तरुण भारत

नदाल, हॅलेप, मुगुरुझाची आगेकूच

वावरिंका, थिएम, व्हेरेव्ह, पॅव्हल्युचेन्कोव्हाही उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/मेलबर्न

जागतिक अग्रमानांकित राफेल नदालने यावेळच्या स्पर्धेत प्रथमच एक सेट गमविला. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचे कडवे आव्हान मोडून काढत नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बाराव्या वेळी स्थान मिळविले. नदालप्रमाणेच जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, स्वित्झर्लंडचा स्टॅनिसलास वावरिंका, ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएम, महिलांमध्ये सिमोना हॅलेप, रशियाची ऍनास्तेशिया पॅव्हल्युचेन्कोव्हा, स्पेनची गार्बिन मुगुरुझा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली तर अँजेलिक केर्बर, किकी बर्टेन्स, एलिस बर्टेन्स, डॅनील मेदवेदेव्ह, आंद्रे रुबलेव्ह, गेल मोनफिल्स यांचे आव्हान संपुष्टात आले.

स्पेनच्या नदालने किर्गिओसवर 6-3, 3-6, 7-6 (8-6), 7-6 (7-4) अशी मात करून आगेकूच केली. तीन तास 38 मिनिटे ही झुंज रंगली होती. नदालची पुढील लढत डॉमिनिक थिएमशी होणार आहे. जागतिक पाचव्या मानांकित थिएमने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सला 6-2, 6-4, 6-4 असे हरवित पुढील फेरी गाठली. सातव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला. या पराभवामुळे रुबलेव्हची 15 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित झाली. व्हेरेव्हने या सामन्यात 11 बिनतोड सर्व्हिस केल्या तर 34 विजयी फटके मारले. त्याची पुढील लढत माजी विजेत्या स्टॅन वावरिंकाशी होईल. वावरिंकाने चौथ्या मानांकित डॅनील मेदवेदेव्हचे कडवे आव्हान 6-2, 2-6, 4-6, 7-6 (7-2), 6-2 असे परतावून लावत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची वावरिंकाची ही 18 वी वेळ आहे. 2017 मध्ये त्याने जिनेव्हातील स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

केर्बर, किकीचा पराभव

महिला एकेरीत रशियाच्या पॅव्हल्युचेन्कोव्हाने अतिशय चुरशीच्या लढतीत जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचे आव्हान संपुष्टात आणत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. तिने ही लढत 6-7 (5-7), 7-6 (7-4), 6-2 अशी जिंकली. दुसऱया सेटमधील टायब्रेकरमध्ये 2-5 आणि 0-3 अशी पिछाडी भरून काढत जोरदार मुसंडी मारत सेट जिंकून बरोबरी साधली. पण निर्णायक सेटमध्ये पॅव्हल्युचेन्कोव्हाने विजय मिळवित केर्बरचे आव्हान संपुष्टात आणले. तिची पुढील लढत माजी पेंच व विम्बल्डन चॅम्पियन गार्बिन मुगुरुझाशी होईल. मुगुरुझाने नवव्या मानांकित किकी बर्टेन्सवर 6-3, 6-3 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत टॉप टेनमधील फक्त तीन खेळाडू पोहोचू शकल्या आहेत. त्यात अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, सातवी मानांकित पेत्र क्विटोव्हा, चौथी मानांकित हॅलेप यांचा समावेश आहे. बार्टी व क्विटोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरी गाठ पडणार आहे तर हॅलेपची लढत इस्टोनियाच्या 28 व्या मानांकित ऍनेट कोन्टावेटशी होणार आहे.

हॅलेप विजयी

हॅलेपने 16 व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा 6-4, 6-4 असा पराभव केला तर कोन्टावेटने पोलंडच्या बिगरमानांकित इगा स्वायटेकवर विजय मिळवित आगेकूच केली. हॅलेपने आतापर्यंतच्या चार सामन्यात एकही सेट गमविलेला नाही. 2018 मधील ती उपविजेती आहे. याआधीच्या तीन लढतीत हॅलेपने मर्टेन्सवर दोनदा विजय मिळविला होता.

 

Related Stories

महिलांचे प्ले ऑफ फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

जेव्हा संतप्त युनूसने ग्रँट फ्लॉवरच्या मानेवर सुरी धरली!

Patil_p

वऱहाडींच्या स्वागतासाठी मास्क, सॅनिटायझर अन् सोशल डिस्टन्सिंग!

Patil_p

मुस्तफिजूर रहमान पहिल्या दोन लढतीतून बाहेर

Patil_p

द.आफ्रिकेच्या वनडे कर्णधारपदी क्विटॉन डी कॉक

Patil_p

विजय हजारे करंडकसाठी मुंबई संघ जाहीर

Patil_p
error: Content is protected !!