्या घरात गेली असून वाढती लोकसंख्या आणि विस्तारामुळे या तिन्ही गावामध्येही नागरी सुविधा पुरविण्यामध्ये संबंधित ग्रामपंचायतीच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसत आहेत. सद्यस्थितीला या तिन्ही गावांची अगर माधवनगर-बुधगाव अशी  संयुक्त नगरपालिका स्थापन करणे शक्य आहे. नगरपालिकेच्या स्थापनेस अर्थातच काहींचा  विरोध होणार असला तरी पाण्यासह नागरी सुविधांसाठी नगरपालिका स्थापण्याशिवाय दुसरा  पर्याय नाही. वाढत्या विरोधामुळे आज लगेचच नाही पण कधी ना कधी या तिन्ही गावामध्ये नगरपालिका होणार हे मात्र निश्चित आहे.

Advertisements

माधवनगर, बुधगाव, कवलापूर बिसूर, कांचनपूर, कुमठे, हरिपूर, काकडवाडी ही तशी सांगली शहरापासून जवळ असणारी गावे, यातील माधवनगर तर सांगलीचेच उपनगर म्हणावे अशी परिस्थिती आहे. महापालिकेच्या जकात नाक्यापासून सुरू होणारे हे तसे शहरी गाव म्हणून जिल्हाभर प्रसिध्द आहे. कॉटन मिल आणि जुनी रेल्वेलाईन बंद पडल्यानंतरही या गावाचा विस्तार कमी झालेला नाही. सांगली शहराला अगदी खेटून असलेले माधवनगर आजही छोटय़ा मोठय़ा उद्योगाच्या माध्यमातून तग धरून आहे.

बुधगाव आणि कवलापूर ही दोन गावे तशी निमशहरी गावे म्हणून नव्याने विकासाच्या वाटेवर उदयास येऊ पाहत आहेत. अभियांत्रिकी व दंत महाविद्यालयामुळे या दोन्ही गावांची शैक्षणिकदृष्टय़ा चांगली प्रगती होताना दिसत आहे. सांगलीच्या महापुरावेळी भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरसाठी उपयोगी ठरलेले जिल्हय़ातील एकमेव विमानतळ कवलापूर येथे आहे. कवलापूर हे शेतीप्रधान गाव असले तरी कवलापूर आणि बुधगावची लोकसंख्या आणि विस्तार मात्र वाढतच चालला आहे.

सध्यस्थितीला या तिन्ही गावामध्ये स्वतंत्रपणे ग्रामपंचायती आहेत. पाणी योजना मात्र एकच आहे. वाढत्या विस्तारामुळे नागरी सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतीची दमछाक होऊ लागली आहे. त्यातून नगरपालिका स्थापन्याचा प्रस्ताव पुढे येताना दिसत आहे. तसे माधवनगर, बुधगाव, कवलापूरला नगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव नवीन नाही. यापूर्वी राज्यात 1995 ला भाजपा शिवसेना युतीची सत्ता असताना माधवनगर, बुधगावसह काही गावांचा सांगली मिरज कुपवाड महापालिकेत समावेश करण्यात आला होता. पण, माधवनगरचे व्यापारी व नागरिक यांच्या जोरदार विरोधामुळे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर म्हणजे  गेल्या 21 वर्षात सांगली मिरज कुपवाड या महापालिका हद्दीत समावेश झालेला ‘विजयनगर वॉन्लेसवाडी’ हा एकमेव भाग आहे.

वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या याचा विचार करून माधवनगर, बुधगाव, कवलापूरला नगरपालिका स्थापन करणे शक्य आहे. राज्यातील आघाडी सरकारकडून याबाबत निर्णयाची अपेक्षा आहे. कारण माधवनगरमधून ज्या कारणासाठी मोठय़ा प्रमाणात विरोध होत होता ती जकात, उपकर, एलबीटी असे कोणतेच कर राहिलेले नाहीत. जीसएटी तर सर्वच मोठय़ा  व्यापाऱयांना भरावा लागतो. पहिली किमान दहा वर्ष तरी घरपट्टी आणि पाणीपट्टीत वाढ होणार नसेल तर माधवनगर, बुधगाव, कवलापूरला नगरपालिका स्थापन करण्यास काहीच हरकत नसावी.

नगरपालिका स्थापण्याचे  निकष

ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करताना 25 हजारापेक्षा जादा लोकसंख्या आणि कृषित्तर कार्यक्रमातील रोजगारांची टक्केवारी 35 पेक्षा जास्त असणाऱया क्षेत्रासाठी नगरपालिका स्थापन करता येते. त्यानुसार सांगली जिल्हय़ात यापूर्वीच्या इस्लामपूर, विटा, तासगाव व आष्टा या जुन्या नगरपालिकांच्या शिवाय मागील काही वर्षात जत, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस या गावामध्ये नगरपालिका अगर नगरपंचायती स्थापन झालेल्या आहेत. तर राज्यात 233 पेक्षा जास्त नगरपालिका तर 28 पेक्षा जास्त नगरपंचायती आहेत.

Related Stories

मिरजेत शॉर्ट सर्किटने उद्यानात आग,जीवित हानी नाही

Abhijeet Shinde

पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरू – खा. राजू शेट्टी

Abhijeet Shinde

सांगली : राजवाडा चौकातील सर्कलला वाहनाची धडक

Abhijeet Shinde

खासगी क्लास सुरू करण्यास चार जानेवारीचा मुहूर्त

Abhijeet Shinde

सांगली : कडेगावमध्ये पाणी संघर्ष समितीच्यावतीने वीज बिलांची होळी

Abhijeet Shinde

सांगलीतील आणखी 46 एसटी कर्मचार्‍यांना कोरोना बाधा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!