तरुण भारत

मनसेचे नवनिर्माण

मराठी अस्मितेच्या मुद्यावर शिवसेनेची स्पर्धा करणाऱया मनसेला आता ज्वलंत हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेसह भाजपशीही मुकाबला करावा लागेल. मनसेने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे.

चौदाव्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज बदलला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. हे तीन पक्ष एकत्र आल्याने राज्यातील लहान राजकीय पक्षांसमोर अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आणि स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. हे आव्हान पेलण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या आठवडय़ापासून सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत मनसेने मुंबईत अधिवेशन घेतले. अधिवेशनात ‘नवा झेंडा, नवा अजेंडा’ घेऊन मनसे नव्या राजकीय अवतारात समोर आला. भगवा झेंडा आणि झेंडय़ाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा स्थापित करून मनसेने आपल्या राजकारणाला हिंदुत्वाची जोड दिली. आता इथून पुढे मनसेची राजकीय वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने असेल. मराठी अस्मितेच्या मुद्यावर शिवसेनेची स्पर्धा करणाऱया मनसेला आता ज्वलंत हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेसह भाजपशीही मुकाबला करावा लागेल. त्यामुळे हिंदुत्वाचा कैवार घेतलेल्या पक्षांमध्ये चढाओढ होऊन नजीकच्या काळात भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात. मनसेने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर आले आहे.

Advertisements

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेऊन पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय पक्षाला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकारणात अनेक प्रयोग करावे लागतात. काळाबरोबर भूमिकेत बदल करावा लागतो. मनसेने प्रादेशिक अस्मितेऐवजी हिंदुत्वाला प्राधान्य देऊन भूमिका बदलली आहे. कालपरवापर्यंत मराठी अस्मितेच्या मुद्यावर राजकारण करणाऱया मनसेचे हिंदुत्व कसे असेल, याचा प्रत्यय राज यांनी अधिवेशनातील भाषणात दिला. मशिदीवरील भोंगे, बांग्लादेश पाकिस्तानातील मुस्लीम घुसखोर, देशद्रोही यांचा उल्लेख करून राज यांनी आपले हिंदुत्व मुस्लिमविरोधावर आधारित असणार असल्याचे संकेत दिले. पक्ष स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मनसेचा राजकीय आलेख चढता राहिला. मराठी अस्मितेचा मुद्दा रेटताना राज यांनी हिंदू, दलित, मुस्लिम समुदायाला साद घातली. त्यामुळे पक्षाला सुरुवातीला मिळालेल्या या यशात या घटकांचाही वाटा होता. परंतु, राज यांनी अधिवेशनात हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने दलित अल्पसंख्याक मतदार कायमचा दूर जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही भाजपची जोडी राजकारणात पुन्हा दिसता कामा नये, असे म्हणणारे राज आता या जोडगोळीने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना दिसतात.

खरेतर राज ठाकरे यांच्या मनसेचे राजकारण शिवसेनेच्या शैलीचे! उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा हाती घेतल्यानंतर संघटनेला प्रयत्नपूर्वक राडा संस्कृतीपासून  दूर नेले. मराठी अस्मितेची भूमिका पातळ करून उद्धव यांनी शिवसेनेला सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘मी मुंबईकर’ ही मोहीम राबवून शिवसेनेची परप्रांतीय विरोधी भूमिका मवाळ केली. उद्धव यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी राज यांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला हात घातला.   2007 च्या मुंबई महापालिका आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या मुद्याने मनसेला यश मिळवून दिले. 2009 च्या लोकसभा आािण विधानसभा निवडणुकीत मनसेला लक्षणीय यश मिळाले. लोकसभेला मनसेचा उमेदवार निवडून आला नाही. परंतु, लाखोच्या घरात मते घेऊन मनसेने आपली ताकद दाखवून दिली. विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून आले. या आमदारांनी विधानसभा डोक्यावर घेत पाच वर्ष पक्ष चर्चेत ठेवला. या काळात मनसेने मराठी पाटय़ा, मराठी सिनेमा, टोलनाके, सरकारी नोकरीत मराठी मुलांना प्राधान्य, अनधिकृत फेरीवाले आदी मुद्दे हातात घेऊन मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महानगरात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेने मनसेसह सर्वच पक्षांना हादरा दिला. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मनसेला अनेक धक्के बसले. एका बाजूला पक्षाला लागलेली गळती आणि दुसऱया बाजूला राजकीय अपयशाने पुरवलेला पिच्छा यामुळे मनसेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

पक्षावर आलेल्या राजकीय संकटाची नामुष्की राज यांनीच ओढवून घेतली. गेली काही वर्ष राज हे ‘कृष्णकुंज’वर बसूनच पक्ष चालवत होते. पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या अस्तित्वाची अधूनमधून जाणीव करून देत होते. 2014 च्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर राज यांनी गेल्या पाच वर्षात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले नाहीत. पक्षात प्रभावी अशी दुसरी फळी उभी राहिली नाही. राज ठाकरे हेच पक्षाचे एकखांबी नेतृत्व राहिले, जे आजही आहे. बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्या व्यतिरिक्त पक्षातील अन्य नेत्यांची नावे आठवावी लागतात. मधल्या काळात राज यांनी महाराष्ट्राचे दौरे केले. ते दुष्काळी भागातही गेले. या दौऱयातूनही पक्षाला लाभ झाला नाही. पक्षाने अजून मुंबई, नाशिक, पुण्याच्या पलीकडे बस्तान बसवले नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले. तर 2019 च्या निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज यांनी भाजपच्या विरोधात रान उठवले. त्यावेळी राज ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे काम करत असल्याचा आणि शरद पवारांच्या कलाने पक्ष चालवत असल्याचा आरोप झाला. तीन महिन्यापूर्वीच्या विधानसभा निवडणूक निकालाने मनसेला आणखी निराश केले. पाच वर्षानंतरही मनसेला विधानसभेतील ताकद वाढवता आली नाही. या पार्श्वभूमीवर मनसेला स्वत:मध्येच परिवर्तन करावे लागले. त्यामुळे मनसेला आता केवळ निवडणूक एके निवडणूक असे राजकारण न करता 24 तास राजकारण करावे लागेल. पक्ष वाढीसाठी, जनाधार वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. तरच मनसेचे नवनिर्माण होईल. अन्यथा हा पक्ष राजकीयदृष्टय़ा आणखी आक्रसत जाण्याचा धोका आहे.

प्रेमानंद बच्छाव

Related Stories

अस्वस्थ वर्तमानाची आर्त साद

Amit Kulkarni

मौजे आटपाट

Patil_p

कोकणात कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य हवे!

Patil_p

उपक्रमातील सहभाग चिरंतन काळ टिकणारा

Patil_p

सुखान्त-2

Patil_p

तैसा सर्वांभूती आत्मा एक

Patil_p
error: Content is protected !!