तरुण भारत

वेर्णातील कलिंगड, अळसांदे शेती धोक्यात

महेश कोनेकर/ मडगाव

वेर्णा भागात दरवर्षी पावसाळय़ानंतर कलिंगड व अळसांदय़ाची लागवड मोठय़ा प्रमाणात करतात. येथील कलिंगडे व अळसांदे संपूर्ण गोव्यात लोकप्रिय. मात्र, यंदा प्रथमच येथील कलिंगड व अळसांदे शेतीला किडीचा (रोगाचा) प्रादूर्भाव झाल्याने येथील शेतकऱयांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱयांनी पदरमोड करून कलिंगड व अळसांदय़ाची लागवड केली होती. पण, यंदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील भरून येण्याची शक्यता नसल्याने, सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

Advertisements

नुवे, वेर्णा व कासावली परिसरात सुमारे 70 ते 75 शेतकऱयांनी कलिंगड व अळसांदय़ाची लागवड केली आहे. मात्र, हातातोंडाशी आलेले उत्पन्न अचानक नष्ट होऊ लागल्याने येथील शेतकऱयांनी जबरदस्त धास्ती घेतली आहे. या संकटातून आत्ता केवळ देवानेच सुटका करावी अशी भोळी-बाबडी आशा येथील शेतकरी व्यक्त करतात. येथील काही शेतकरी गेल्या 30 ते 35 वर्षापासून कलिंगड व अळसांदय़ाची लागवड करतात. मात्र, अशा पद्धतीने रोग लागण्याचा प्रकार ते पहिल्यांदाच अनुभवतात. 

कल्पना देऊनही कृषी खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष

काल वेर्णा येथे भेट देऊन येथील कलिंगड व अळसांदे लागवड करणाऱया शेतकऱयांची भेट घेतली असता त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कलिंगड व अळसांदय़ाच्या शेतीला कीड (रोग) लागल्याची कल्पना कृषी खात्याला देण्यात आली तरी अद्याप कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याचे सौजन्यसुद्धा दाखविलेले नाही. सद्या जी कीड लागली आहे. त्यावर कशा प्रकारे उपाय योजना आखावी याचे साधे मार्गदर्शनसुद्धा कृषी खात्याच्या अधिकाऱयांनी केलेले नाही. 

कृषी खात्याकडून सद्या ‘कीटकनाशक’ आणून शेतकरी आपल्या परिने फवारणी करतात. मात्र, किडीचा रोग प्रार्दुभाव कमी होत नसल्याची माहिती शेतकऱयांनी दिली. काही शेतकऱयांनी कलिंगडावर ‘राख’ मारून किडीचा प्रादुर्भाव रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीने किडीचा रोग फैलाव होत आहे. त्यातून शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे.

वेर्णा येथील शेतकरी फ्रान्सिस प्रुझ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा पद्धतीने कलिंगड व अळसांदय़ाची शेती नष्ट होण्याचा अनुभव आपण प्रथमच घेत आहे. आपण गेल्या 25 वर्षापासून कलिंगड व अळसांदय़ाचे पीक घेतो. मात्र, असा अनुभव कधीच आला नव्हता. सद्या कलिंगडाला कीड लागली असून कलिंगडचे उत्पादन हातातून गेल्यात जमा आहे. काही केल्या किडीचा रोग प्रादुर्भाव रोखता येईना. आपण, कृषी खात्याकडून किटकशानक आणून फवारणी केलीय. पण, कीड रोखणे कठीण झालेले आहे. कलिंगडचा हिरवागार मळा एका रात्रीत नष्ट करून कीड नंतर कलिंगडाचे बाहेरचे आवरण पोखरू लागले. त्यामुळे कलिंगड कच्चे असतात नष्ट होऊ लागल्याची माहिती त्यांनी दिली. कीड नष्ट होत नसल्याने आपण ‘राख’ वापरली तरी कीड नष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

लागवडीसाठी जागा ही भाडेपट्टीवर घेतली जाते

कलिंगड व अळसांदय़ाची लागवड करण्यासाठी येथील गरीब शेतकरी इतरांची शेत जमीन भाडेपट्टीवर घेतात व त्यात पदरमोड करून लागवड करतात. आपण लाख भर रूपया कलिंगड व अळसांदय़ाच्या लागवडीवर खर्च केला होता. पण, ज्या पद्धतीने किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यातून आपल्याला काय उत्पन्न मिळेल व आपण भाडेपट्टीवर शेत जमीन घेतली, त्या मालकाचे देणे कसे द्यावे हा आपल्यासमोर प्रश्न असल्याचे फ्रान्सिस प्रुझ यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले.  दरवर्षी आपण लाख भर रूपये खर्च करून कलिंगड व अळसांदय़ाची लागवड करायचो. यासाठी लागणारे कामगार व इतर खर्च वजा करून आपल्याला किमान लाख ते दीड लाख रूपयांचा नफा व्हायचा. पण, यंदा जो खर्च केलाय, तोच भरून येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने नुकसान भरपाई दिली तरच  आम्ही थोडय़ा प्रमाणात तग धरू, अन्यथा कर्जबाजारी होण्याची पाळी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाचा परिणाम ?

ज्या शेतकऱयांनी यंदा सुरवातीलाच कलिंगडचे उत्पादन घेतले होते. त्यांना या किडीचा (रोग) फटका बसला नव्हता. त्यांनी कलिंगडाची विक्री करून चार पैसे मिळविले. पण, ज्यांनी किंचित उशिरा उत्पादन घेतलेय, त्यानाचा हा फटका बसलेला आहे. हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो अशी माहिती प्रुझ यांनी दिली.

दरम्यान, सूर्यग्रहणानंतरच या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने, हा सुर्यग्रहणाचा परिणाम तर नाही ना अशी शंका देखील काही शेतकऱयांच्या मनात आहे. पण, ही शंका दूर करणे किंवा किडकीचा नायनाट करण्याचे काम कृषी खात्याचे, पण, त्यांनीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 

Related Stories

वीज ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश

Amit Kulkarni

पणजीचे फेस्त साधेपणाने

Patil_p

येणाऱया निवडणूकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करणे हेच ध्येय

Patil_p

चंद्रकात कवळेकर यांनी केपे मतदार संघातून दाखल केला अर्ज

Sumit Tambekar

काणकोण, केपेत आपच्या रोजगार यात्रेस प्रतिसाद

Amit Kulkarni

कोरोनासंदर्भातील सरकारी निर्णयांत लोकांनी व्यत्यय आणू नये : काब्राल

Omkar B
error: Content is protected !!