तरुण भारत

म्हादईसाठी खांडेपार येथे कलश मिरवणूक

वार्ताहर/ मडकई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील सर्व नद्या जोडण्याचे निश्चित केले असतानाही  गोव्याची माता म्हणून संबोधली जाणारी म्हादई मात्र गोवेकरांपासून तोडली जात आहे. गोवा, कर्नाटक व केंद्रात भाजपचे सरकार असूनही म्हादईसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागत आहे, यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते. याचा अर्थ गोव्यातील जनतेने समजून उमजून घ्यावा. 1973 साली कर्नाटक सरकारने हा पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी पाण्याच्या प्रश्नावरून सरकारला तंबी दिली होती. प्रतापसिंह राणे यांनीही सरकारला यासंदर्भात इशारा दिला होता. तत्कालीन माजी मुख्यमंत्री रवि नाईक व लुईस प्रोतो बार्बोझा यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्यास शासकीय पातळीवरून जोरदार विरोध केला होता. माजी जलसंवर्धन मंत्री दयानंद नार्वेकर यांनी तर त्यावेळी केंद्र सरकारला खरमरीत पत्र पाठवून जाब विचारला होता. असे असतानाही सध्याचे भाजपचे सरकार म्हादईच्या प्रश्नावर गंभीर तर दिसत नाहीच उलटपक्षी दिल्लीला शिष्टमंडळ नेऊन समिती स्थापन करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तताही केली नसल्याचा आरोप म.गो. नेते माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.

Advertisements

खांडेपार येथे म.गो. पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या ‘म्हादई बचाव’ धरणे, जनआंदोलन व कलश मिरवणुकीला खांडेपारच्या जंक्शनकडून सुरुवात करण्यात आली. यावेळी फोंडय़ाचे म.गो. नेते डॉ. केतन भाटीकर यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवरून रॅली काढली. म्हादईचा संगम होतो, त्या दत्तमंदिराजवळ नदीच्या काठापर्यंत ही कलश मिरवणूक काढण्यात आली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली सुवासिनींनी कलश पूजन केल्यानंतर सामूहिक गाऱहाणे घातले. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत ‘आमची म्हादय आमकां जाय’, ‘म. गो. चा निर्धार म्हादईचा उध्दार’ अशा घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला. आरती, महाप्रसाद झाल्यानंतर म्हादईच्या उगम स्थानाकडून कलशातून आणलेल्या पाण्याचे विसर्जन म.गो. नेते सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते येथील संगमावर करण्यात आले. 

        कर्नाटक सरकार म्हादईचे 56 टक्के पाणी वळवतील

म.गो. नेते सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले की, कळसा भांडुरा या प्रकल्पावर 50 हजार कोटी खर्च केले जातील आणि या एकूण तीन वर्षात म्हादईचे 56 टक्के पाणी कर्नाटक सरकार वळवतील. आतापर्यंत 27 टक्के पाणी वळविण्यात आलेले आहे. त्यासाठी गोवेकरांनी जागरुक होणे गरजेचे आहे. म्हणूनच उस्ते येथून म्हादईच्या संगमावरून दि. 19 जानेवारी रोजी सुरू केलेले हे ‘म्हादई बचाव’ धरणे जनआंदोलन गोव्याच्या अनेक तालुक्यात नेऊन जागृती घडवून आणली जाईल. म. गो. पक्षाने सुरू केलेले हे जनआंदोलन सर्व पक्षीयांसाठी आहे. खांडेपार नदीतही म्हादईचा संगम आहे. त्यासाठी 15 मार्चला येऊन पाहा. मार्चच्या अखेरीस म्हादईचा गोडय़ा पाण्याचा प्रवाह हळूहळू कमी होऊ लागेल आणि त्यावेळी मांडवीचा खाऱया पाण्याचा प्रवाह खांडेपार नदीत येत असतो. येथूनच दोन किलोमिटरवर ओपा प्रकल्प आहे. पंपिंग करून ओढण्यात आलेल्या या पाण्यात हे खारे पाणी मिसळण्याची शक्यता आहे. या गंभीर विषयावर कोणीच सखोलपणे अभ्यास केलेला नाही म्हणूनच या जनआंदोलनातून ही जागृती होत आहे.

सरकारनेही या जनआंदोलनात भाग घ्यावा

डिचोलीचे म.गो.चे नेते नरेश सावळ म्हणाले, म्हादईचे अस्तित्व लुप्त झाले तर गोव्यात वाळवंट होईल. येथील नैसर्गिक संपत्ती नष्ट होईल व सर्वत्र हाहाकार माजेल. ती वेळ येण्यापूर्वीच गोवेकरांनी जागरुक होणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून या जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी ग्रीस देशाच्या कथेचा आधार घेऊन त्यांनी म्हादईवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन नसून गोव्याच्या भवितव्यासाठी आहे. म्हणूनच  सरकारनेही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

नद्याचा उगम व माहिती – पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, कळसा या नदीचा उगम कणकुंबी येथील रामेश्वर मंदिराकडून होतो व तो थेट गोव्यातील नानोडा नदीला येऊन मिळतो. हा प्रवाह उस्ते येथे नदीला मिळतो. चोर्लाघाट आंबेखोल येथून हलतरा नदीचा उगम होतो. येथून 147 मिटरवरून खाली कोसळणारी ही नदी महाराष्ट्रात विर्डी या गावात पोहोचते. महाराष्ट्र सरकारने विर्डी धरण बांधण्याचे काम सुरू केलेले आहे तर कर्नाटक सरकारने हलतरा येथे धरणाचे काम अजून सुरू केलेले नाही कारण हे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषीत झालेले आहे. खानापूरच्या नेरसे गावात भांडुरा ही नदी आहे. तो प्रवाह मुख्य म्हादईला जाऊन मिळतो. एकाच राष्ट्राचा या धरण बांधण्याचा अजब प्रकार त्यांनी विस्ताराने सांगून हे कळसा, भांडुरा व हलतरा या तीनही नद्यांचे पाणी मलप्रभेत वळविले जाईल म्हणून हा विषय गोवा सरकारने लवादाकडे पोहोचविलेला आहे. 13 वर्षे तो प्रलंबित होता. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तीनही राज्यांनी लवादाने दिलेला निर्णय अमान्य करून या संदर्भातली विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. तरीसुध्दा कर्नाटक सरकारने कसलीच परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हे पाणी मलप्रभेत वळविले आहेत. ते गोवा सरकारने लवादाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. लवादाने निरीक्षण केल्यानंतर तेथे भिंत बांधून ते वळविलेले पाणी बंद केले. गोव्यात येणारे पाणी वळविण्यासाठी या भिंतीनाही भोके पाडण्याचे कर्म कर्नाटक सरकारने केलेले आहे. त्यासंदर्भात पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर यांनी वर्तमानपत्रातून लेख लिहून जागृती केली होती. तोच लेख या याचिकेला जोडलेला असल्याची माहिती त्यांनी दिली.

म.गो. पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांना ज्येष्ठांना बाजूला ठेवून युवा पिढीला या जनआंदोलनात सहभागी करून घेतल्यास हे जनआंदोलन यशस्वी तर होईलच. त्याचबरोबर व्यसनाच्या आहारी गेलेल्या पिढीलाही दिशा मिळेल. हे एवढे कार्य सुदिन ढवळीकर यांनी केल्यास पुढच्या निवडणुकीत आपण त्यांच्यासाठी सक्रियपणे कार्यरत राहू, असे पर्यावरणप्रेमी मधू गांवकर यांनी सांगितले.

प्रास्ताविक करताना फोंडय़ाचे म.गो. नेते डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, म्हादईवर घातलेला हा घाला हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे. कुणीही या जनआंदोलनाला राजकीय रंग देऊ नये. तहानलेल्या गोवेकरांना यापुढे तहान भागविण्यासाठी पाणी मिळणार नाही. त्यासाठी त्यांना तहानेचे कॅप्सूल घ्यावे लागतील.

यावेळी श्रीधर कामत बांबोळकर यांनी मार्गदर्शन केले. म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, कार्याध्यक्ष नारायण सावंत, रत्नकांत म्हार्दोळकर, सचिव प्रताप फडते, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, बबिता गांवकर, शिरोडय़ाचे म.गो. नेते अभय प्रभू, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, फोंडा गटाध्यक्ष अनिल नाईक व दीपक नाईक तसेच अन्य कार्यकर्ते, सरपंच, पंचसदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणपती गोब्रे यांनी केले. प्रताप फडते यांनी आभार मानले.

Related Stories

कुळेतील शेतकऱयांनी दोन्ही हंगामात पिक घ्यावे

Omkar B

हॉटेल, शॉपिंग मॉल, रिसॉर्ट आजपासून खुली

Omkar B

हरमल पंचायत प्रभाग 3 पोटनिवडणुकीत चुरस

Amit Kulkarni

एप टेक्सी सेवा मुळापासून उपटून टाका

Amit Kulkarni

मातेच्या अश्रूंची न्यायालयाकडून दखल पोटच्या गोळय़ाला वाचविण्यासाठी धडपड : मातेच्या जिद्दीचा महिला न्यायाधीशांकडून सन्मान

tarunbharat

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा 82 वा वाढदिवस हजारो चाहत्यांच्या साक्षीने साजरा

Patil_p
error: Content is protected !!